आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

बैल शर्यतीत धावू शकतो, त्याची शरीररचना पळण्यासाठी योग्यच; समितीतीने खोडले अाक्षेप

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

नागपूर- राज्यातील बैलगाडी शर्यतीवर उच्च न्यायालयाने बंदी घातल्यानंतर या प्रश्नावर कायदेशीर तोडगा काढण्यासाठी सरकारने पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त आयुक्त डाॅ. डी. एम. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली हाेती. या समितीच्या अहवालाचा अंतिम मसुदा तयार झाला असून या आठवड्यात ताे सरकारला सादर करण्यात येणार असल्याची माहिती चव्हाण यांनी ‘दिव्य मराठी’ला दिली. समितीच्या निष्कर्षांवर मात्र बोलण्यास नकार दिला.  समितीचे अन्य सदस्य डाॅ. संजय बानुबाकोडे यांनी मात्र न्यायालयात घेण्यात अालेले अाक्षेप खाेडून बैलाची शरीररचना धावण्यासाठी याेग्यच असल्याचा दावा केला अाहे.  


बैलगाडीच्या शर्यतीत शेपट्या उंचावून बेभान पळणाऱ्या बैलांकडे पाहून लोक चित्कारत असतात. बैल वेगाने पळावे म्हणून त्यांच्या शेपट्या पिरगाळल्या जातात. त्यांच्या पायाला पऱ्हाण्या टोचल्या जातात, त्यांच्या अंगावर अासूड ओढले जातात, ही क्रूरता थांबवण्याची मागणी करत उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल झाली हाेती.  त्यावर ‘बैल हा घाेड्यासारखा कार्यकुशल प्राणी नाही. बैलाची शरीररचना लक्षात घेता हा प्राणी शर्यतीमध्ये धावण्यासाठी सक्षम नाही,’  असे निरीक्षण न्यायालयाने नोंदवले हाेते.   

 

काय म्हणाले डाॅ. संजय बानुबाकाेडे  

- शर्यत घोड्यांसोबत बैलांची नाही, तर शर्यती बैलाबैलांमध्येच होतात, हे लक्षात घेतले पाहिजे. सर्वसामान्य माणसालाही धावता येतेच. पण तो बेन जाॅन्सन वा उसेन बोल्टसारखा धावू शकत नाही. कारण वर्षानुवर्षाच्या सरावानंतर या धावपटूंनी आपले शरीर त्यासाठी तयार केलेले असते. शर्यतीच्या बैलांनाही अशाच प्रकारे तयार केले जाते. त्यांची वेगळी काळजी घेतली जाते. शेतीचे आणि शर्यतीचे बैल वेगवेगळे असतात. 

 

- कुठलीही व्यक्ती वा प्राणी कशासाठी वापरायचा हे ठरवल्यानंतर त्याला तशा प्रकारे तयार करण्यात येते. बैल घाबरवल्याशिवाय पळत नाही वा त्याला पळताच येत नाही, हे आक्षेप चुकीचे आहेत. पळण्यासाठी दरवेळी पऱ्हाण्या टोचल्याच पाहिजेत हे गरजेचे नाही. पाठीवर थाप मारली की पळायचे असे ट्रेनिंगही बैलांना दिले जाते. सगळेच घोडे धावतात असेही नाही. टांग्याचे वा शर्यतीचे घोडे वेगळे असतात.

बातम्या आणखी आहेत...