आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भरदिवसा नागपूरात थरार: सुपारी किलरकडून 72 वर्षीय अार्किटेक्टचा खून

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अग्रसेन चौकात ही घटना घडली. - Divya Marathi
अग्रसेन चौकात ही घटना घडली.
नागपूर- मुख्यमंत्रीदेवेंद्र फडणवीस यांचा मतदारसंघ असलेल्या नागपुरात गुन्हेगारीचा अालेख दिवसेंदिवस वाढतच चालला अाहे. एका ७२ वर्षीय आर्किटेक्टवर पाच गोळ्या झाडून त्यांचा खून करण्यात आल्याची थरारक घटना मंगळवारी सकाळी घडली. जमिनीच्या वादातून हे प्रकरण घडल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून या घटनेत ‘सुपारी किलर’चा वापर झाल्याचे संकेत मिळत आहेत.

एकनाथ धर्माजी निमगडे (वय ७२) असे मृत आर्किटेक्टचे नाव अाहे. मंगळवारी सकाळी सव्वाआठच्या सुमारास निमगडे हे रोजच्याप्रमाणे गांधीबाग बगीच्यातून स्कुटीने परतत होते. अग्रसेन चौकाजवळच दुचाकीवर आलेल्या अज्ञात मारेकऱ्याने त्यांच्यावर पिस्तुलातून पाच गोळ्या झाडल्या. चेहरा कपड्याने झाकलेला मारेकरी गोळ्या झाडून लगेचच दुचाकीवर पसारही झाला. ही घटना घडली त्यावेळी रस्त्यावर बऱ्यापैकी वर्दळ होती. या घटनेची माहिती मिळताच जवळच्या तहसील पोलिस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले. स्थानिकांच्या मदतीने पाेलिसांनी रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या िनमगडे यांना तातडीने इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयात (मेयो) दाखल केले. मारेकऱ्याने झाडलेल्या गोळ्यांपैकी एक गोळी निमगडे यांच्या छातीत आणि पोटात घुसली हाेती. डाॅक्टरांनी शर्थीचे प्रयत्न करुनही दुपारी बाराच्या सुमारास निमगडे यांचा मृत्यू झाला. जमिनीच्या वादातून निमगडे यांना ठार मारण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज तहसील पोलिसांनी वर्तविला आहे. त्याचप्रमाणे या हल्ल्यासाठी सुपारी किलरचा वापर झाल्याची पोलिसांची खात्री पटली आहे.

दरम्यान, भरदिवसा ही घटना घडल्याने गांधीबाग परिसरात दहशतीचे वातावरण तयार झाले आहे. मारेकऱ्याचा शोध घेण्यासाठी तहसील पोलिसांसह गुन्हे शाखेचेही विशेष पथक तयार करण्यात आले अाहे. एखाद्या सीसीटीव्हीमध्ये ही घटना रेकॉर्ड झाली आहे काय, याचाही शोध सुरु आहे. काही प्रत्यक्षदर्शींनी मारेकऱ्याचे वर्णनही पोलिसांना दिले असून त्या आधारे यादीवरील गुन्हेगारांची चौकशी पोलिसांनी सुरू केली आहे.

५.५ एकर जमिनीच्या वादातून हत्या?
नागपूर शहराच्या हद्दीत वर्धा मार्गावर निमगडे यांच्या मालकीची साडेपाच एकर जमीन आहे. या जमिनीवरून त्यांचा काही लोकांशी वाद सुरु होता. याच वादातून त्यांची हत्या घडली असावा, असा संशय निमगडे यांच्या मुलाने व्यक्त केला अाहे. जमीन विकण्यासाठी निमगडे यांच्यावर सातत्याने दबाव येत होता. मात्र, ते नकार देत राहिल्याने ही घटना घडल्याचे सांगितले जात आहे. तथापि, पोलिस या घटनेच्या अन्य बाजूही तपासून पहात आहेत.
पुढे पाहा, घटनास्‍थळावरील फोटो..
बातम्या आणखी आहेत...