नागपूर- दुहेरी खुनाच्या घटनेनंतर तणावाचे वातावरण निर्माण होऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याच्या मागणीसाठी संतप्त जमावाने साेमवारी नागपुरातील जरीपटका पोलिस ठाण्याला घेराव घालत मारेकऱ्यांच्या घरांवर दगडफेक केली. जमाव नियंत्रणाबाहेर जात असल्याचे लक्षात घेऊन जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना दोनदा लाठीमार करावा लागला. या लाठीमारात दहा ते बारा लोक जखमी झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.
शहरातील समतानगरातील राणा कुटुंबाच्या घरातील सांडपाणी शेजारी राहणारे चमके कुटुंबाच्या घरात शिरल्याच्या क्षुल्लक कारणावरून रविवारी वाद झाला. पाणी घरात शिरल्याने संतापलेल्या प्रशांत चमके व राणा कुटुंबातील इमरत (वय ३५) व पूरण (वय ३८) यांच्यात हा वाद झाला. या वादातून प्रशांत, त्याची पत्नी गीता, बहीण वंदना तसेच इतर साथीदारांनी राणा कुटुंबाच्या घरात शिरून इमरत व पूरण यांच्यावर तलवारी व चाकूने हल्ला चढविला. घरात असलेली इमरतची पत्नी सुनीता हिने त्यांना अडविण्याचा प्रयत्न केला असता मारेकऱ्यांनी तिलाही जखमी केले. या हल्ल्यात इमरत व पूरण हे दोघेही गंभीर जखमी झाले. त्यांना मेयो हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असता इमरतला डॉक्टरांनी मृत घोषित केले. तर पूरणचा रात्री उशिरा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या घटनेने संतप्त झालेल्या वस्तीतील लोकांनी सोमवारी सकाळी जरीपटका पोलिस ठाण्यावर मोर्चा नेऊन आरोपींना तत्काळ अटक करण्याची मागणी केली. संतप्त जमावाने टायर जाळले, रास्ता राेकाेचाही प्रयत्न केला.
आरोपींपैकी प्रशांत चमके, त्याची पत्नी गीता, बहीण वंदना यांना अटक करण्यात आल्याचे व उर्वरित दोन मारेकऱ्यांचा शोध सुरु असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. मात्र, जमाव काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हता. तुरळक दगडफेकीचेही प्रयत्न झाले. त्यामुळे पोलिसांनी अतिरिक्त कुमक मागवून लाठीमार केला. जमावाला पांगविण्यात आल्यावर लोक समतानगरात राणा कुटुंबीयांच्या घरी पोहचले. तेथे दोघा भावंडांचे मृतदेह पोस्टमॉर्टमनंतर आणण्यात आल्यावर पुन्हा तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमावाने आरोपी प्रशांत चमके यांच्या घरावर दगडफेक सुरु केल्याने पोलिसांना जमावाला पांगविण्यासाठी लाठीमार करावा लागला. या लाठीमारात किमान दहा-बारा जण जखमी झाल्याची माहिती आहे. या सर्वांवर शासकीय रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती पाेलिसांनी दिली.
अाराेपी प्रशांतची नागपुरात प्रचंड दहशतमारेकऱ्यांपैकी प्रशांत चमके याचा अवैध दारुविक्रीचा व्यवसाय असून त्याची वस्तीत माेठ्या प्रमाणावर दहशत असल्याचा लोकांचा आरोप आहे. पोलिसांकडून त्यांच्यावर कारवाई होत नसल्याची लोकांची तक्रार होती. दरम्यान, या घटनेनंतर कडेकोट पोलिस बंदोबस्तातच दोन्ही भावंडांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. पोलिसांनी समतानगरात बंदोबस्त तैनात केला असून दुपारनंतर तणाव निवळल्याचा दावा पोलिसांनी केला आहे. दरम्यान, पोलिसांच्या लाठीमाराचा फटका प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनाही बसला. पोलिसांनी छायाचित्रकारांचे कॅमेरे हिसकावून घेण्याचे प्रकार घडले.