आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अाैरंगाबाद, नागपूर, मुंबईत पूल देखभालीची मुख्यालये

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - कोकणातील महाडच्या पूल दुर्घटनेनंतर राज्य सरकारने आता पुलांच्या देखभाल दुरुस्तीकरिता सार्वजनिक बांधकाम विभागाअंतर्गत स्वतंत्र प्रादेशिक (पूल) विभागाची स्थापना केली आहे. राज्यातील सहा महसुली विभागांमध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाची ही तीन प्रादेशिक कार्यालये फक्त पुलांच्याच देखभाल दुरुस्तीचे काम बघतील. स्थापन करण्यात आलेल्या प्रत्येक कार्यालयाकडे दोन महसुली विभागांचा कार्यभार सोपविण्यात आला आहे. सार्वजनिक बांधकाम (पूल) प्रादेशिक विभाग या नव्या नावाने या कार्यालयांचे कामकाज सुरू होणार आहे. यासंदर्भात शुक्रवारी राज्य सरकारने अधिसूचना जारी केली.

मुख्य अभियंता (पूल) यांच्या अधिपत्याखाली दोन प्रादेशिक विभागांकरिता प्रत्येकी एक याप्रमाणे सहा प्रादेशिक विभागांकरिता तीन अधीक्षक अभियंत्यांची कार्यालय प्रमुख म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. राज्यातील मुंबई, औरंगाबाद आणि नागपूर या तीन ठिकाणी मुख्यालये राहणार आहेत.
पुणे आणि कोकण विभागाचे पुलाचे मंडळ कार्यालय मुंबई येथे, औरंगाबाद आणि नाशिक विभागाचे मुख्यालय औरंगाबाद येथे , तर नागपूर आणि अमरावती विभागाचे मुख्यालय नागपूर येथे राहणार आहे. तसेच प्रत्येक प्रादेशिक विभागात दोन किंवा तीन जिल्ह्यांकरिता एक कार्यकारी अभियंता यांचे स्वतंत्र कार्यालय राहणार आहे. प्रत्येक जिल्ह्यात उपविभागीय (पूल) कार्यालयही स्थापन करण्यात येणार आहे. ज्या जिल्ह्यांचे क्षेत्रफळ मोठे आहे व सर्वसाधारण पुलांची संख्या जास्त आहे अशा जिल्ह्यांकरिता दोन सार्वजनिक बांधकाम (पूल) उपविभाग निर्माण करण्यात येणार आहे.
बातम्या आणखी आहेत...