आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘मैत्रेय’ प्रकरण: अकरा जिल्ह्यातील पोलिसांना नाशिक पोलिसांचे मार्गदर्शन

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गतवर्षी राज्यात १० जिल्ह्यांत ‘मैत्रेय’ विरुद्ध फसवणुकीचे ११ गुन्हे दाखल झाले. यामध्ये बुलडाणा, यवतमाळ, धुळे नंदुरबार जिल्ह्यात दाखल असलेल्या गुन्ह्यांचे तपास नाशिक शहर पोलिसांकडे वर्ग करावे तसेच इतर सात गुन्ह्यांमध्ये संबधित पोलिसांना तपासामध्ये नाशिक शहर पोलिसांनी मार्गदर्शन करावे, असे आदेश राज्याचे विशेष पोलिस महानिरीक्षक (कायदा सुव्यवस्था) यांनी मागील महीन्यात दिले आहे. त्यामुळे आता राज्यातील ‘मैत्रेय’च्या तपासाचे सूत्रधार नाशिक शहर पोलिस राहणार अाहे. 

गुंतवणूक करणाऱ्या गुंतवणूकदारांना भुखंड, विमा कवच अन्य सुविधा देण्याचे आमिष दाखवून मैत्रेयकडून राज्यभरातील लाखो गुंतवणूकदारांनी पोलिसात तक्रार दिल्या आहे. यामध्ये कोट्यवधींची फसवणूक झाल्याचेही तक्रारदारांनी नमूद केले आहे. २०१६ मध्ये मुंबईमध्ये बोरिवली आर्थीक गुन्हे शाखा युनिट क्रमांक ७, अमरावती शहरात कोतवाली पोलिस ठाणे, अकोला येथे रामदास पेठ, परभणी येथे नानलपेठ, बीडमध्ये शिवाजीनगर आणि वर्धा येथे रामनगर या ठिकाणी दाखल असलेल्या सात गुन्ह्यांसह बुलडाणा येथे बुलडाणा शहर ठाणे, यवतमाळ येथे यवतमाळ शहर, धुळे येथे धुळे शहर नंदुरबार येथे नंदुरबार शहर ठाण्यात गुन्हे दाखल आहे. मागील वर्षभरापासून हे तपास त्या त्या ठिकाणी सुरू होते, मात्र जुलै २०१७ मध्ये विशेष पोलिस महानिरीक्षक यांनी बुलडाणा, यवतमाळ, धुळे नंदुरबारचा तपास नाशिक पोलिस आयुक्तांकडे देण्याबाबत सूचना देवून या चारही जिल्हा पोलिस अधीक्षकांनी मैत्रेय प्रकरणाचे कागदपत्र नाशिक पोलिस आयुक्तांकडे सोपवण्याचेही आदेशात नमूद केले आहे. तसेच उर्वरित सात प्रकरणांमध्ये तपास करतेवेळी नाशिक पोलिस आयुक्तांचे मार्गदर्शन घ्यावे, असे सुचवले आहे. या सात प्रकरणाच्या तपासी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांना मार्गदर्शन करण्याबाबत सांगण्यात आले आहे.
 
अमरावती पोलिसांकडून १२७ कोटींची मालमत्ता उघड
अमरावतीच्या शहर कोतवाली पोलिस ठाण्यात मैत्रेयविरुद्ध गुन्हा दाखल आहे. या प्रकरणाचा तपास आर्थीक गुन्हे शाखेकडे वर्ग केला आहे. आर्थिक गुन्हे शाखा पोलिसांनी आतापर्यंत मैत्रेयची सुमारे १२७ कोटी रुपयांची मालमत्ता उघड केली. या प्रकरणातील तक्रारदारांची संख्या ४० हजारांवर पोहोचली असून, त्यांची जवळपास ४२ कोटी रुपयांनी फसवणूक झाल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. आर्थिक गुन्हे शाखा पेालिसांनी याप्रकरणात एक ‘चार्जशीट’ही दाखल केली आहे. आतापर्यंत उघड झालेल्या मालमत्तेवर निर्णय घेण्यासाठी सक्षम प्राधिकारी नेमण्यात यावा, यासंदर्भात जिल्हाधिकाऱ्यांसोबत पत्रव्यवहारसुध्दा केला आहे. मात्र अद्याप मैत्रेयमध्ये सक्षम प्राधिकारी नियुक्त झालेला नाही, अशी माहिती आर्थिक गुन्हे शाखा, अमरावती यांच्याकडून प्राप्त झाली आहे. 

अडचण आल्यास आम्ही मार्गदर्शन करणार 
‘मैत्रेय’प्रकरणात राज्यात ज्या ठिकाणी गुन्हे दाखल आहेत, त्यांना काही अडचण असल्यास त्यांना आम्ही मार्गदर्शन करणार आहोत. तसे आदेश आम्हाला पोलिस महासंचालक कार्यालयाकडून प्राप्त झाले आहे. 
- विजय पन्हाळे, पोलिस निरीक्षक, आर्थिक गुन्हे शाखा, नाशिक शहर. 
बातम्या आणखी आहेत...