यवतमाळ - डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे तीन महिन्यांच्या चिमुरडीला प्राणास मुकावे लागण्याची घटना यवतमाळ जिल्ह्यातील बाभूळगाव येथे घडली आहे.
येथील इंदिरानगर मधील रहिवाशी सलीम शेख करीम शेख यांच्या मुलीला शुक्रवारी सकाळी उपचारांसाठी बाभूळगाव येथील ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले होते. मात्र रुग्णालयातील डॉक्टर आणि 108 अॅम्बुलन्सवर कार्यरत डॉक्टर यांच्या वादात मुलीवर वेळेवर उपचार होऊ शकले नाही आणि उपचारांविनाच चिमुकली दगावल्याचा आरोप तिच्या आई-वडिलांनी केला आहे.
डॉक्टरांनी एकमेकांशी वाद घालत वेळ दवडल्यानेच मुलीचा मृत्यू झाल्याची तक्रार सलीम शेख यांनी पोलिसांत दिली आहे. डॉक्टरांच्या असंवेदनशिलतेमुळे मुलगी दगावल्याचा आरोप करत नागरिकांनी ग्रामीण रुग्णालयाबाहेर गर्दी केल्यामुळे तणावाचे वातवरण निर्माण झाले.