आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीक्षाभूमी प्रेरणा देत राहील : माेदी; डाॅ. बाबासाहेब अांबेडकरांच्या जयंतीदिनी नागपुरात अभिवादन

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- ‘भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची नागपुरातील दीक्षाभूमी कोट्यवधी भारतीयांना निश्चितच प्रेरणा देत राहील,’ या भावना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी दीक्षाभूमीवर व्यक्त केल्या. आपल्या २० मिनिटांच्या वास्तव्यात मोदींनी दीक्षाभूमीवरील विकासकामांची माहिती जाणून घेताना काही सूचनादेखील केल्या.  

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२६ व्या जयंतीनिमित्त पंतप्रधान मोदी यांनी दीक्षाभूमीला भेट देऊन त्यांच्या स्मृतींना अभिवादन केले. राज्यपाल सी. विद्यासागर राव, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मनुष्यबळ विकासमंत्री प्रकाश जावडेकर, सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले, खासदार कृपाल तुमाने या वेळी त्यांच्यासमवेत होते. मोदींचे आगमन होताच दीक्षाभूमी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांनी त्यांचे स्वागत केले. यानंतर पंतप्रधानांनी डॉ. आंबेडकर यांच्या अस्थिकलशाला पुष्पार्पण करून अभिवादन केले व परिक्रमा केली. भगवान गौतम बुद्ध यांच्या पुतळ्यास पुष्पार्पण केल्यानंतर मोदी यांनी काही मिनिटे ध्यानसाधना केली. दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष भदंत आर्य नागार्जुन सुरई ससई, सचिव सदानंद फुलझेले यांनी पंतप्रधानांंचा सत्कार केला. यानंतर मोदी यांनी दीक्षाभूमी स्तुपाची पाहणी करून माहिती घेतली.  

लोकांची गैरसोय नको...
आंबेडकरांच्या जयंतीनिमित्ताने दीक्षाभूमीवर अभिवादनासाठी लोकांची मोठी गर्दी होते. मात्र, आपल्या येण्यामुळे लोकांची गैरसोय झाली काय, असा प्रश्न मोदी यांनी स्मारक समितीचे विश्वस्त विलास गजघाटे यांना केला. त्या वेळी गजघाटे यांनी ‘आपण आमचे पाहुणे आहात, त्यामुळे लोकांची कुठलीही गैरसोय झालेली नाही,’ असे सांगितले. तथापि, मोदींच्या दीक्षाभूमी भेटीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण परिसर सुरक्षा व्यवस्थेच्या घेऱ्यात होता. अर्धा तास या परिसरात लोकांना प्रवेश नाकारण्यात आला होता. परिसराला लागून दोन मार्ग बंद ठेवण्यात आले होते. पंतप्रधानांच्या प्रस्थानानंतर ते लगेच खुले करण्यात आले.
   
येथे प्रसन्न वाटतेय...
‘दीक्षाभूमी येथे आज डॉ. आंबेडकर यांना अादरांजली अर्पण करण्याचे सौभाग्य आपणास मिळाले. यामुळे अत्यंत प्रसन्न वाटत आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची ही दीक्षाभूमी निश्चितच कोट्यवधी भारतीयांना प्रेरणा देत राहील,’ अशा भावना मोदी यांनी अभ्यागतांच्या नोंदवहीत नोंदविल्या.

निधीची कमतरता नाही...
दीक्षाभूमीच्या विकासाबाबत योजनांची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.  या वेळी दीक्षाभूमीवरील विद्युतीकरणाची नवी योजना तयार करण्याची सूचना मोदी यांनी केली. विकासासाठी निधीची कुठलीही कमतरता पडणार नाही, असा शब्द माेदींनी दिला.   
बातम्या आणखी आहेत...