वर्धा - शहराच्या पिपरी मेघे आणि साटोडा भागात अज्ञात आरोपींनी एका 30 ते 35 वर्षीय महिलेची हत्या करून चार वेगवेगळ्या ठिकाणी त्याचे तुकडे फेकून दिले. मोकाट कुत्र्यांनी शनिवारी रात्री या महिलेचे शीर आणि इतर मांसाचे तुकडे आणल्यानंतर ही धरारक घटना उघडकीस आली. दरम्यान, खून झालेली महिला कोण याचा शोध पोलिस घेत असून, याच परिसरारील एक घरकाम करणारी महिला चार दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे तीच ही महिला आहे का, या दिशेने पोलिस तपास करत आहेत.
अशी उघड झाली घटना
शनिवारी रात्री साटोडा परिसरात मोकाट कुत्रे भर रस्त्यात मानवी अवयवाचे लचके तोडत होते. ही बाब परिसरातील नागरिकांनी पाहिली. त्यांनी या बाबत तत्काळ पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठत अवयवाचे तुकडे ताब्यात घेतले. दरम्यान, आज (रविवार) सकाळी साटोडा, पिपरी मेघे, स्वागत कॉलनी आणि कारला परिसरात आशाच प्रकारे तुकडे आढळून आले. त्यामुळे आरोपींनी महिलेचा खून केल्यानंतर तिची ओळख पटवू नये, यासाठी चार ठिकाणी तिचे तुकडे फेकून दिल्याची चर्चा आहे. दरम्यान, कुत्र्यांनी मृतदेहाचे तुकडे इतरत्र नेले असावे, असा संशयही व्यक्त केला जात आहे.
इंदिरानगर भागातील महिला बेपत्ता
शहरातील इंदिरानगर भागातील एक महिला चार दिवसांपासून बेपत्ता आहे. त्यामुळे खून झालेली महिला आणि ती एकच आहे का, याचा शोध पोलिस घेत आहेत.