यवतमाळ - स्वातंत्र्य सैनिक जवाहरलाल दर्डा यांची आज 93 वी जयंती आहे. याच दिवशी काही नागरिकांनी यवतमाळमध्ये जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर तोडफोड केली आहे. जवारलाल दर्डा शिक्षण संस्थेच्या पब्लिक स्कूलमध्ये दोन शिक्षकांनी मुलींचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. या प्रकारामुळे संतप्त पालकांनी ही तोडफोड केली.
माजी खासदार विजय दर्डा या संस्थेचे अध्यक्ष आहेत. मुलींच्या लैंगिक शोषणाचे प्रकरण दडपण्याचा प्रयत्न होतोय असा आरोप पालकांनी केला आहे. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी पालक एकत्र आले होते. दरम्यान, काही नागरिकांनी स्वर्गीय जवाहरलाल दर्डा यांच्या प्रेरणास्थळावर तोडफोडही केली.
काय आहे प्रकरण..
शाळकरी मुलींचे लैंगिक शोषण केल्याप्रकरणी यवतमाळ पब्लिक स्कूलमधील दोन शिक्षकांना ताब्यात घेण्यात आले आहे. अमोल क्षीरसागर आणि यश बोरूंदीया अशी ताब्यात घेण्यात आलेल्या शिक्षकांची नावे आहेत. या शिक्षकांकडून मुलींचे लैंगिक शोषण होत असल्याची तक्रार विद्यार्थिंनीनी केली होती. हा प्रकार समजताच संतप्त पालकांनी शाळेला घेराव घातला.