आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दुचाकीस्वार वृद्धाला भरधाव ट्रकने चिरडले, अनियंत्रीत वाहतुकीचा आणखी एक ठरला बळी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- गाडगेनगर मधून जयस्तंभ चौकात जाणाऱ्या एका ७५ वर्षीय दुचाकीस्वार वृध्दाला मागून आलेल्या भरधाव ट्रकने इर्विन चौकात चिरडले. या अपघातात दुचाकीस्वार वृध्दाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. हा अपघात सोमवारी (दि. ६) दुपारी सव्वादोन वाजताच्या सुमारास झाला. 
 
अपघात इतका भीषण होता की, दुचाकीस्वाराच्या शरीराचे मांस रस्त्यावरून अक्षरश: हाताने खरडून काढावे लागले. धडक देवून पसार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या ट्रकचालकाला नागरिकांनी पकडून पोलिसांच्या स्वाधिन केले.केशव नारायणराव दाभणे (७५, रा. पुनम स्टुडीओ गल्ली, गाडगेनगर, अमरावती) असे मृतकाचे नाव आहे. 
 
केशव दाभणे वीज वितरण कंपनीमधून यंत्रचालक पदावरून निवृत्त झाले होते. ते त्यांच्या कुटूंबासोबत मागील अनेक वर्षांपासून गाडगेनगरमध्येच राहत होते. दाभणे यांच्या घरातील ‘बोअरवेल’ची मशीन नादुरस्त झाली असल्यामुळे ते सुधारवण्यासाठी दाभणे सोमवारी दुपारी वाजताच्या सुमारास दुचाकीने (एम. एच. २७ एडी ५४३८) मशीन घेऊन जयस्तंभ चौकात येत होते. ते इर्विन चौकात आले, त्याच दरम्यान गिट्टीने भरलेला भरधाव ट्रक (सीजी ०७ सीए ६७०) कॅम्पकडून जयस्तंभच्या दिशेने जात होता. 
 
इर्विन चौकात या ट्रकने दाभने यांच्या दुचाकीला मागून जोरदार धडक दिली, या धडकेत दुचाकीचा मागील भाग चक्काचूर झाला तसेच दाभने पुढच्या भागात फेकल्या गेले. त्यामुळे या ट्रकचे चाक दाभने यांच्या डोक्यावरून तसेच मांडीवरून गेले होते.
 
गिट्टी भरलेला अख्खा ट्रकच शरीरावरून गेल्यामुळे शरीराचा काही भाग अक्षरश: रस्त्याला चिटकला होता. याचवेळी एक पोलिस कर्मचारीसुध्दा त्याच ठिकाणाहून दुचाकीने जात होता. दाभने यांच्या दुचाकीचा धक्का त्याच्या दुचाकीलालागल्यामुळे तोसुध्दा खाली कोसळला मात्र त्याला गंभीर दुखापत झाली नाही. 
 
दाभने यांना चिरडून ट्रकचालक ट्रकसह पसार होण्याच्या प्रयत्न करत होता, त्यावेळी दुचाकीवरून पडलेला पोलिस उठला नागरीकांच्या मदतीने त्याने ट्रकला पकडले. घटनेची माहीती मिळताच गस्तीवरील पोलिस तसेच कोतवाली पोलिस इर्विन चौकात दाखल झाले. मृतदेहाची अवस्था पाहून कोणीही पुढे येत नव्हते.
 
दरम्यान दोन तीन नागरीकांनीच पुढे येवून या छिन्न विछीन्न झालेल्या मृतदेहाच्या मासाचे शरीराचे तुकडे गोळा केले. त्यानंतर मृतदेह इर्विनच्या शवागृहात ठेवण्यात आला.
 
