आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

इतकी वर्षे खरंच मी निगरगट्टासारखा पाहत हाेताे, नाना पाटेकरांची जाहीर कबुली

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘मी इतकी वर्षे निगरगट्टासारखा, निर्लज्जपणे हे सारे पाहत होतो. आता असह्य झाले म्हणून आलोय. मला माझीच किळस वाटतेय. अगदी वाईट शब्दांत सांगायचे तर इतकी वर्षे कुठे झक मारत होतो, हे मलाच कळत नाही. मी माझ्या कोशातच वावरत होतो. माझ्याच संवेदना बोथट झाल्या असतील तर काय?’. .अशी प्रांजळ कबुली प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांनी साेमवारी दिली.
अात्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत वाटपाच्या कार्यक्रमानंतर ते प्रसार माध्यमांशी संवाद साधत होते. ‘मागील अनेक वर्षांपासून शेतकरी आत्महत्या सुरू आहेत. तुम्ही आता कुठल्या प्रेरणेतून आलात?’ हा विचारलेला प्रश्न नानांना जिव्हारी लागलेला दिसला. ‘तुमचा प्रश्न अगदी योग्य आहे,’ असे नमूद करून नाना म्हणाले, ‘इतकी वर्षे मी या कार्यात का आलो नाही, हा प्रश्न मलाही पडतोय.

माझा हा गुन्हा क्षमा मागण्याइतका छोटा नाही. माझ्या आजूबाजूला जाणीव करून देणारी मक्यासारखी (मकरंद अनासपुरे) मंडळी आहेत, हे माझे नशीब आहे. विदर्भातीलच आमटे कुटुंबीयांनी वंचितांसाठी आपले अख्खे आयुष्य वेचले. त्यांचे कार्य खरेच प्रेरणादायी आहे,’ असा उल्लेख त्यांनी या वेळी केला.

अपराध फेडतोय
‘शहरात १५ हजारांंचा बूट, पाच हजारांचा शर्ट घेणारे लोक आहेत. शेतकऱ्यांना हेक्टरी १,५०० रुपयांची मदत दिली जाते. खर्च पाहिला तर ३० हजार रुपये. शेतकरी विधवांची ही अवस्था पाहिल्यावर मलाच अपराधी वाटते. त्या भावनेतूनच अपराध फेडण्याचे प्रयत्न करतो आहे. आम्हाला काही राजकारणात जायचे नाही. आम्ही वरूनच निवडून आलोय. ही माणुसकीची मशाल अशीच पेटवत ठेवयाची आहे,’ अशा भावना अभिनेते मकरंद अनासपुरे यांनी व्यक्त केल्या.

निर्लज्ज माजी मंत्री : यापूर्वीच्या सरकारनेही शेतकऱ्यांना मदत केली. पण मधल्या मध्ये ती गायब झाली. त्यामुळे मधल्या माणसाची मानगूट आम्ही कधी धरणार? ती धरायची की नाही?.. आरोप अजून सिद्ध झाले नाहीत म्हणून निर्लज्जासारखे काही माजी मंत्री कोट्यवधीची मालमत्ता घेऊन बसले आहेत. त्यांना हे कसं दिसत नाही? अशा संतप्त भावनाही नाना यांनी बोलून दाखवल्या.

६२ कुटुंबीयांना मदत
नाना पाटेकर, मकरंद अनासपुरे यांच्या पुढाकाराने गोळा झालेल्या निधीतून यवतमाळ आणि वर्धा जिल्ह्यातील ६२ शेतकरी विधवांना प्रत्येकी १५ हजार रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली. जनमंच या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने नागपुरात या कार्यक्रमाचे अायाेजन करण्यात अाले हाेते. ‘एकाच वेळी माझ्या इतक्या मुली विधवा झाल्या असे वाटते. माझ्या जावयाने आत्महत्या केल्यावर घरी आलेल्या मुलीला मी बघू शकलो असतो काय? असा प्रश्न मला पडतो. अर्थात त्यासाठी ती माझीच मुलगी असायला हवी काय? असेही वाटते,’ हे सांगताना नानांचा कंठ दाटून अाला.