आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : भूमिपूजनानंतरही हालेच ना विकासकामांचे बुजगावणे

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - भूमिपूजन होऊन तब्बल पाच ते सहा महिन्यांचा कालावधी लोटून देखील विकासकामांना सुरूवात झाल्याने ‘विकास कामांचे बुजगावणे हालेच ना’, अशी स्थिती दिसून येत आहे. लोकप्रतिनिधींकडून निवडणुकीपूर्वी फुगविण्यात आलेला विकासकामांचा फुगा आता फुटू लागल्याने अपूर्ण कामे, उखडलेले आणि खड्डेमय रस्ते, प्रलंबित कामे असे त्रासदायक चित्र शहरात निर्माण झाल्याने नागरिक हैराण झाले आहेत. 
 
महापालिका निवडणुकीच्या तोंडावर सहा ते सात महिन्यांपूर्वी शहरात विकासाचा महापूर वाहत असल्याचे दिसून येत होते. जागा मिळेल तेथे कुदळ मारुन विकास कामांच्या भूमिपूजनाचा सपाटा लोकप्रतिनिधींनी लावला होता. भूमिपूजन केलेली काही कामे पूर्णत्वास तर मोजक्याच कामांना प्रत्यक्षात सुरुवात झाल्याचे दिसून येत आहे. महापालिकेत सत्ता काबीज करण्यासाठी मतदारांसमोर विविध विकासकामांचा फुगा लोकप्रतिनिधींकडून फुगविण्यात आला. कोणतेही विकासकामे करताना अंदाजपत्रक, विकासकामास मंजुरी, निविदा, एनओसी, वर्क ऑर्डर आदी प्रशासकीय बाबींचा सोपस्कार पूर्ण करणे गरजेचे असते. मात्र शहराच्या विविध भागात भूमिपूजन करताना या सोपस्काराला तिलांजली देण्यात आल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. कुठे अंदाजपत्रक, कुठे वर्क ऑर्डर नसताना निवडणुकीच्या तोंडावर विकासकामांचे भूमिपूजन करण्यात आले. मात्र प्रत्यक्षात कामांना सुरूवात झाली नाही. कुठे खोदकाम
करीत विकासकामास सुरूवात करण्यात आली, प्रत्यक्षात मात्र मागील पाच ते सहा महिन्यांपासून रखडले असल्याचे स्थानिक नागरिकांचे म्हणणे आहे.
 
अर्धवट बांधकाम रस्ते खड्डेमय झाले आहेत, सभागृहाच्या बांधकाम करता यावे म्हणून पिलरसाठी खुल्या मैदानात खाेल खड्डे खोदण्यात आले. काही ठिकाणी क्रांक्रीटीकरणाचा एक थर टाकण्यात आला, मात्र अर्धवट काम असल्याने नागरिकांना खाचखड्डग्याच्या रस्त्यावरुन जाणे-येणे करण्याची वेळ आली आहे. भूमिपूजनानंतर मोठा कालावधी लोटल्यानंतर विकास कामांना सुरुवात झाल्याने नागरिकांच्या संयमांचा बांध कोणत्याही क्षणी फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पावसाळा तोंडावर आला असताना रस्त्याचे काम कधी सुरू होणार याची प्रतिक्षा परिसरातील नागरिकांना लागली आहे. शहरात निधी, वर्क ऑर्डर नसताना विकास कामांचे भूमीपूजन करण्यात आल्याचे निदर्शनास आल्यानंतर महापालिकेचे स्थायी समिती सभापती तूषार भारतीय यांनी अशी कामे शोधून काढण्याचे प्रशासनाला निर्देश दिले. किती अर्धवट विकास कामांचा शोध महापालिका प्रशासनाकडून घेतल्या जातो, याकडे अमरावतीकरांचे लक्ष लागले आहे. 

प्रलंबितविकास काम अंबा विहार रस्ता 
अंबाविहार हनुमान मंदिर जवळील परिसरातून सरस्वती नगराकडे जाणाऱ्या रस्ता बांधकामाचे भूमीपूजन महापालिका निवडणुकीपूर्वी करण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत येथील विकास काम प्रस्तावित आहे. भुमीपूजनानंतर रस्ता बांधकामास सुरुवात झालेली नाही. 
 
