आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मनपा आयुक्त म्हणतात, "चौकशीनंतरच कारवाई'

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- नगररचना विभागातील (एमटीपीओ) उपअभियंता तथा प्रभारी कार्यकारी अभियंता (२) रवींद्र पवार यांना निलंबित करण्याचे निर्देश आमसभेने दिले आहेत. मात्र आमसभेच्या या निर्देशांचे पालन करण्यापूर्वी आपण हे प्रकरण तपासून पाहू, अशी भूमिका प्रशासकीय प्रमुख या नात्याने आयुक्त चंद्रकांत गुडेवार यांनी घेतली आहे.

उपअभियंता पवार यांच्या दालनातील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा दोन दिवसांपूर्वी हलवण्यात आली. बसपाच्या नगरसेविका निर्मला बोरकर, माजी गटनेते अजय गोंडाणे लोजपाचे कार्यकर्ते आनंद वरठे आदींनी हा प्रकार उघडकीस आणला. त्यानंतर पवार यांनी दिलगिरी व्यक्त करुन ती प्रतिमा मूळ ठिकाणी स्थापितही केली होती. दरम्यान, मंगळवारी दुपारी हा मुद्दा आमसभेच्या पटलावर आणला गेला. डॉ. आंबेडकर यांची प्रतिमा हलविणे, ही गंभीर बाब असल्याचे सांगून गोंडाणे यांनी औचित्याचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले, कोणतेही कारण नसताना भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा हलवली गेली. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यावर कारवाई केली पाहिजे. त्यानंतर प्रकाश बनसोड, प्रा. प्रदीप दंदे, निर्मला बोरकर,गुंफा मेश्राम, भूषण बनसोड आदींनीही हा मुद्दा लावून धरला. शेवटी सर्वांची मते ऐकून घेतल्यानंतर पीठासीन सभापती महापौर चरणजीतकौर नंदा यांनी पवार यांच्या निलंबनाचे निर्देश दिले.

ऊर्जा बचतीसाठी लागणार एलईडी दिवे
ऊर्जा(वीज वापर) बचतीच्या मुद्द्यावरही आजच्या सभेत चर्चा होऊन ३६ कोटी रुपये खर्चाच्या नव्या योजनेला मंजुरी देण्यात आली. शहरातील पथदिवे मनपा इमारतीतील विद्युत व्यवस्थेत एलईडी दिवे लावून बील निम्म्यावर आणले जाणार आहे. या योजनेसाठी एका एनर्जी सेव्हींग कंपनीची निवड केली जाणार असून त्यासाठीचे सहकार्य पुण्याच्या सावित्रीबाई फुले िवद्यापीठाच्या उर्जा विभागाचे सुरेश रानडे करीत आहेत. या कामात व्यग्र असलेल्या रानडे यांनी त्यासाठीचा डीपीआर तयार केला असून आजच्या आमसभेत पीपीटीद्वारे त्याची मांडणी केली गेली.

आरक्षणाला हात लावण्याची ताकीद
विकासआराखडा (डीपी) तयार करताना शहराच्या विविध भागांत शाळा, उद्याने, क्रीडांगण, स्मशानभूमी यासाठी जमिनी आरक्षित करुन ठेवण्यात आल्या आहेत. त्या आरक्षणांना हात लावण्याची ताकीद आजच्या आमसभेत देण्यात आली. शिवाय नगररचना विभागावर ताशेरे ओढताना गेल्या तीन वर्षांत झालेली मासलेवाईक प्रकरणेही चर्चिली गेली. सध्याचे एडीटीपी सुरेंद्र कांबळे यांचा कालखंड सोडला तर गेल्या काही वर्षांत या विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांना हाताशी धरून शहरातील िबल्डर्सनी मोठ्या जागा बळकावल्याचे सदस्यांनी सभागृहाच्या लक्षात आणून दिले. राजापेठ, विलासनगर, गोरक्षण प्लॉट येथील खेळाच्या मैदानाला गिळंकृत करण्यासाठी सुरू असलेले षडयंत्र उघड करीत वानखडे यांनी या विषयावरील चर्चेला तोंड फोडले. त्यानंतर तुषार भारतीय, विलास इंगोले, प्रकाश बनसोड, संजय अग्रवाल, प्रा. प्रदीप दंदे, जयश्री मोरय्या आदी नगरसेवकांनी या विषयावर जोरदार मांडणी केली.
आमसभेत मुद्दे उपस्थित करताना नगरसेवक. मंचावर सभापती, आयुक्त, नगरसचिव आदी.