आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जन्मठेपेचा कैदी इर्विनमधून पळाला, सात तासानंतर रेल्वेस्टेशनवरून घेतले ताब्यात

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - मुंबईचा रहिवासी असलेला यवतमाळच्या विशेष न्यायालयाने खुन प्रकरणात जन्मठेप सुनावलेला एक कैदी अमरावती कारागृहात मागील काही महिन्यांपासून शिक्षा भोगत आहे. दरम्यान मागील दहा दिवसांपासून तो इर्विनमध्ये उपचारासाठी दाखल होता. गुरूवारी (दि. १६) दुपारी इर्विनच्या आरोपी वार्डातून हा कैदी गार्ड ड्युटीवर असलेल्या पोलिसाच्या खिशातील चाबी काढून कुलूप उघडून पसार झाला आहे. त्याचा सर्वत्र शोध सुरू असताना गुरूवारी सायंकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तो पोलिसांच्या हातात आला. 
 
शब्बीर खान जाबीर खान (४८ रा. अंधेरी वेस्ट, मंुबई) असे या जन्मठेपेच्या कैद्याचे नाव आहे. शब्बीर खानला यवतमाळच्या विशेष न्यायालयाने डिसेंबर २०१६ ला जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. त्यामुळे शिक्षा भोगण्यासाठी त्याला १२ डिसेंबर २०१६ ला अमरावतीच्या कारागृहात दाखल केले होते. शिक्षा भोगत असताना फेब्रुवारीला त्याला पोटाचा त्रास झाल्यामुळे इर्विन रुग्णालयात दाखल केले होते. त्याच्यावर उपचार सुरूच होते. इर्विनच्या वॉर्ड क्रमांक १६ मधील आरोपी वॉर्डमध्ये शब्बीर खान होता. तसेच याठिकाणी गुरूवारी पोलिस हेडकॉन्स्टेबल अब्दुल नबी, महेन्द्र मंुडाने, अजय वाघ आणि प्रफुल तंतरपाळे या चौघांची गार्ड ड्युटी होती. दरम्यान दुपारी प्रफुल तंतरपाळे हे आरोपीच्या पहाऱ्यावर होते तर उर्वरीत तिघे जेवायला गेले होते. पहाऱ्यावर असताना प्रफुल लघुशंकेसाठी गेले, त्यावेळी त्यांनी स्वत:चा शर्ट काढून ठेवला. याच संधीचा फायदा घेत शब्बीर खानने तंतरपाळे यांच्या खिशात असलेली कुलूपाची चाबी घेतली आणि आरोपी वॉर्डला असलेले कुलूप उघडून पसार झाला. अंगात असलेला कारागृहाचा शर्ट त्याने काढून ठेवला तसेच खाली असलेल्या अंतरवस्त्राला प्लॅस्टीक गंुडाळून रेल्वे स्थानकाकडे पलायन केले. अगदी भिक्षेकऱ्याचा वेश परिधान केल्यामुळे कोणालाही त्याच्यावर संशय आला नाही. माहीती मिळताच गुन्हे शाखेसह संपुर्ण आयुक्तालयाचे पोलिस त्याच्या शोधात होते मात्र तो सांयकाळी सात वाजेपर्यंत मिळाला नव्हता. दरम्यान कोतवालीचे पोलिस त्याचा शोध घेत असताना अमरावती रेल्वे स्थानकावर तो मिळून आला. त्याच ठिकाणावरून त्याला ताब्यात घेण्यात आले असून, या घटनेमुळे पोलिसांच्या कर्तव्यावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. 
 
चौकशीअंती होणार दोषींवर कारवाई 
इर्विनमधून कैदीपसार झाला होता, ही अतिशय गंभीर बाब आहे. या प्रकरणाची चौकशी करून संबधिताविरुध्द कारवाई करण्यात येणार आहे. सायंकाळी त्याला पकडण्यात आम्हाला यश आले आहे. दत्तात्रयमंडलिक, पोलिस आयुक्त अमरावती. 
बातम्या आणखी आहेत...