आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • National Samaj Party President Mahadev Jankar Statement

प्रसंगी काँग्रेसशी दाेस्ती, पण पंकजांना सीएम करीन: रासप अध्यक्ष जानकर

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
देऊळगावराजा- राज्याचा पुढचा मुख्यमंत्री काेण असेल हे महादेव जानकर ठरवणार असून भाजपने जर पंकजा मुंडे यांना मुख्यमंत्री केले तर ठीक, नाही तर पंकजा यांना मुख्यमंत्री मी करणार, हे भाजपने विसरता कामा नये. त्यासाठी उद्धव ठाकरे यांच्या पाया पडेन. एेनवेळी राहुल गांधींशी दोस्ती करीन; पण मुख्यमंत्री आमच्या भगिनी पंकजा मुंडे यांनाच करणार असल्याचे राष्ट्रीय समाज पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष महादेव जानकर यांनी सोमवारी सांगितले.
देऊळगावराजा येथील राजयोगी प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित शेतकरी मेळाव्यात ते बोलत होते. जानकर म्हणाले, ‘आमदार, खासदार होणे हे साेपे आहे; पण नेता होणे फार अवघड आहे. देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे नेते नसून फक्त मुख्यमंत्री आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादीने घोटाळे केले. म्हणून जनतेने भाजपला मदत दिली; पण त्यांचाही दीड वर्षाचा अनुभव काही बरा नाही. जी माणसे आम्हाला हसत होती तीच आज सत्कारासाठी उभी आहेत. उपेक्षित समाज अपेक्षित ठिकाणी जात आहे हेच राष्ट्रीय समाज पक्षाचे ध्येय आहे. यासाठी शेतकऱ्यांनी शेतीला पूरक असा जोडधंदा उभारला पाहिजे. इच्छाशक्ती निर्माण करून प्रत्येक क्षेत्रात उतरा आणि बहुजन समाजाची उन्नती साधा’, असेही ते म्हणाले. यानिमित्ताने मंत्रिपदासाठी झुलवत ठेवणाऱ्या भाजपवर टीकेची संधी जानकरांनी साधली.
विकासासाठी वेगळा विदर्भ व्हायलाच हवा
विदर्भामध्ये विधिमंडळ, कोर्ट, कोळसा उत्पादन आहे. येथे कर जास्त येतो. त्यामुळे या प्रांताचा विकास होण्यासाठी छोटी राज्ये व्हावीत, अशी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका होती. संयुक्त महाराष्ट्राचा दाखला देण्यात काही अर्थ नाही. विदर्भाचा ज्या पद्धतीने विकास व्हायला पाहिजे तो झाला नाही. त्यामुळे विदर्भ राज्य व्हावे ही राष्ट्रीय समाज पक्षाची भूमिका असल्याचे जानकर यांनी सांगितले.