आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती: सर्वांचा लाडका असणे ठरले जीवघेणे, पती-पत्नीच्या वादात चिमुकल्याचा नाहक बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- पती-पत्नीमध्ये निर्माण झालेल्या वादात पत्नीचे आईवडील तिचीच बाजू घेतात. तसेच पत्नीचा पहिला मुलगा रमणचा सर्वजण लाड करतात. आपले कुणीच ऐकत नाही. आपण एकाकी पडलो. सर्वांचा लाडका असलेल्या रमणलाच संपविल्यास सर्वांनाच त्रास होईल, या असूरी भावनेतून सावत्र पित्याने शाळेत निघालेल्या रमणला रस्त्यात गाठून नदीपात्रात नेऊन गळा दाबला. एवढ्यावरच हा क्रुरकर्मा न थांबता त्याने पेट्रोल टाकून चिमुकल्या रमणचा मृतदेह पेटवून दिला. या कृरकर्म्या पित्याला फ्रेजरपुरा पोलिसांनी अकोट पोलिसांकडून ताब्यात घेऊन शुक्रवारी (दि. १७) अटक केली आहे. मंगेश नामदेव दांडगे (३०, रा. पथ्रोट) असे रमणची हत्या करणाऱ्या सावत्र पित्याचे नाव आहे. या हृदयद्रावक घटनेने समाजमन सुन्न झाले आहे. 

मंगेश दांडगे हा रमणचा सावत्र पिता आहे. रमणची आई प्रज्ञा हिचे पहिले लग्न जवळपास दहा वर्षांपूर्वी झाले होते. मात्र रमण एक वर्षाचाच असताना रमणचा सख्खा पिता त्या दोघांना सोडून निघून गेला. त्यामुळे प्रज्ञा चिमुकल्या रमणसह माहेरी वडिलाकडे शहरातील यशोदानगर भागात राहत होत्या. दरम्यान २०१३ मध्ये प्रज्ञा यांनी पथ्रोटच्या मंगेश दांडगे याच्यासोबत दुसरा विवाह केला. मंगेश आणि प्रज्ञा यांना तीन वर्षांची अवंती नावाची मुलगी आहे. मंगेश प्रज्ञा अमरावतीलाच राहत होते. मात्र मागील तीन ते चार महिन्यांपासून या पती- पत्नीमध्ये कलह सुरू झाल्याने मंगेश पथ्रोटला राहण्यासाठी निघून गेला.
 
 मंगेश प्रज्ञासोबत वाद घालायचा त्यामुळे प्रज्ञाच्या वडिलांनीसुध्दा मंगेशला समजावून सांगितले. रमण हा प्रज्ञाच्या वडिलांकडे म्हणजेच त्याच्या आजोबाकडे राहायचा. दरम्यान या सर्वांना अद्दल घडवण्याची खुमखुमी मंगेशच्या डोक्यात होती. दरम्यान मंगेश मागील दोन ते तीन महिन्यापासून अमरावतीत नव्हता. तो पथ्रोट येथे राहत होता. मात्र घटनेच्या दहा दिवसांपूर्वीपासून त्याने प्रज्ञासोबत फाेनवरून बोलचाल सुरू केली. ही बोलचाल करून पती पत्नीमधील वाद संपल्यासारखे त्याने प्रज्ञाला भासवले. मात्र त्याच्या डोक्यातील वचपा काढण्याची वृत्ती कायमच होती. 

9 फेब्रुवारीला सकाळी मंगेशने पथ्रोट येथून त्याच्या मामेभावाची दुचाकी घेतली. याच दुचाकीने तो थेट अमरावतीत पोहचला. अमरावतीत आल्यानंतर त्याने त्याची सख्खी मुलगी अवंतीच्या शाळेत जाऊन भेट घेतली. त्यानंतर ११ वाजता मुदलीयार नगरमधील वैभव प्राथमिक शाळेजवळ रमण त्याला शाळेत येताना दिसला. त्यावेळी रमणला घेऊन आपण फिरायला जाऊ, असे सांगून त्याला थेट अकोटला नेले. अकोटच्या एका पेट्रोलपम्पवर मंगेशने रमणच्या बॉटलमध्ये पेट्रोल घेतले. त्यानंतर वाई गावाजवळ असलेल्या पठार नदीच्या पात्रात नेऊन चिमुकल्या रमणचा या कृरकर्म्याने गळा दाबला. त्यानंतर याच नदीच्या पात्राजवळ बॉटलमध्ये आणलेले पेट्रोल ओतून रमणचा मृतदेह पेटवून दिला आणि घटनास्थळावरून पसार झाला. 
 
दुसरीकडे रमण शाळेतून घरी न आल्याने आईने फ्रेजरपुरा पोलिसात तक्रार दिली. मंगेशच्या दिशेने पोलिसांची संशयाची सुई वळली होती. दरम्यान शुक्रवारी त्याला अकोट पोलिसांकडून ताब्यात घेऊन अटक करण्यात आली.
 
समाजमन्न झाले सुन्न 
शुक्रवारी रात्री फ्रेजरपुरा पाोलिसांचे पथक रमणचा अर्धवट जळालेल्या स्थितीतील मृतदेह घेऊन शहरात आले. रमण हा कुटूंबात सर्वांच्या लाडक्या होता. मंगेशने इतक्या कृरपणे त्याचा खून केल्यामुळे रमणच्या आईसह सर्वांनाच जबर धक्का बसला. समाजसुन्न झाले आहे.पोलिसांनी मृतदेह नातेवाईकांच्या स्वााधिन केला, त्यावेळी मारेकरी मंगेशवर सर्वांचा रोष दिसून आला. 
 
पुढील स्लाइडवर पाहा रमणचे फोटोज्...

(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...