आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुंडाचा गोळ्या झाडून खून, भरदिवसा नागपुरातील थरारक घटना; प्रतिस्पर्धी टाेळीवर संशय

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नागपुरातील वर्दळीच्या गोकुळपेठ बाजारपेठेतील भर चौकात शेकडो लोकांच्या देखत कुख्यात गुंड सचिन सोमकुवर उर्फ दुधवा (वय ३४) याचा तब्बल दहा गोळ्या झाडून खून करण्यात आला तर त्याचा साथीदार जखमी झाला. गुरुवारी भरदुपारी घडलेल्या या घटनेनंतर दहशतीमुळे काहीकाळ बाजारपेठ बंद झाली होती.

नागपूर शहर व जिल्ह्यात गेल्या काही वर्षात गुन्हेगारीच्या घटना माेठ्या प्रमाणावर वाढल्या अाहेत. काही दिवसांपूर्वी गुंडावर हल्ले करुन त्यांना संपवण्याच्या घटनाही याच शहरात घडलेल्या अाहेत. बुधवारी मणप्पन गोल्ड कार्यालयावरील दराेडा घालून सुमारे ३० किलाे साेने लंपास करण्यात अाले हाेते. या दरोड्याच्या घटनेने शहर पोलिस यंत्रणा पुरती हादरली असताना शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह लावणारी ही घटना घडली. घटनास्थळापासून काही अंतरावर धरमपेठ परिसरात मुख्यमंत्री फडणवीस यांचे निवासस्थान आहे.
कुख्यात सचिन सोमकुवर हा त्याच्या साथीदारासह गोकूळपेठ बाजारात फिरत असतानाच मोटारसायकलींवर आलेल्या पाच ते सहा मारेकऱ्यांनी त्याला भर चौकातच गाठले. त्यांनी माऊझरने सचिन आणि त्याचा साथीदार सुरेश डोंगरे (वय २६) या दोघांवर गोळ्या झाडल्या. यात गंभीररित्या जखमी झालेला सचिन सोमकुवर हा जागीच ठार झाला तर त्याचा साथीदार सुरेश जखमी झाला. त्याच्या डोक्याला गोळी चाटून गेल्याचे पोलिसांनी सांगितले. बाजारातील शेकडो लोकांच्या समक्षच ही घटना घडली. त्यानंतर मारेकरी वाहनांनी पसार झाले.
अचानक घडलेल्या या घटनेमुळे बाजारात पळापळ सुरु झाली. व्यापाऱ्यांनी दुकाने पटापट बंद केली. रस्त्यावरील दुकानदारही माल तेथेच टाकून पळायला लागले. घटनेनंतर अवघ्या काही मिनिटातच अंबाझरी पोलिसांचे पथक घटनास्थळी दाखल झाले. घटनास्थळाजवळच सचिन सोमकुवर याच्या वडीलांचे भाजीचे दुकान आहे. त्यांच्या समक्षच ही घटना घडल्याचे सांगितले जाते. जखमी झालेल्या सुरेशला त्यांनीच रुग्णालयात दाखल केले. त्याची प्रकृती गंभीर असल्याचे सांगितले जाते.
सचिनवर खुनासह अनेक गुन्हे
पोलिसांच्या रेकॉर्डमध्ये सचिन सोमकुवर हा कुख्यात गुंड असून त्याच्याविरुद्ध खुनासह अनेक गुन्हे दाखल आहेत. दोन-तीन वर्षांपूर्वी पांढराबोडी वस्तीत कुख्यात गुंड बाल्या उईके याच्या खुनात सचिन सोमकुवर याचा सहभाग असल्याचा संशय होता. या गुन्ह्यात इतरांना शिक्षा झाली मात्र सचिन सुटला होता. त्या घटनेचा बदला घेण्यासाठीच प्रतिस्पर्धी टोळीने त्याला संपविल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.
बातम्या आणखी आहेत...