अमरावती - नोटबंदीमुळे शेतकरी, शेतमजूर, कामगार, गृहिणी सर्वसामान्यांचे हाल वाढले आहेत. त्यांचा त्रास कमी करण्यासाठी केंद्र राज्य सरकारने नोटबंदीवर लवकर मार्ग शोधावा, अशी मागणी जिल्हाधिकाऱ्यांना सादर केलेल्या निवेदनात राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी केली.
राष्ट्रवादी काँग्रेसने आधी भव्य मोर्चा काढणार असे जाहीर केल्यानंतरही अचानक धरणे आंदोलन करण्याचा घेतलेला निर्णय सर्वसामान्यांना चकित करणारा होता. इर्विन चौकातील डाॅ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ मोजकेच पदाधिकारी कार्यकर्ते गोळा झाले. त्यानंतर दुपारी १.३० च्या सुमारास आंदोलनकर्ते जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले. जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत नोटबंदीमुळे सर्वसामान्यांचे फार हाल होत आहेत. लोक त्रस्त झाले आहेत. लवकर यातून मार्ग काढा असे राकाँ पदाधिकाऱ्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिले. त्यावेळी तुमच्या मागण्या शासनापर्यंत पोहोचवतो असे जिल्हाधिकारी म्हणाले.
देशाच्या अर्थ व्यवस्थेतील काळा पैसा नष्ट करण्याच्या उद्देशाने पंतप्रधानांनी नोव्हे. २०१६ रोजी ५०० हजार रु.च्या जुन्या नोटा चलनातून रद्द केल्या. देशाच्या आर्थिक स्थैर्यासाठी काळा पैसा नष्ट केला जात असेल तर उत्तमच असे समजून या निर्णयाचे राष्ट्रवादी काँग्रेसने स्वागत केले होते. परंतु, दुर्दैवाने एवढा महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी भविष्यात निर्माण होणाऱ्या परिस्थितीची कोणतीही पूर्व तयारी करण्यात आली नव्हती. अत्यंत गोंधळलेल्या स्थितीत देशातील कोट्यवधी नागरिकांना प्रचंड आर्थिक ताण सोसावा लागला. यात देशातील कृषीविषयक आघाडी पूर्णपणे विस्कळीत झाली. सर्वसामान्य शेतकरी, कष्टकरी, असंघटीत कामगार तसेच मोल मजुरी करणाऱ्यांचे हाल होत आहेत. शेतकऱ्यांना आवश्यक असलेल्या हंगामातील पेरण्यांसाठी बी-बियाणे, खते औषध मिळणे दुरापास्त झाले आहे. आधीच्या हंगामातील पिके हाताशी आलेली असता रोखीचे व्यवहार थांबले. शेतमालाचे भाव कोसळले, कापूस, सोयाबीनपासून इतर पिके, फळे भाज्या हे बाजारात उठाव नसल्याने कवडी मोल किंमतीला द्यावे लागले. अाधीची चार वर्षे सतत दुष्काळाशी सामना केल्याने हाती आलेल्या पिकाचा मोबदला मिळाल्याने शेतकरी हवालदील झाला.
देशात एकप्रकारे आर्थिक आणिबाणीसारखी स्थिती निर्माण झाली आहे. ज्या उद्देशाने हा निर्णय घेतला तो बाजूला राहून सर्वसामान्यांचे जीवन उद्ध्वस्त झाले आहे. यासाठी व्यापक जन आंदोलनाच्या माध्यमातून सर्व सामान्यांची शक्ती एकत्र करून ही परिस्थिती सुधारण्यासाठी केंद्र सरकारला तातडीने भाग पाडायला लावण्याकरिता हे जनआंदोलन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने हाती घेतले आहे, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. याप्रसंगी राकाँ शहर अध्यक्ष बाबा राठोड, सुनील वऱ्हाडे, शरद तसरे, विजय भैसे, भास्कर ठाकरे, अॅड. बाबुराव बेलसरे, प्रविण मेश्राम, प्रल्हाद सुंदरकर, जनराव डहाके, नीलिमा महल्ले, अरुण गावंडे, मनोहर गुल्हाने, गजानन रेवाळकर, सैयद शकील, विजय बाभुळकर, स्मिता घोंगारे, जावेद साबीर, दुर्गाबक्षसिंह ठाकूर, ज्योती वानखडे, सुचिता वणवे, विनोद तलवारे, मोहन जाखड, फिरदोस गाझी, आनंद गुल्हाने इतर कार्यकर्ते उपस्थित होते.
मोर्चाऐवजी धरणे
राष्ट्रवादीकाँग्रेस नोटबंदीच्या विरोधात सर्वसामान्यांच्या हितासाठी भव्य मोर्चा काढणार अशी घोषणा करण्यात आली होती. आचार संहिता लागू झाल्यामुळेच ऐनवेळी निर्णय बदलून धरणे देण्याचा निर्णय घेतला. सोबतच पोलिसांनी मोर्चाला परवानगी नाकारली,अशी माहिती राकाँ पदाधिकाऱ्यांनी दिली.