आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Nagpur In Water, Grandmother With Granddaughter Carrying

नागपूर पाण्यात; आजी, नातवासह चौघे वाहून गेले, १६३ मि. मी. पावसाची नोंद

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उपराजधानी नागपूरसह विदर्भातील बहुतेक जिल्ह्यांमध्ये गुरुवारी मुसळधार पाऊस झाला. उपराजधानी नागपुरात धो धो कोसळलेल्या पावसाने शहराची अक्षरश: दैना उडाली. नद्यांना पूर आल्याने शहरात आजी आणि नातवासह एकूण चौघे जण वाहून गेले. रेल्वे स्थानक, बसस्थानकावर मोठ्या प्रमाणात पाणी साचले होते. अनेक वस्त्यांमध्ये घरांमध्ये पाणी शिरल्याच्या घटना घडल्या. प्रशासनाच्या पथकांनी पाचशेच्या आसपास नागरिकांची िवविध वस्त्यांमधून सुटका केली. अनेक रस्ते पाण्याने तुडुंब भरल्याने वाहतूक काही तास विस्कळीत झाली होती.
विदर्भाला लागून दक्षिण छत्तीसगड परिसरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाल्याचा परिणाम म्हणून गुरुवारी रात्रीपासून विदर्भाच्या अनेक जिल्ह्यांमध्ये दमदार पाऊस पडला. पावसाचा हा जोर शुक्रवारपर्यंत कायम राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात
आली आहे.

बुधवारी सायंकाळपासूनच अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाला सुरुवात झाली. नागपुरात रात्री अकराच्या सुमारास पाऊस सुरू झाला. गुरुवारी पहाटेच्या सुमारास मुसळधार पाऊस कोसळायला सुरुवात झाली. दुपारी साडेबारापर्यंत अखंडपणे पाऊस कोसळत होता. तब्बल तेरा तासांत १६३ मि.मी. पाऊस पडल्याची नोंद झाली.

अंबाझरी ओव्हरफ्लो
अंबाझरी तलाव गुरुवारी सकाळी आठच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला. पूरस्थितीचे हेे दृश्य पाहण्यासाठी नागरिकांनी सकाळपासूनच गर्दी केली होती. नाग नदी व पिवळी नदी या दोन्ही नद्या सायंकाळपर्यंत दुथडी भरून वाहत होत्या. काही भागांत या नद्यांचे पाणी रस्त्यांवर आल्याने वाहतूक पूर्णपणे विस्कळीत झाली होती. पूर्व व पश्चिम नागपूरला जोडणाऱ्या अनेक मार्गांवरील भूमिगत पुलांखाली कमरेपर्यंत पाणी साचल्याने रस्ते वाहतुकीसाठी बंद झाले होते.

सुदैवाने आजोबा बचावले
उत्तर नागपुरातील कस्तुरबानगरात पिवळी नदीच्या काठावरील घरात पाणी शिरून रेखा नेवारे (५०) व त्यांचा नातू यश (वय ३) हे वाहून गेले, तर यशचे आजोबा अनंत नेवारे (५५) हे बचावले. या दोघांचे मृतदेह सापडल्याची माहिती सूत्रांनी दिली. याशिवाय काचीपुरा वस्तीजवळील नाल्यात एक तर अन्य ठिकाणी एक मृतदेह आढळून आला असून अजून त्याची ओळख पटली नाही.

चंद्रपूर, भंडाऱ्यातही धाे धाे
पूर्व विदर्भातील अनेक जिल्ह्यांमध्ये बुधवारी रात्री जोरदार पाऊस झाला. गुरुवारी सकाळी साडेआठ वाजेपर्यंत विदर्भात सर्वाधिक पावसाची नोंद चंद्रपूर जिल्ह्यात ७९.९ मि.मी. इतकी करण्यात आली. त्या खालोखाल नागपुरात पावसाचे सर्वाधिक प्रमाण राहिले. गडचिरोली ६० मि.मी., तर भंडारा व गोंदिया जिल्ह्यांमध्येही अनुक्रमे ५९ मि.मी. आणि ४१ मि.मी. पावसाची नोंद झाली.

मंुबईत दोन तरुण बुडाले : वर्सोवा बीचवर दोन महाविद्यालयीन तरुण बुडाल्याची घटना गुरुवारी घडली. उमा शर्मा (२०) आणि संतोष यादव (२१) अशी मृतांची नावे आहेत. दोघेही समुद्रात उतरले. मात्र, पाण्याच्या खोलीचा अंदाज न आल्याने ते बुडाले.
घटनेनंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी दोघांचे मृतदेह बाहेर काढून त्यांच्या नातेवाइकांच्या स्वाधीन केले. दरम्यान, दोघांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.