आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'नाफेड'च्या वतीने सोयाबीन खरेदी सुरू

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती/दर्यापूर - बाजारसमित्यांमध्ये सोयाबीनचे गडगडलेले भाव सावरण्यासाठी बुधवारपासून (दि. २६) अमरावती दर्यापूर बाजार समितीत नाफेडचे खरेदी केंद्र सुरू करण्यात आले. अमरावती येथे जिल्हाधिकारी किरण गित्ते तर दर्यापूर येथे तहसीलदार राहुल तायडे यांच्याहस्ते शासकीय सोयबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. दरम्यान, चांदूर बाजार, अचलपूर चांदूर रेल्वे येथे शासकीय खरेदीचा शुभारंभ करण्यात येणार असून पुढील टप्प्यात उर्वरित बाजार समित्यांमध्येही खरेदी सुरू करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख यांनी दिली.

जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये सोयाबीनचा हंगाम सुरू झाला तेव्हापासून सोयाबीनची किरकोळ दराने खरेदी सुरू होती. यामुळे लाखो क्विंटल सोयाबीनचे दमदार उत्पादन होऊनही शेतकऱ्यांना बाजारात मातीमोल भाव मिळाल्याने शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाले होते. दरम्यान, शासकीय खरेदी सुरू व्हावी यासाठी शेतकऱ्यांकडून मागणी होत होती. दरम्यान, जिल्हा मार्केटिंग फेडरेशनला बुधवारी खरेदी सुरू करण्याचे आदेश प्राप्त झाले. अमरावती बाजार समितीत दुपारी चार वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी किरण गित्ते यांच्या हस्ते सोयाबीन खरेदीचा शुभारंभ करण्यात आला. कठोरा येथील भास्कर कळबांडे, वाठोडा येथील विलास बुरघाटे, डवरगाव येथील पांडुरंग चिकटे या शेतकऱ्यांचा जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते सत्कार करण्यात आला. या शेतकऱ्यांचे सोयाबीन २७७५ रुपये प्रति क्विंटल हमीभावाने खरेदी करण्यात आले. यावेळी जिल्हा मार्केटिंग अधिकारी अशोक देशमुख, उप सर व्यवस्थापक दिनेश डागा, सभापती सुनील वऱ्हाडे, प्रभारी सचिव भुजंग डोईफोडे, पणन अधिकारी पुरी आदी उपस्थित होते. दर्यापूर येथे प्रभारी एसडीओ राहुल तायडे यांच्या हस्ते शुभारंभ झाला.आमलाचे शेतकरी मनोज वानखडे यांचा शाल दुप्पट्याने सत्कार करण्यात आला. या वेळी कोमलसिंह सिसोदीया, राजेंद्र गावंडे, सागर बयस,प्रमोद वर्धेकर आदी अधिकारी पदाधिकारी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...