आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शिवाणीला घेऊन लग्नाला गेला; सचिनचा घात झाला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सचिन सोमालियाने शिवाणीसोबत प्रेमविवाह केला होता. या लग्नाला शिवाणीच्या कुटुंबीयांचा विरोध होता. दरम्यान २६ मे रोजी पुसदला शिवाणीच्या मामाचे लग्न होते. या लग्नात शिवाणी असावी म्हणून तिच्या आई वडिलांनी तिला फोन करून पुसदला लग्नासाठी बोलावले. त्यामुळे २५ मे रोजी सचिन शिवाणीला घेऊन पुसदला गेला. शिवाणीला सोडून तू निघून जा, असे शिवाणीच्या वडिलांनी सचिनला समजावले मात्र तो जात नव्हता. दुसऱ्या दिवशी असलेल्या लग्नसोहळ्यात सचिन थांबला तर सर्वांना शिवाणीच्या लग्नाबाबत माहिती होईल. त्यामुळे त्याच रात्री तुकाराम ढाेकेने सचिनला सोबत घेऊन मुलगा भाच्याच्या मदतीने त्याला संपवल्याची बाब पोलिस तपासात पुढे आली आहे.
सचिन प्रभुदयाल सोमालिया आणि शिवाणी हे दोघेही शहरातील एका महाविद्यालयात एटीडीचे शिक्षण घेत होते. एकाच महाविद्यालयात असल्यामुळे यांची ओळख झाली, मैत्री झाली नंतर ओळखीचे रुपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्न केले. लग्नानंतर शिवानी अमरावतीत सचिनकडे राहत होती. १६ मे २०१६ राेजी शिवाणीच्या एका जवळच्या नातेवाईकाकडे लग्न होते, त्या लग्नातही ती गेली नाही कारण ती सचिनकडे होती. मात्र २६ मेला सख्ख्या मामाचे लग्न असल्यामुळे ती लग्नात राहणे आवश्यक होते. कारण ती दिसली नाही तर नातेवाईकांना काय सांगायचे? त्यामुळे तिच्या आई वडिलांनी फोन करून तिला लग्नासाठी बोलवले. सचिन तिला घेऊन पोहचला. २५ मे २०१६ ला दुपारी तुकाराम ढोके यांनी सचिनला समजावले शिवाणीला सोडून निघून जाण्यास सांगितले. मात्र त्याने नकार दिला. दुसरीकडे लग्नात सचिन थंाबला तर सर्वांना या लग्नाबाबत माहिती होईल म्हणून त्याला २५ मेच्याच रात्री संपवण्याचा कट आखण्यात आला. रात्री तुकाराम ढोके, मुलगा तुषार भाचा प्रवीण या तिघांसह सचिन हे रात्री पुसदवरून निघाले, त्यांनी जेवण केले आणि रात्रीदरम्यान सचिनला जीवानिशी मारून त्याचा मृतदेह जाळून टाकला. मात्र यासर्व घटनेबाबत सचिनच्या कुटूंबीयांना काहीच माहीत नव्हते. दरम्यान सचिनची आई सविता यांनी फ्रेजरपुरा पोलिसांत सचिन हरवल्याबाबतची तक्रार ३१ मे २०१६ ला पोलिसांकडे दिली. याच वेळी सचिनचा मोबाईल क्रमांक देण्यात आला. दरम्यान पोलिसांनी सचिनच्या मोबाईल क्रमांकावरून त्याचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र त्यामध्ये पोलिसांना यश आले नाही. दरम्यान ऑगस्ट महिन्यापर्यंत या प्रकरणाच्या तपासात गती नव्हती. ऑगस्ट महिन्यात रिपाइंने या प्रकरणात तातडीने सखोल तपासाची