ट्रकचे चाक चेहऱ्यावरून गेल्यामुळे मृतकाची ओळख पटवने कठीण झाले होते मात्र दुचाकी क्रमांकावरून पोलिसांनी त्यांचा शोध घेतला. या प्रकरणी कोतवाली पोलिसांनी ट्रक जप्त केला असून ट्रकचालक शेख कलीम शेख कदिर (रा. आझादनगर) याच्याविरुध्द गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. 
 
केशवराव दाभने हे फ्रेजरपुरा पोलिस ठाण्यात कार्यरत असलेले एएसआय गजानन कोठेकर यांचे सासरे होते. दाभने यांना दोन मुल दोन मुली आहेत. त्यांचा थोरला मुलगा गजानन हे ग्रामिण पोलिस दलात असून दर्यापूर पोलिस ठाण्यात कार्यरत आहे तर धाकटा मुलगा संजय हे येथील मध्यवर्ती कारागृहात कार्यरत आहे. तसेच त्यांना कविता कोठेकर नलू डोईफोडे या दोन मुली आहेत.
 
दाभने यांच्या पार्थीवावर मंगळवारी (दि. ७) सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे. 
शहरात मागील अनेक दिवसांपासून वाहतूकीची मोठ्या प्रमाणात कोंडी होते. वाहनांची वाढलेली संख्या, रस्त्यांवर असणारी बजबजपुरी वाहतूक पोलिसांच्या नियंत्रणाबाहेर गेलेली वाहतूक या कारणांमुळे शहरात दरदिवशी अपघात होतात, मात्र एखादा गंभीर अपघात झाल्याशिवाय वाहतूक पोलिसांची यंत्रणा जागी होत नाही. 
 
सिग्नल बंदमुळे घडला अपघात :इर्विन चौकहा शहरातील मुख्य वर्दळीचा चौक आहे. या ठिकाणी चार बाजूंनी वाहन एकत्र येतात. त्यामुळे या ठिकाणी वाहतूक पोलिस आणि वाहतूक सिग्नल आवश्यकच आहे. मात्र अपघात झाला त्यावेळी वाहतूक सिग्नल कार्यरत नव्हता.
 
वाहतूक सिग्नल बंद असल्यास वाहतूक पोलिसांनी ‘मॅन्युअली’ वाहतूक नियंत्रीत करणे अपेक्षित राहते मात्र अनेकदा सिग्नल बंद असल्यावर ‘मॅन्युअली’ वाहतूक नियंत्रीत केली जात नाही. इर्विन चौकातील वाहतूक सिग्नल सोमवारी सकाळी ११ वाजताच्या सुमारासही कार्यरत नव्हता.
 
वास्तविकता सकाळी ११ वाजता अंत्यत वर्दळ या चौकात राहते. अपघातात बळी गेल्यानंतर मात्र वाहतूक पोलिस चौकातील वाहतूक ‘मॅन्युअली’ नियंत्रीत करताना दिसून आल्याचे घटनास्थळावरील प्रत्यक्षदर्शी सांगत होते. बंद सिंगलमुळे हा अपघात घडल्याचे सांगण्यात येते. 
बघ्यांचे ‘फोटोसेशन’ 

रक्तबंबाळ अवस्थेत वृध्द व्यक्ती मृतावस्थेत पडला होता. चौकातून ये जा करणारा प्रत्येकच जण अपघात पाहत होता. त्यामुळे घटनास्थळी प्रचंड गर्दी झाली. यावेळी बघ्यापैंकी अनेक उत्साहींनी त्याच ठिकाणी फोटो व्हीडीओ काढण्याची धुम केली. पोलिसांना वाहतूक नियंत्रीत करणे अशक्य झाले होते, त्यावेळी काही समजूतदार नागरिकांनी पोलिसांची मदत करून वाहतूक नियंत्रित करण्यासाठी मदत केली. मात्र काही अतिउत्साहींच्या फोटोसेशनमुळे वाहतूक सुरळीत होण्यापेक्षा अडथळाच जास्त झाला होता. 
बातम्या आणखी आहेत...