आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतर फिटले अंधाराचे जाळे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- स्वातंत्र्याच्या ७० वर्षांनंतर गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा आणि एटापल्ली तालुक्यातील २३ अतिदुर्गम तसेच आदिवासीबहुल गावांत प्रथमच वीज पोहोचली. विजेचे दर्शन होताच आदिवासींचे चेहरे उजळून निघाले. चहुबाजूंनी जंगलाने वेढलेले २०० आदिवासी लोकसंख्येचे दुसागुडा हे गाव एटापल्ली पासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. स्वातंत्र्यानंतरची ७० वर्षांपर्यंत अंधारात आयुष्य व्यतीत केल्यानंतर आता येथील गावकऱ्यांनी प्रकाश बघितला आहे. जिल्ह्यातील २३ गावांत वीज पोहोचविण्याचे काम महावितरणने २० डिसेंबर २०१६ रोजी हाती घेतले होते. ते आता पूर्णत्वास गेले आहे. 
 
या गावांच्या विद्युतीकरणासाठी ३.०९ किलोमीटर उच्चदाब वाहिनी १.१ किलोमीटर लघुदाब वाहिनी उभारण्यात आली. दुसागुडा गावात पोहोचण्यास व्यवस्थित रस्ते नसताना देखील महावितरणच्या एटापल्ली उपविभागाने विजेचे रोहित्र तत्सम सामग्री त्याठिकाणी पोहोचवण्यात आली. चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल यांनी दुसागुडातील ग्रामस्थांशी विजेसंदर्भात चर्चा केली आणि तत्काळ वीज जोडणीसाठी सात कुटुंबीयांकडून अर्जही घेतले. त्यावर तत्काळ कार्यवाही करत त्यांना विजेची जोडणी प्रदान केली. राजू होळी, रेणू कंदेती, लालसू पुंगाटी, दलसू उसेंडी, सुधाकर गोटा, रावजी झुरी, साधू नरोटे ही या भागात पहिल्यांदा वीज घेणारी मंडळी ठरली आहेत. 
 
महावितरणच्या आलापल्ली विभागाचे कार्यकारी अभियंता अमित परांजपे यांनी चंद्रपूर परिमंडळाचे मुख्य अभियंता दिलीप घुगल गडचिरोली मंडळाचे अधीक्षक अभियंता अशोक म्हस्के, तत्कालीन प्रभारी अधीक्षक अभियंता सध्या ब्रम्हपुरी विभागाचे कार्यकारी अभियंता असलेले युवराज मेश्राम यांच्या मार्गदनाखाली दुसागुडा गावाचे विद्युतीकरण करण्यासाठी उपाययोजना करण्यात आली. 
 
गडचिरोलीच्या २३ अतिदुर्गम गावांचा अंधार झाला दूर 
धानोरातालुक्यातील मरकेगाव, पुरसलगोंदी, मांगदाटोला, रेजूटोला, किसनेली, मोठीझेलिया, लहान वडगाव, सलाईटोला, मारगिनटोला, हुराटोला, केहकावाही, धुरमुडाटोला, येरंडीटोला, भुसुमकुडो, दब्बा, रानवाही शिवगट्टा ही १७ एटापल्ली तालुक्यातील एकराटोला, कुद्री, कामके, रोपी, पैदी झुपी ही गावे अशा २३ गावांत वीज पोहोचवण्याचे काम महावितरणने केले आहे. 
बातम्या आणखी आहेत...