आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

राज्यातील १७ गड-किल्ल्यांच्या थ्री-डी मॅपिंगचे काम हाती घेणार

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - राज्यातील पडझड झालेल्या ऐतिहासिक गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्यासाठी त्यांचे त्रिमितीय मॅपिंग (थ्रीडी मॅपिंग) केले जाणार अाहे. किल्ल्यांच्या भग्नावशेषांचा आधार घेऊन उपग्रह तंत्रज्ञानाच्या मदतीने किल्ल्यांच्या पूर्वस्थितीच्या त्रिमितीय प्रतिमा साकारली जाणार असून त्याची किल्ल्यांना काही प्रमाणात पूर्वीचे स्वरूप देण्यासाठी मदत होणार आहे.
राज्याच्या सांस्कृतिक कार्य मंत्रालयाने राज्य सरकारच्या अखत्यारीत येणाऱ्या गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याची योजना आखली आहे. त्यासाठी समितीदेखील स्थापन करण्यात आली आहे. या योजनेचा पहिला टप्पा म्हणून गड-किल्ल्यांच्या सध्याच्या भग्नावशेषांचा आधारे घेत त्यांचे पूर्वीचे स्वरूप (डिझाइन) जाणून घेण्याचा प्रयत्न होणार आहे. त्यासाठी उपग्रह तंत्रज्ञानाची मदत घेऊन किल्ल्यांचे त्रिमितीय मॅपिंग केले जाणार आहे. मॅपिंगमधून किल्ल्याच्या पूर्वीच्या स्थितीचे चित्र काही प्रमाणात स्पष्ट होऊ शकेल व त्यानंतर प्रत्यक्षात संवर्धन अथवा डागडुजी, दुरुस्तीचे काम हाती घेणे शक्य होणार आहे. नागपुरातील महाराष्ट्र रिमोट सेन्सिंग अॅप्लिकेशन सेंटरकडे किल्ल्यांच्या मॅपिंगची जबाबदारी देण्यात आली आहे. सेंटरमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सुरुवातीला एका किल्ल्याची निवड करून त्याचे थ्री-डी मॅपिंगचे काम हाती घेण्याचा पायलट प्रकल्प राबवला जाणार असून त्यासाठी अद्याप किल्ल्याची निवड झालेली नसल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यानंतर टप्प्याटप्प्याने इतर किल्ल्यांच्या मॅपिंगचे काम हाती घेण्यात येणार आहे.
माहूरच्या किल्ल्यासह सिंधुदुर्गचा समावेश
सिंधुदुर्ग, माणिकगड, नगरधन, तोरणा, अंबागड, परंडा, भुदरगड, गाळणा, रायगड, माहूर यासह जवळपास १७ गड-किल्ल्यांचा त्यात समावेश असल्याची माहिती सूत्रांनी दिली. मॅपिंगसाठी सुरुवातीला गड-किल्ला परिसराच्या उपग्रह तसेच ड्रोनचा वापर करून प्रतिमा घेतल्या जाणार आहेत. त्यानंतर त्रिमितीय तंत्रज्ञानाचा वापर करून पडझड झालेल्या भागांचे आरेखन केले जाणार आहे.
बातम्या आणखी आहेत...