आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दादा, काकांचा काहीतरी आदर्श घ्या- खडसेंची अजित पवारांविरोधात टोलेबाजी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नागपूर अधिवेशनात काँग्रेस-राष्ट्रवादीच्या विरोधक आमदारांनी शेतक-यांच्या आत्महत्या व त्यांच्या मदतीवरून सरकारला धारेवर धरले आहे. शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी द्यावी या मागणीवरून विरोधक विधानसभेत गदारोळ घालत आहेत. तसेच कामकाजात व्यत्यय आणत आहेत. राष्ट्रवादीचे गटनेते अजित पवारांनी या शेतक-यांच्या प्रश्नांवरून सरकारला घेरले. यावर कृषीमंत्री उत्तर देण्यास उठले. ते बोलणार तेवढ्यात अजित पवार व राष्ट्रवादीचे आमदार यांनी खडसेंना रोखले. आता चर्चा पुरी, तुमचे सरकार शेतक-याविषयी गेल्या वर्षीपासूनच बोलत आहात पण आता चर्चा नको थेट मदतीची घोषणा करा असे सांगत गदारोळास सुरुवात केली. दरम्यान, अनुभवी नेते असलेल्या खडसेंनी शरद पवारांनी काल दिल्लीत केलेल्या विधानावरून पवारांना खडसावले. संसद व विधानसभा खासदार-आमदारांनी बंद पाडू नये असे वक्तव्य पवारांनी केले होते. त्याचा संदर्भ घेऊन खडसे अजित पवारांना म्हणाले की, दादा, तुम्ही थोडे ऐकून घेत जा. कालच पवारसाहेबांनी सर्वपक्षीय नेत्यांच्या कार्यक्रमात संसद, विधानसभा बंद पाडू नका असे सांगितले आहे. आणि त्यांच्या वक्तव्याला तुम्हीच सर्वप्रथम छेद देत आहात हे बरोबर नाही. तुम्ही तुमच्या काकांकडून याबाबत आदर्श घ्या असा शालजोडा हाणला व सभागृहातील वातावरण थोडे हलके-फुलके झाले.
दरम्यान, शेतक-यांना दिल्या जाणा-या मदतीवरून विरोधकांनी सरकारवर हल्लाबोल केला आहे. आत्महत्या केलेल्या शेतक-यांना केवळ 1 रूपयाचे अनुदान दिल्याचे छापल्याचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी लक्षात दिले. यानंतर विरोधकांनी सभागृहात एकच गदारोळ केला. ती प्रिटिंग मिस्टेक असल्याचे सांगत आत्महत्या केलेल्या शेतक-यांच्या कुटुंबियांना सरकारने 1 लाख रूपये दिल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. यानंतर विरोध पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी चुकीची छपाई करणा-या अधिका-यांवर कारवाई करण्याची मागणी केली. शेतक-यांना संपूर्ण कर्जमाफी हवी असे सांगत विरोधकांनी सभात्याग केला.
विधिमंडळ अधिवेशनाच्या काँग्रेस आमदारांनी शेतक-यांना सरकारने कर्जमाफी जाहीर करावी या मागणीसाठी टाळ पिटत ‘हरिओम विठ्ठला’चा गजर लावून विठ्ठलाला कर्जमाफीसाठी साकडे घातले होते. काँग्रेसच्या आमदारांनी डोक्यावर गांधी टोपी घालून टाळ पिटत विठ्ठलाचा गजर केला. ‘विठ्ठला विठ्ठला शेतकर्‍यांना वाचव रे विठ्ठला, सरकार घालव रे विठ्ठला, देवेंद्रला घालव रे विठ्ठला’ असे म्हणत टाळ पिटत काँग्रेस आमदारांनी विधान भवनात आंदोलन केले. जोपर्यंत राज्य सरकार शेतकर्‍यांना कर्जमाफी जाहीर करीत नाही तोपर्यंत आम्ही विधानसभेचे काम चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, शिवसेनेच्या आमदारांनी राज्याचे महाधिवक्ता श्रीहरी अणे यांच्याविरोधात विधानभवनाबाहेर आंदोलन केले. अखंड महाराष्ट्राच्या विभाजनाची भूमिका मांडणारे अणे यांना तत्काळ पदमुक्त करावे अशी मागणी शिवसेनेने लावून धरली. याला काँग्रेस-राष्ट्रवादीने पाठिंबा दिला. श्रीहरी अणे यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव आणणार असल्याचे शिवसेना आमदारांनी सांगितले.
पुढे पाहा, श्रीहरी अणेंच्या विरोधात शिवसेनेचे आंदोलन...
बातम्या आणखी आहेत...