आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नावेदच्या मारेकऱ्यांतील रहीम आंतरराष्ट्रीय ‘बॉडी बिल्डर’, जिमच्या वादामधून खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
शरीरसौष्ठवपटू नावेद इक्बाल. - Divya Marathi
शरीरसौष्ठवपटू नावेद इक्बाल.
अमरावती- नागपूरी गेट परिसरातील रहिवासी राष्ट्रीय राज्यस्तरीय शरीरसौष्ठवपटू नावेद इक्बालचा तीन दिवसांपुर्वी चार ते पाच मारेकऱ्यांनी खून केला होता. या प्रकरणात गुन्हे शाखा नागपूरी गेट पोलिसांनी अकोला जिल्ह्यातील एका धाब्यावरून गुरूवारी (दि. २०) मध्यरात्री दोघांना अटक केली आहे. दोघांपैकी एक जण बॉडी बिल्डरच असून त्याने राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले असून यावर्षी होणाऱ्या मि. आशिया स्पर्धेसाठी त्याची निवड झाल्याचे पोलिसांच्या तपासात पुढे आले आहे.
 
रहीम खान कादर खान पठाण ऊर्फ रहीम बॉडी बिल्डर (३३ रा. पॅराडाईज कॉलनी) आणि मोहसीन खान ऊर्फ जॉन साजीद खान (२३, रा. हबीबनगर, अमरावती) यांना पोलिसांनी अटक केली आहे. रहीम खान हा सुध्दा राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धा जिंकणारा बॉडी बिल्डर आहे. त्याने २०१६ मध्ये मि. इंडिया स्पर्धेत सुवर्णपदक प्राप्त केले आहे. त्यामुळेच त्याची निवड २०१७ मध्ये होणाऱ्या मि. आशिया स्पर्धेसाठी झाली आहे. दरम्यान रहिमचा भाऊ अय्युब हा माजी सैनिक आहे. तो नाशिक शहरात राहतो. त्याचा नाशिकमध्ये जीम आहे. रहीमसुध्दा तीन वर्ष नाशिकला त्याच्याकडे होता. दरम्यान २०१३ मध्ये रहीम नाशिकवरून अमरावतीत आला. 

अमरावतीत त्याने एक जीम चालवण्यासाठी घेतला होता. याच जीममध्ये सुरूवातीला नावेदसुध्दा सरावासाठी जात होता. त्यामुळे रहीम नावेदची यांची कधीकाळी मैत्री होती. जिमच्या व्यवसायासोबतच रहीम वाळुचा व्यवसाय करतो. दरम्यान रहीमने घेतलेला हा जीम भाडे तत्वावर होता. दरम्यान नावेदने हाच जिम भाड्याने घेण्याचे ठरवले होते. तशी प्रक्रीया त्याने पुर्ण करून ऑगस्ट २०१७ पासून जिम ताब्यात घेण्याचे ठरवले होते. नावेद रहीम दोघेही बॉडी बिल्डर होते, नावेदने जिम चालवण्यास घेतल्याचे आपले आर्थीक नुकसान होणार असल्यामुळे रहिमचा त्याला विरोध होता. दरम्यान घटनेच्या दिवशी म्हणजेच १८ जुलैला सकाळी साडेनऊ वाजताच्या सुमारास रहीम नावेद यांची याच विषयावरून शाब्दिक चकमक उडाली होती. 

त्यानंतर दुपारी बारा वाजताच्या सुमारास रहीम, रहीमच्या वाहनाचा चालक मोहसीन ऊर्फ जॉन अन्य दोघे अशा चौघांनी नावेदला सिंडीकेट बँकेसमोर गाठले त्याच्यावर चायना चाकूने वार करून त्याचा खून केला. खून केल्यानंतर रहीम जॉन एकीकडे तर उर्वरित दोघे दुसरीकडे पळाल्याचे पोलिसांनी सांगितले. दरम्यान हे दोघे अकोला जिल्ह्यातील कोलकत्ता धाब्यावर असल्याची माहिती मिळाल्यामुळे नागपूरी गेटच्या पथकाने गुरूवारी २० जुलैला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास दोघांना ताब्यात घेतले होते. उर्वरीत दोघांचा शोध सुरू असल्याचे पोलिस आयुक्तांनी शुक्रवारी २१ जुलैला पत्रकार परिषदेत सांगितले. ही कारवाई नागपूरी गेटचे ठाणेदार दिलीप चव्हाण, पीएसआय विजय गित्ते, एएसआय रफिक, संजय बाळापुरे, एनपीसी अकिल खान, हरिश इंगळे, विलास पोहळेकर यांनी केली.
 
खून करून पळाले होते मुंबईत 
नावेदचाखुन करून रहीम जॉन हे क्रेटा कारने शहरातून पळाले. त्यानंतर त्यांनी कार सोडून दिली अकोला गाठले. अकोल्यावरून त्यांनी मंगळवारी रात्रीच मुंबई गाठली होती. मुंबईत माहीम परिसरात हे राहीले. त्यानंतर पुन्हा हे अकोला येथे परत आले. वास्तविकता रहीम अकोल्यावरून यवतमाळ जाण्याच्या तयारीत असावा, कारण त्याचे कुटुंबीय यवतमाळात असल्याची माहीती पोलिसांना मिळाली होती.