आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हातात काठी घेऊन रणरागिणींनी केला तळीरामांचा ‘बंदोबस्त’

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- वसाहतीच्या प्रवेशद्वारावरील वाइन शॉप आणि दारूच्या दुकानाबाहेर असलेल्या तळीरामांच्या टोळक्यामुळे युवती, महिलांना खूप त्रास व्हायचा. हा जाच कमी करण्यासाठी महिलांनीच पुढाकार घेऊन, हाती काठी घेऊन तळीरामांचा बंदोबस्त केला. एखाद्या सिनेमातील वाटणारी ही कथा नागपुरात सत्यात उतरली आहे.

त्रिमूर्तीनगर परिसरातील सरस्वती विहार कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच एक वाइन शॉप आहे. या ठिकाणी ग्राहकांचा वाढता राबता बघून रस्त्यावरील पानठेलेचालक आणि टपरीवाल्यांनी डिस्पोजेबल ग्लास आणि पाणी पाऊच ठेवण्यास सुरुवात केली. एवढ्या ‘साेयी’ उपलब्ध झाल्याने मग रस्त्यावरच दारू ढोसण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले. त्यामुळे एकप्रकारे परिसराला ‘ओपन बार’चे स्वरूप प्राप्त झाले. परिणामी शिवीगाळ, भांडण-तंटे, छेडछाडीचे प्रकार नित्याचेच झाले. त्यातून एकमेकांवर शस्त्रहल्लेही होऊ लागले. रात्री उशिरापर्यंत हा ‘ओपन बार’ चालायचा. रिकामे ग्लास, पाणी पाऊचचे प्लास्टिक आणि इतर कचरा दारुडे रस्त्यावरच फेकायचे. त्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य निर्माण झाले. बऱ्याचदा दारुडे याच परिसरात झिंगत पडायचे आणि बऱ्याचदा शेजारील वसाहतीतही शिरायचे. त्यामुळे या वसाहतीच्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. महिला, युवतींना रस्त्याने येणे-जाणे सोडा, वसाहतीत राहणेही अशक्य होत होते. पोलिस आणि प्रशासनाकडे अनेकदा तक्रारी केल्या, मात्र त्याचा काहीही फायदा झाला नाही. अखेर या समस्येवर तोडगा काढण्यासाठी सरस्वती वसाहतीतील रणरागिणींनीच पुढाकार घेतला. चंद्रा पराते यांच्या पुढाकाराने वसाहतीतील दीडशे महिला एकत्र आल्या. या महिलांनी सरस्वती विहार महिला मंडळाची स्थापना केली आणि वाइन शॉपचे दुकान हटू शकत नसले तरी तळीरामांचा बंदोबस्त करण्याचा निर्धार केला. गेल्या काही महिन्यांपासून या महिला दररोज सकाळी ७ ते रात्री ११ वाजेपर्यंत वसाहतीमध्ये काठ्या घेऊन उभ्या राहतात. यामुळे दारुड्यांची वसाहतीत शिरण्याची हिंमत होत नाही. अनेकदा या महिलांनी काही तळीरामांना काठ्यांचा ‘प्रसाद’ही दिला आहे. महिलांच्या या धाडसाने तळीरामांना चपराक तर बसलीच शिवाय हा परिसर अस्वच्छतेपासून मुक्त झाला आहे.
‘सीसीटीव्ही’द्वारेही वॉच
त्रिमूर्तीनगर परिसरात शाळा आहेत. रस्त्यावरून महिला आणि मुलांची नेहमीच वर्दळ असते; परंतु तळीरामांमुळे महिलांना प्रचंड मनस्ताप होत होता. त्यामुळे सरस्वती कॉलनीतील महिलांत नेहमी असुरक्षिततेची भावना असायची. त्यामुळे महिलांनी पुढाकार घेऊन लढण्याचा निर्धार केला. आज महिलांच्या प्रयत्नांना यश आले आहे. महिलांनी वर्गणी गोळा करून वसाहतीत तीन सीसीटीव्ही कॅमेरेही बसवले. जेव्हा महिला काठ्या घेऊन रस्त्यावर नसतात, त्या वेळी दारुड्यांवर सीसीटीव्हीची नजर असते, अशी माहिती चंद्रा पराते यांनी दिली.