आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

थांबा, शरद पवारांचा सल्ला घेतो, एकनाथ खडसेंचा विरोधकांना टोला

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - ‘सत्तर हजार कोटींची कर्जमाफी केल्यानंतरही आत्महत्या का थांबू शकल्या नाहीत?’ या प्रश्नावर ‘शरद पवार यांचे मार्गदर्शन घेणार आहोत,’ असा चिमटा कृषिमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी कर्जमाफीच्या मुद्द्यावर विधान परिषदेत आक्रमक झालेल्या विरोधकांना काढला.

सकाळी कामकाज सुरू होताक्षणी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या सदस्यांनी गोंधळ सुरू केला आणि त्यामुळे अवघ्या सात मिनिटांतच कामकाज तहकूब करावे लागले. त्यानंतरही विरोधकांचा गोंधळ न संपल्याने टप्प्याटप्प्याने चार वेळा विधान परिषदेचे कामकाज तहकूब झाले. अखेरीस दुपारी १ वाजून ५२ मिनिटांनी दिवसभरासाठी कामकाज तहकूब करण्यात आले. हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्याच आठवड्यातील पाचही दिवस विधान परिषदेत पूर्ण काळ काम होऊ शकले नाही.
सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी काम सुरू करताच विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी ‘कर्जमाफीशिवाय चर्चा होणार नाही,’ असा धोशा लावला. काँग्रेसचे गटनेते माणिकराव ठाकरे यांनी अशीच भूमिका घेतली. त्या वेळी खडसे यांनी पवारांच्या दिल्लीत झालेल्या अमृतमहोत्सवी सत्काराचा दाखला दिला. मुंडे यांना उद्देशून खडसे म्हणाले, ‘पवारांनी कालच्या भाषणात सांगितले की, संसदेचे कामकाज नीट चालले तर देश चालेल; पण तुम्ही पवारांचेही ऐकत नसाल तर दुर्दैव आहे.’ मात्र ‘पवार कृषिमंत्री असताना त्यांनी सत्तर हजार कोटींची कर्जमाफी दिली’, असे प्रत्युत्तर मुंडे यांनी दिले. त्यावर खडसे म्हणाले, ‘सत्तर हजार कोटींची कर्जमाफी दिल्यानंतरही शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबल्या का? त्या का थांबल्या नाहीत हे जाणून घेण्यासाठी मी शरद पवारांचे मार्गदर्शन घेणार आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीच्या १५ वर्षांच्या कारकीर्दीचे पाप आम्ही फेडतो आहोत. शेतकऱ्यांच्या समस्या संपाव्यात, आत्महत्या थांबाव्यात यासाठी सरकार गंभीर आहे. चर्चेतूनच यावर मार्ग काढता येईल. परंतु विरोधकांना केवळ राजकारण करण्यात रस आहे,’ असे खडसे म्हणाले.
एक रुपयाचे अनुदान ही तर आत्महत्याग्रस्तांची चेष्टाच
तारांकित प्रश्नोत्तरांच्या यादीमध्ये आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना ‘एक रुपये’ सानुग्रह अनुदान दिल्याचे उत्तर छापण्यात आले होते. सदस्यांनी ही बाब सभापतींच्या निदर्शनास आणून दिली. या चुकीबद्दल एकनाथ खडसे यांच्या माफीची मागणी विरोधकांनी केली. त्यावर सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांनी ही प्रिंटिंग मिस्टेक आहे की सरकारकडून झालेली चूक, याचा अहवाल सोमवारी ठेवण्यात येईल, असे सांगून विषयावर पडदा टाकला.