आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्यांच्या आंदोलनात नक्षल समर्थकांचा शिरकाव, सरकारविराेधी पत्रकांचे वाटप

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - नक्षलवाद्यांच्या फ्रंटल संघटनांनी राज्यातील शेतकऱ्यांच्या आंदोलनातही शिरकाव केल्याच्या माहितीने सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. या संघटनांवर सध्या कुठलीही कारवाई होणार नसली तरी त्यांच्यावर आम्ही वॉच ठेवला असल्याची माहिती नक्षल विरोधी अभियानातील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने ‘दिव्य मराठी’शी बोलताना दिली.
 
राज्यात कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांचे तीव्र आंदोलन सुरू असताना मागील आठवड्यात नागपुरात नक्षलवादी समर्थक संघटनेकडून आक्षेपार्ह मजकूर असलेल्या पत्रकांचे वितरण करण्यात आल्याची माहिती नक्षल विरोधी अभियानाला मिळाली आहे. नागपुरातील कॉटन मार्केट तसेच कळमना मार्केट यार्ड परिसरात माल विकण्यासाठी येणाऱ्या शेतकऱ्यांना या संघटनेच्या कार्यकर्त्यांकडून आक्षेपार्ह पत्रकांचे वितरण झाले.

या पत्रकात शेतकरी, शेतमजूर आणि असंघटित क्षेत्रातील लोकांनी एका मंचावर येऊन संघर्ष तीव्र करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शेतकऱ्यांच्या आठ कलमी मागण्यांचा उल्लेख पत्रकात असून मागण्यांमध्ये स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींच्या अंमलबजावणीचा आवर्जुन उल्लेख करण्यात आला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीसह सवलतीच्या दरात वीज पुरवठा, आधुनिक उपकरणे देण्यात यावी, यासह अनेक मागण्यांचा समावेश आहे. केंद्रातील मोदी आणि राज्यातील फडणवीस सरकार बड्या उद्योगपतींसाठी कार्यरत असून शेतकरी दुर्लक्षित होत असल्याचा आरोप पत्रकात करण्यात आला आहे.  
 
यासंदर्भात नक्षल विरोधी अभियानातील अधिकाऱ्याने बोलताना सांगितले की, नागपुरात वितरित करण्यात आलेल्या आक्षेपार्ह पत्रकांची माहिती घेण्यात आली आहे. तूर्तास या संघटनेवर कुठलीही कारवाई होणार नसली तरी संघटनेच्या कारवायांवर आमचा वॉच आहे. छत्तीसगडमधील कांकेर जिल्ह्यातही अशा स्वरुपाची पत्रके वितरित करण्यात आल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे यामागे त्यांचा नेमका काय उद्देश आहे, हे जाणून घेण्याचा आमचा प्रयत्न सुरू असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.