आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुस्ती स्पर्धा: नासीरच्या कुंदे डावामुळे विक्रांत चीत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
छायाचित्र : विजेतेपदासाठी नासीर आणि विक्रांतने तुल्यबळ झुंज दिली.
अमरावती - गेल्या काही दिवसांपासून अमरावती अन् बडनेरावासीयांच्या उत्सुकतेचा विषय ठरलेली युवा स्वाभिमानच्या राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेतील एक लाखाची कुस्ती केवळ काहीच सेकंदात आटोपली. दिल्ली येथील नासीर पहिलवान आणि गत रविवारी राज्यातील प्रतिष्ठेच्या महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत उपविजेता राहिलेला मुंबई पूर्वचा रांगडा पहिलवान विक्रांत जाधव यांच्यातील या रोमांचक अन् वेगवान कुस्तीचा निकाल केवळ १३ सेकंदांत लागला. दोन्ही मातब्बर मल्लांनी हातमिळवणी केल्यानंतर क्षणाचाही विलंब करता आक्रमक पवित्रा धारण केला. विक्रांतने ठेंगण्या बांध्याच्या नासीरला अलगद उचलून आखाड्याच्या एका बाजूला नेले. त्याला खालीही आपटले. बांगडी डाव मारून चीत करण्यासाठी पूर्ण जोर लावला. मात्र, संधीचा लाभ घेत नासीरने कुंदे डाव मारून सरळ विक्रांतला चीत केले, अन् अत्यानंदात एक हात वर करून हवेत उडी मारली. त्या वेळी २० हजार लोकांनी एकच जल्लाेष केला. संपूर्ण मैदानावर शाब्बास रे पठ्ठे, असे उत्साहाचे स्वर ऐकू येत होते. तिकडे विक्रांतचा आपण चीत झालो यावर विश्वासच बसत नव्हता. जोवर दोनपैकी एक पहिलवान चीत होत नाही तोवर ही कुस्ती रंगणार होती.
क्षणांत प्रेक्षक जल्लोष करत सरळ आखाड्यात आले अन् विजयी वीर नासीरला खांद्यावर घेऊन मुख्य द्वारापर्यंत घेऊन गेले. या सामन्यात आंतरराष्ट्रीय पंच दत्ता माने यांनी पंचगिरी केली, तर तांत्रिक समितीत समावेश असलेले आंतरराष्ट्रीय पंच प्रा. संजय तीरथकर, लक्ष्मीशंकर यादव, रणवीरसिंग राहल, शरद कचरे, प्रा. मनोज तायडे, जितेंद्र भुयार बाकावर बसून लढतीचे निरीक्षण करत होते. विजयी नासीरला ७५ हजार तर विक्रांतला २५ हजाराचे रोख पारितोषिक देण्यात आले. बुधवारी दिल्लीचा राष्ट्रीय पहिलवान संदीप कुमारशी नासीरला दोन हात करावे लागतील. या स्पर्धेच्या निमित्ताने सर्वसामान्यांचे कुस्तीबद्दल अजूनही आकर्षण कायम असल्याची पावती मिळाली. लढतीपूर्वी युवा स्वाभिमान पक्षाचे प्रमुख बडनेराचे आमदार रवी राणा यांनी दोन्ही दिग्गज पहिलवानांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या. याप्रसंगी मंचावर नवनीत राणा, अमरावती मनपा स्थायी समिती सभापती विलास इंगोले, विदर्भ हौशी कबड्डी संघटनेचे सचिव जितू ठाकूर, सुगंधचंद गुप्ता अन्य मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते. तत्पूर्वी माजी विदर्भ केसरी अमरावती जिल्ह्याचे नाव कुस्तीत गाजवणाऱ्या इशाक पहिलवानांसारख्या ज्येष्ठांनी दोन्ही मल्लांना आशीर्वाद दिले.

युवादिन जिजाऊ जयंतीनिमित्त बेरोजगारांना साहित्याचे वाटप : युवािदन राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या जयंतीचे औचित्य साधून कुस्ती स्पर्धेच्या उद्घाटन समारंभात बेरोजगारांना हातगाड्या, खटले तर महिलांना शिलाई मशीनचे वाटप करण्यात आले. बुधवारी शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली जाणार अाहे.

२०० ज्येष्ठ मल्लांचा सत्कार : अमरावती जिल्ह्यात कुस्ती या खेळाची सर्वसामान्यांमध्ये आवड निर्माण करणाऱ्या २०० ज्येष्ठ मल्लांचा युवा स्वाभिमान पक्षातर्फे सत्कार करण्यात आला. कोणत्याही मोठ्या व्यक्तीला आमंत्रित करण्याऐवजी कुस्ती या खेळाची पूर्ण जाण असलेल्यांच्या उपस्थितीतच स्पर्धेला सुरुवात करायची हाच यामागील मुख्य उद्देश होता.

अन्य लढतींचे निकाल : अब्दुल कयुम अमरावती मात निखिल गाेंडाणे अमरावती, दानीस अहमद अमरावती मात शुभम इंगळे अकोला, प्रकाश डोके अमरावती मात आकाश गुजर अंजनगाव, पंकज माधवे अकोला मात अर्जुनसिंग राहल अमरावती, बाळाजी एलगुंदे सोलापूर मात मंजित कुमार हरियाणा, विलास गवई दर्यापूर मात गोलू फिरोझ अमरावती, विनोद गायकवाड वाशीम मात शेख जबीर अमरावती, नदीम खान अमरावती मात बालाजी एलगुंदे, सोलापूर, आदिल खान अमरावती मात विठ्ठल पहिलवान हिंगोली.

पुढे काय?
संपूर्णजिल्ह्यात कुस्तीला पोषक वातावरणाची निर्मिती व्हावी,यासाठी सतत कुस्ती स्पर्धांचे आयोजन केले जाईल.अमरावती जिल्ह्यातूनही महाराष्ट्र केसरी पहिलवान घडावा या उद्देशाने ३० व्यायामशाळांना १.५ कोटी रुपयांच्या व्यायाम साहित्याचे वाटप करण्यात आले.

भारत-पाक कुस्तीचे आयोजन करणार
शासनाच्या मान्यतेने पुढच्या वर्षी भारत-पाक कुस्ती स्पर्धेचे आयोजन केले जाईल. जेणेकरून कुस्ती या खेळाबद्दल अमरावती जिल्ह्यात पोषक वातावरणाची निर्मिती होईल. तसेच भारतीय उपखंडातील दणकट पहिलवानांच्या कुस्त्या सर्वसामान्यांना बघता येतील, अशी माहिती युवा स्वाभिमानचे प्रमुख आमदार रवी राणा यांनी दिली.

बातम्या आणखी आहेत...