प्रलंबितविकास काम हरिओम कॉलनी रस्ता 
साईनगर परिसरातील हरिओम कॉलनी येथील रस्त्याच्या क्रांक्रीटीकरण कामाचे भूमीपूजन मनपा निवडणुकीपूर्वी करण्यात आले. आमदार रवी राणा यांच्या विकास निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत हे विकास काम प्रस्तावित होते. रस्त्याच्या क्रांक्रीटीकरणास सुरूवात करण्यात आली, मात्र अनेक दिवसांपासून विकास रखडले आहे. 
 
प्रलंबितविकास काम महादेव नगर सभागृह 
अंबाविहार परिसरातील महादेव मंदिर येथील खुल्या मैदानात सभागृह बांधकामाचे भुमीपूजन महापालिका निवडणुकीपूर्वी करण्यात आले. भुमीपूजन झाले असल्याने सभामंडप बांधकामासाठी खोदकाम करण्यात आले. खेळण्याच्या मैदानात मोठ्या प्रमाणात खड्डे खोदण्यात आले. मात्र त्यानंतर विकास कामाल ब्रेक लागला. पावसाळा तोंडावर असल्याने खड्ड्यांमध्ये पाणी साचून अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. 
 
प्रलंबितविकास काम मंगलमूर्ती ले-आॅऊट 
मंगलमूर्तीले-आॅऊट येथील खुल्या जागेला तारेचे कुंपन सुरक्षा भिंती बांधकामाचे भुमीपूजन करण्यात आले. येथील विकास काम देखील सार्वजनिक बांधकाम विभागाकडून प्रस्तावित आहे. मात्र अनेक दिवसांपासून विकास कामांना ब्रेक लागल्याची माहिती आहे. अर्धवट विकास कामांमुळे नागरिक हैराण झाले अाहे. 
 
वर्क अाॅर्डर काढले 
- तीन विकासकामांचे वर्क ऑर्डर काढले असून फक्त शासकीय कामांच्या भूमिपूजनाचे नियोजन विभागाकडून केले जाते.
मिलिंद पाटणकर, उपविभागीय अभियंता, सार्वजनिक बांधकाम उपविभाग 
 
मनपाचा संबंध नाही 
- प्रलंबित विकासकामांची निविदा अथवा विकासकामांचे कार्यारंभ आदेश मनपाने काढले नाही. त्यामुळे संबंधित विकासकामांशी महापालिकेचा संबंध नाही.
हेमंतपवार, आयुक्त, महापालिका. 
 
कारवाई करावी 
- शहरात एनओसी,वर्कऑर्डर नसताना भूमिपूजन केलेली कामे शोधून काढण्याचे प्रशासनाला निर्देश दिले आहे. कामे रखडल्याने फौजदारी कारवाई करणे आवश्यक आहे.
तुषार भारतीय, सभापती, स्थायी समिती, 
 
कामे पूर्ण करू 
- भूमिपूजनाची कामेपूर्ण केली जातील. निधीअभावी तसेच कंत्राटदारांच्या हलगर्जीपणामुळे कामे रखडली होती. ही कामे पूर्ण करण्यासाठी साबांविला निर्देश दिले आहे.
रवीराणा, आमदार, बडनेरा मतदार संघ. 
 
अधिकाऱ्यांच्या मनभिन्नतेमुळे विकासकामांबाबत संभ्रम 
या विकास कामांबाबत लोकप्रतिनिधी, संबंधित विभागाचे अधिकारी यांच्यात संबंधित विकास कामे सुरू होण्याबाबत मनभिन्नता आढळून येत आहे. त्यामुळे या करण्यात आलेल्या भुमीपूजनाचा हेतू सफल होणार की नाही याबाबत नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. तसेच उलट सुलट प्रतिक्रिया नागरिकांमधून व्यक्त होत आहे. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...