आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

शेतकऱ्याच्या हतबलतेचा भोंदू महाराजांनी घेतला पुरेपूर फायदा

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- आठ दिवसांपूर्वी ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखा पथकाने तळेगाव दशासर परिसरातून पकडलेल्या दोन भोंदू महाराजांनी ज्या शेतकऱ्याच्या घरातून लाखांचा ऐवज लंपास केला होता. त्याच शेतकऱ्याच्या आजारी मुलाला ठीक करण्यासाठी घरात पूजा करावी लागते, कारण घरात जमिनीखाली गुप्तधन (सोने) असल्याची बतावणी करून त्या हतबल शेतकरी कुटुंबाकडून मोठ्या प्रमाणात रक्कम उकळल्याचे पोलिस तपासात पुढे आले आहे.

एलसीबीने आठ दिवसांपूर्वी वर्धा आणि नागपूर जिल्ह्यातील दोन भोंदू महाराजांना अटक केली होती. याच वेळी या दोघांचा अन्य एक भोंदू सहकारी पसार झाला होता. तळेगाव दशासर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात राहणाऱ्या ५० वर्षीय महिलेच्या पतीला वाताचा त्रास आहे, तर मुलगासुद्धा आजारी आहे. दरम्यान, तीन महिन्यांपूर्वी या महिलेच्या गावात दोन व्यक्ती आले, ते जडीबुटीच्या आधारे या आजारांवर उपचार करतात, त्यासाठी ते औषधीसुद्धा देतात. त्यामुळे या तिघांनी या महिलेच्या घरी जाऊन पती मुलाला औषध देण्यास सुरुवात केली. या औषधीसाठी काही रक्कमसुद्धा त्यांनी घेतली. त्यानंतर आठ दिवसांनी पुन्हा दोघे जण औषध देण्यासाठी महिलेच्या घरी पोहोचले. या भोंदूनी त्या महिलेला सांगितले की, तुमच्या घरात जमिनीखाली सोनं आहे, त्यामुळेच तुमच्या मुलाला आजार जडला आहे. हा आजार दूर करायचा असेल तर घरात जमिनीखाली असलेले सोनं काढावे लागेल, त्यासाठी पूजा करावी लगेल, पूजेचा खर्च आहे, मात्र ही पूजा केल्यास मुलाचा आजार कायमस्वरूपी ठीक होईल, अशी बतावणी करून त्या भोंदूनी या शेतकरी कुटुंबीयांकडून लाखो रुपये उकडले आहे. ही बाब त्या कुटुंबीयांनीसुद्धा पोलिसांना सुरुवातीला सांगितली नव्हती, मात्र पोलिसांनी दोघांना अटक केल्यानंतर खरा प्रकार बाहेर आला. या तिघांनी तीन लाखांपेक्षा अधिक ऐवज रक्कम लंपास केल्याचेही आता पुढे आले आहे. या पूजेसाठी मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने रक्कमसुद्धा शेतकरी कुटुंबानी दिली होती, तीसुद्धा या भोंदू त्रिकुटाने लंपास केली असल्याचे पोलिसांनी घेतलेल्या तक्रारदाराच्या पुरवणी जबाबात पुढे आले आहे, अशी माहिती तळेगाव दशासर पोलिसांनी दिली आहे.

लाख२५ हजार रोख दोन दुचाकी जप्त : पोलिसांनीतपासादरम्यान दोन्ही भोंदूंकडून दोन दुचाकी लाख २५ हजार रुपयांची रोकड जप्त केली आहे. या त्रिकुटाने शेतकऱ्याच्या घरातून मोठ्या प्रमाणात सोन्याचे दागिने लांबवले होते. हे दागिने या चोरट्यांनी नागपुरातील एका सराफा व्यावसायिकाला विकल्याचे पुढे आले आहे. हे दागिने जप्त करण्यासाठी तळेगाव पोलिसांचे पथक नागपुरात जाऊन आलेे. मात्र, सराफा बंद असल्यामुळे जप्ती झाली नाही, सराफा बाजार सुरू होताच सोनेही जप्त करण्यात येणार आहे. तसेच आरोपीच्या शोधात मंगळवारी पथक रवाना झाले आहे.

पुरवणी जबाबात आले पुढे
शेतकरी कुटुंबातीलआजारी मुलाला बरे करण्यासाठी घरात पूजा करावी लागते, घरात सोने आहे, अशा थापा या ठकबाजांनी मारून त्यांनी लाखो रुपये हडपले. ही बाब तक्रारदाराच्या पुरवणी जबाबात पुढे आली आहे. आमचा तपास सुरू आहे. या प्रकरणात आता फसवणुकीच्या गुन्ह्याचे कलम वाढवणार आहे. श्री. नितनवरे, ठाणेदार,तळेगाव दशासर.