आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बालसुधारगृहातून पळाली 21 मुले, दहा जण ताब्यात; रक्षकांच्या डाेळ्यात मिरची पूड

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- सुरक्षारक्षक आणि कर्मचाऱ्यांना मारहाण करून बालसुधारगृहातील २१ मुलांनी रविवारी रात्री पळ काढला. मात्र, पाेलिसांनी तातडीने हालचाल केल्याने त्यापैकी १० जणांना रात्रीच ताब्यात घेण्यात यश अाले. उर्वरित ११ जण मात्र फरार अाहेत.

शहरातील जरीपटका येथील पाटणकर चौकात बालसुधारगृह आहे. अनाथ, पोलिसांना सापडलेली तसेच विविध गुन्ह्यांत पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांना या ठिकाणी ठेवण्यात येते. सकाळी आणि रात्रीच्या जेवणाच्या वेळी या मुलांना पुरेशी मोकळीक मिळते. रविवारी रात्री जेवणाची तयारी सुरू असताना या मुलांना एकत्रित करण्यात आले. या वेळी तिथे सुरक्षा रक्षकासह मोजकेच कर्मचारी उपस्थित होते. ही संधी साधून काही मुलांनी सुरक्षा रक्षकांच्या डोळ्यात मिरची पूड फेकली, तसेच काही कर्मचाऱ्यांना बेदम मारहाण करत पळ काढला. २१ मुले पळाल्याने हादरलेल्या कर्मचाऱ्यांनी वसतिगृहाच्या व्यवस्थापकाला कळवले. व्यवस्थापकाने पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी शहरातील सर्व पोलिस ठाण्यांना बिनतारी संदेश यंत्रणेने कळवून संशयास्पद स्थितीत फिरत असलेल्या मुलांना ताब्यात घेण्यास सांगितले. त्यानंतर पोलिसांनी दहा जणांना रात्रीच पकडले.

काही मुले गंभीर गुन्ह्यातील अाराेपी
फरार मुलांमध्ये खून, सामूहिक बलात्कार, जबरी चोरी अशा गंभीर गुन्ह्यातील बाल गुन्हेगारांचा समावेश आहे. बालसुधारगृहाचा केअर टेकर विनोद इंगळे याने सांगितले, ‘रविवारी रात्री जेवण झाल्यावर सर्व मुलांनी अचानक एकाच वेळी दरवाजाकडे धाव घेतली. गार्ड सुनील बिनकर याच्या डोळ्यात मिरची पावडर फेकून सर्वांनी पळ काढला. सर्वांनी एकाच वेळी हल्लाबोल केल्याने गार्ड काहीच करू शकला नाही. मार खाण्याची भीती आणि घरच्या आठवणीमुळे आपण पळ काढल्याचे पकडलेल्या मुलांनी सांगितले अाहे.’