आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

राज्यात दाेनशे काेटींहून अधिक काळा पैसा जप्त, आयकर विभागाचे महासंचालक राकेशकुमार गुप्ता यांची माहिती

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- नाेटाबंदीच्या निर्णयानंतर काळ्या पैशाचा शोध घेण्यासाठी राज्यात आतापर्यंत ११२ ठिकाणी छापे टाकून २०० काेटीहून अधिक काळा पैसा जप्त केला असल्याचा दावा आयकर विभागाच्या तपास विभागाचे महासंचालक राकेशकुमार गुप्ता यांनी मंगळवारी पत्रकारांशी बाेलताना केला. ‘अत्याधुनिक माहिती तंत्रज्ञानामुळे अाता प्रत्येक विभागाची माहिती अायकर खात्याला मिळतेच. त्यामुळे भविष्यातही काळा पैसा खर्च करणे अत्यंत कठीण जाईल,’ असा गर्भित इशाराही त्यांनी दिला. काळ्या पैसेवाल्यांसाठी सरकारने याेजना जाहीर केली अाहे. त्यांच्याकडून जमा होणाऱ्या पैशातून गरिबांसाठी कल्याणकारी योजना राबवल्या जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले.
  
केंद्र सरकारने पंतप्रधान गरीब कल्याण योजना जाहीर करून बेहिशेबी रक्कम बाळगणाऱ्यांसाठी काळा पैसा उघड करण्याची अखेरची संधी दिली अाहे. या योजनेचा ३१ मार्चपर्यंत लाभ घेता येणार असून त्यानंतर मात्र बेहिशेबी मालमत्ता बाळगणाऱ्यांवर १ एप्रिलपासून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होणार असल्याचा इशाराही गुप्ता यांनी दिला. आयकर विभागाची नजर सध्या मोठ्या रक्कमा जमा करणाऱ्यांवर आहे. त्यामुळे सर्वच जणांवर कारवाई होणार नसली तरी बँकेकडून येणाऱ्या माहितीवर योग्य तो निर्णय घेतला जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.   आयकर विभागाच्या वतीने पंतप्रधान गरीब कल्याण योजना-२०१६ या विषयावर आयोजित प्रबोधनात्मक परिसंवादात सहभागी होण्यासाठी गुप्ता हे नागपुरात आले होते. आर्थिक गुन्हे अथवा खटले दाखल असलेल्या व्यक्तींना या योजनेचा लाभ घेता येणार नसल्याचे स्पष्टीकरणही त्यांनी दिले.  

पतसंस्था सुरक्षित  
आमची नजर केवळ काळा पैसा बाळगणाऱ्यांवर आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना कारवाईचा जाच होणार नाही, याची काळजी आयकर विभाग घेणार असून दैनंदिन कलेक्शन करणाऱ्या पतसंस्थांकडून मोठ्या रकमा बँकेत जमा झाल्या असल्या तरी वस्तुस्थिती लक्षात घेऊन त्यांच्यावर कारवाई होणार नाही, असेही गुप्ता यांनी स्पष्ट केले.
 
बातम्या आणखी आहेत...