मागणी केली. दुसरीकडे मुलगा घरी आला नाही म्हणून सविता सिमोलीया या फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात जाऊन पोलिसांना प्रकरणाच्या तपासात प्रगती विचारत होत्या, मात्र फ्रेजरपुरा पोलिसांकडून त्यांना प्रतिसाद दिला जात नव्हता. असा आरोप सोमवारी (दि. १२) पोलिस आयुक्तांकडे आलेल्या सचिनच्या नातेवाईकांनी पोलिस आयुक्तांकडे केला. दरम्यान ऑगस्ट महिन्यात पोलिसांनी सचिनचा मोबाईल क्रमांक म्हणून जो क्रमांक सीडीआर काढण्यासाठी पाठवला तो क्रमांक सचिनचा नव्हता, त्यामुळे पोलिसांना सीडीआर मिळू शकला नव्हता. मात्र ऑगस्ट महिन्यात पोलिसांना सचिनचा खरा क्रमांक मिळाला, त्या क्रमांकाआधारे पोलिसांनी तपास केला असता सदर क्रमांक २५ मे २०१६ ला रात्री १० वाजतापासून बंद आहे. तसेच बंद होण्यापुर्वी शिवाणीच्या वडिलांचा आणि सचिनचा सातत्याने संपर्क झाल्याचे पोलिसांच्या तांत्रिक तपासात पुढे आले. त्यामुळे फ्रेजरपुराचे एपीआय सतीश इंगळे त्यांचे पथक तपासासाठी वाशीम जिल्ह्यात गेले. ज्या ठिकाणी मानोरा पोलिसांना २६ मे रोजी जळलेल्या अवस्थेत मृतदेह आढळला होता. त्या मृतदेहाजवळ काही मणी, पायातील जोडवे आणि सचिनच्या हातातील कड्याचे मणी आढळून आले, त्यामुळे जाळण्यात आलेला मृतदेह सचिनचाच असावा, असा निष्कर्ष पोलिसांना काढता आला, त्यानंतर आरोपींना अटक करण्यासाठी आवश्यक असलेले परिस्थितीजन्य पुरावे आणि तांत्रिक माहिती गोळा करण्यात आली. अखेर रविवारी शहर पोलिस निष्कर्षावर पेाहचले त्यांनी शिवाणीच्या वडिलांसह पाचही जणांना ताब्यात घेतले. त्यांनी सचिनच्या खुनाची कबुली दिली.

सोमवारी रिपाइंचे पदाधिकारी सचिनचे नातेवाईक पोलिस आयुक्त कार्यालयावर धडकले होते. यावेळी त्यांनी पोलिस आयुक्तांची भेट घेतली. फ्रेजरपुरा पोलिसांनी या प्रकरणाच्या तपासात हलगर्जीपणा केला असून , सचिनचे मारेकरी तुकाराम ढोके हे पोलिस असल्यामुळे फ्रेजरपुरा पोलिस ठाण्याचे ठाणेदार प्रमेष आत्राम यांनी त्यांना सहकार्य केले. त्यामुळे ठाणेदार आत्राम यांना निलंबित करून त्यांच्याविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची मागणी रिपाइं सविता सिमोलीया यांनी पोलिस आयुक्तांकडे केली. यावेळी रिपाइंचे अमोल इंगळे, अनिल फुलझेले, मनोज थोरात, सविता भटकर, प्रशांत वाकोडे, मनोज वानखडे, संदीप गजभिये, गौतम मोहोड, देविदास मोरे, गणेश तेलगोटे यांच्यासह मोठ्या प्रमाणात महीलांचा समावेश होता. दरम्यान आयुक्तालयात आलेल्या रिपांइ कार्यकर्ते पोलिसांमध्ये आयुक्तालयातील प्रवेशासाठी बाचाबाची झाली.
पोलिस आयुक्त दत्तात्रय मंडलिक यांना घटनेची माहिती देताना मृतक सचिनची आई रिपाइंचे पदाधिकारी.
बातम्या आणखी आहेत...