आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अमरावती : अल्पवयीनाच्या दुचाकीने घेतला आणखी एक बळी

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - सकाळी फिरण्यासाठी आलेल्या एका ६० ते ६५ वयोगटातील वृद्ध व्यक्तीला सुसाट वेगाने जाणाऱ्या अल्पवयीन दुचाकी चालकाने धडक दिली. या धडकेत गंभीर जखमी झालेल्या या वृद्धाचा इर्विनमध्ये मृत्यू झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १७) सकाळी साडेसात वाजताच्या सुमारास जिल्हाधिकारी कार्यालयासमोर घडली आहे. सुसाट सुटलेल्या अल्पवयीन वाहनचालकांमुळे जीव जाण्याची शहरातील आठवडाभरातील ही दुसरी घटना आहे. 
 
शहरातील कॅम्प - जिल्हाधिकारी कार्यालय - बियाणी चौक या मार्गावर अनेक नागरीक दररोज सकाळी पायदळ फिरण्यासाठी येत असतात. त्याचप्रमाणे शुक्रवारी सकाळीसुद्धा या मार्गावर अनेक व्यक्ती पायदळ तर कोणी सायकलने फिरत होते. याचवेळी कॅम्पकडून बियाणी चौकाकडे सुसाट वेगात दोन अल्पवयीन मुले दुचाकी घेऊन आले. रस्त्याच्या कडेला चालत असलेल्या एका ६० ते ६५ वर्षीय व्यक्तीला या अल्पवयीनांच्या दुचाकीने थेट धडक दिली. धडक इतकी गंभीर होती, की ते वृद्ध घटनास्थळीच अतिरक्तस्त्रावामुळे बेशुद्ध झाले होते. यावेळी फिरणाऱ्या नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असल्यामुळे नागरीकांनीच त्यांना ऑटोद्वारे इर्विनमध्ये पोहचवले मात्र उपचाराला दाद देता त्या वृद्धाचा मृत्यू झाला. त्याचवेळी ही माहिती पोलिसांनाही देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी येऊन धडक देणाऱ्या अल्पवयीन दुचाकीस्वारांना ताब्यात घेतले कारण धडक दिल्यानंतर त्या अल्पवयीनांना नागरीकांनी पकडून ठेवले होते.
 
दुचाकीस्वाराच्या दुचाकीची गती सुसाट असून या वृद्धाला धडक देण्यापूर्वीच त्यांनी एकाला धडक मारण्याचा प्रयत्न केल्याचे प्रत्यक्षदर्शींनी सांगितले आहे. दुचाकी चालवणारा मुलगा हा सतरा वर्षांचा असून पॉलीटेक्नीकला शिकत आहे, तो दुचाकीने कॉलेजला जात असल्याचे तपासात पुढे आले. 
 
दरम्यान धडकेत मृत्यूमुखी पडलेल्या वृद्धाची शुक्रवारी सांयकाळपर्यंत ओळख पटली नव्हती. पोलिसांनी कॅम्प परिसरात शोध घेतला, संपूर्ण आयुक्तालयातील पोलिस ठाण्याला माहिती दिली मात्र शुक्रवार सांयकाळपर्यंत मृतकाची ओळख पटू शकली नव्हती. दुसरीकडे पोलिसांनी त्या अल्पवयीन दुचाकी चालकाविरुद्ध अपघात करून वृद्धाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याचा गुन्हा दाखल केला आहे, असे गाडगेनगर पोलिसांनी सांगितले. 
 
आठ दिवसांपूर्वी राजापेठ ठाण्याच्या हद्दीत एका पुजाऱ्याला दुचाकीने धडक दिली होती. या धडकेत पुजाऱ्याचा जीव गेला आहे. त्या दुचाकीचा चालकसुद्धा अल्पवयीनच होता. त्या प्रकरणात तर पोलिस आयुक्तांनी थेट अल्पवयीन वाहनचालकाच्या वडीलाला अटक करण्याचे आदेश दिले आहे. तसेच शहरात सध्या स्टंटबाज सुसाट दुचाकी चालवणाऱ्यांचे प्रमाण वाढले असल्यामुळे पोलिसांनी या स्टंटबाज सुसाट वाहन चालवणाऱ्यांची माहितीवरून यादी तयार केली, तसेच त्यांना पकडून त्यांच्याविरुद्ध कारवाई सुरू केली आहे. पोलिसांची कारवाई सुरू असली तरी सुसाट वाहन हाकणाऱ्यांच्या दुचाकींची गती नियंत्रणात आलेली नसल्याचे शुक्रवारी सकाळी घडलेल्या घटनेवरून दिसून येत आहे. या अल्पवयीन तसेच किशोरवयीन सुसाट वाहनचालकांना आवर घालण्याचे आव्हान आता पाोलिस यंत्रणेपुढे आहे. पोलिसांसोबतच पालकांनी नियमांचे पालन करून आपल्या पाल्यांना समज देण्याची गरज निर्माण झाली आहे. 
 
वाहन चालवण्याचा परवानाचं नाही 
वृद्धाला धडक देणाऱ्या अल्पवयीन दुचाकी चालकाचे वय सतरा वर्ष आहे. तसेच त्यांच्याकडे दुचाकी चालवण्याचा परवानासुद्धा नसल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. वयाची अठरा वर्ष पूर्ण केल्याशिवाय तसेच वाहन चालवण्याचा परवाना काढल्याशिवाय मुलांना वाहन चालवायला देऊ नये, असा नियम आहे, तशी जनजागृती वाहतूक शाखा, पोलिस, आरटीओकडून वारंवार केली जाते, तरीही शहरात अल्पवयीन वाहनचालक वाहन घेवून सुसाट सुटल्याचे चित्र आहे. 
बातम्या आणखी आहेत...