आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘नूतन’चा अमानवीय चेहरा झाला उघड

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - नूतन विदर्भ शिक्षण मंडळाने नवीन शिक्षण सेवकांच्या “मलाईदार’ नियुक्तीसाठी संस्थेतील दहा मागासवर्गीय कायम शिक्षकांची बडतर्फी केल्याचा प्रकार उघडकीस आल्याने संस्थेचा ‘अमानवीय’ चेहरा जगासमोर आला आहे.
नूतन विदर्भ शिक्षण मंडळाची ‘व्हाईट काॅलर’ची प्रतिमा गैरव्यवहारने बरबटली असून, शिक्षण सेवकांच्या भरतीसाठी संस्थेतील कायम शिक्षकांचेही बळी दिल्याचे वास्तव समाेर आले आहे. कर्मचाऱ्यांना काेणत्याही प्रकरणात षड् यंत्र करून अडकावयाचे त्याच्या रिक्त जागी नवीन भरती करायची या याेजनेतूनच मागासवर्गीय कर्मचाऱ्यांना लक्ष्य करण्यात आले. राज्य शासनाने अनुसूचित जमातीमधील वेगवेगळ्या जातींना प्रमाणपत्रे दिलीत, मात्र पुन्हा पुन्हा शासनाने भूमिका बदलली. या गाेंधळात ज्यांच्याकडे नाेकरी मिळविताना जे प्रमाणपत्र हाेते, त्यानुसार त्यांनी नाेकरी मिळवली. राज्यातल्या सर्वच विभागात जाती प्रमाणपत्रांचा गाेंधळ आहे. या परिस्थितीचा विचार करून शासनाने जात प्रमाणपत्राच्या विषयावरून काेणत्याही कर्मचाऱ्याला नाेकरीतून काढू नये, अशी मानवीय भूमिका घेतली. मात्र शिक्षकांचा छळ करणाऱ्या नूतन विदर्भ शिक्षण मंडळाने संस्थेच्या नूतन कन्या शाळा, न्यू हायस्कूल मेन न्यू हायस्कूल बेलपुरा या शाळेत कार्यरत कायम शिक्षक गावंडे, सातंगे, वाढे, निंघाेट, पाैनीकर, मिटकरी या शिक्षकांना जात प्रमाणपत्रावरून नाेकरीतून बडतर्फ केले तर काही शिक्षक-शिक्षिकेत्तर कर्मचाऱ्यांवर दबाव आणून स्वेच्छानिवृत्ती घ्यायला भाग पाडल्याची माहितीसूत्रांकडून प्राप्त झाली आहे. सेवेतील बडतर्फीला शिक्षकांनी न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने शिक्षकांची बडतर्फी चुकीची ठरवून शिक्षकांना पुन्हा सेवेत घेण्याचे आदेश दिले. संस्थेने चुकीचा पद्धतीने बडतर्फी केल्याने बडतर्फी काळातील वेतन संस्थेने द्यावे, असेही आदेशात्मक म्हटले हाेते,असे सांगितल्या जाते. उच्च न्यायालयाचे आदेश असताना देखील संस्थेने शिक्षकांना मागील वेतन देण्यास नकार दिला. संस्थेचे सचिव निनाद साेमण सहसचिव प्रदीप पात्रीकर यांनी शिक्षकांना दमदाटी करून मागील रक्कम मागणार नाही, अशी व्यवस्था केल्याची चर्चा आहे. बडतर्फी शिक्षकांचा काहीही दाेष नसताना तीन-चार वर्ष न्यायालयीन लढा द्यावा लागला तसेच १५ ते २० लाख रूपयांच्या वेतनावर पाणी साेडण्याची वेळ शिक्षकांवर आली. शिक्षण सेवक नियुक्तीसाठी कायद्याचा साेयीनुसार अर्थ लावणारे नूतन शिक्षण मंडळ बडतर्फी काळातील शिक्षकांचे वेतन कधी देते, याकडे सर्वांचे लक्ष आहे.
बातम्या आणखी आहेत...