आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलासह वडिलांचाही तलावात बुडून मृत्यू, दाभाडा येथे बकऱ्यांना पाणी पाजताना घडली घटना

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव रेल्वे - सुटीचा दिवस असल्याने वडिलांना मदत करण्यासाठी त्यांच्यासोबत बकऱ्या चारायला गेलेल्या वर्षीय चिमुकल्यासह वडिलांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना रविवारी रात्री तालुक्यातील दाभाडा येथे उघडकीस आली. नव वर्षाच्या प्रारंभीच पिता-पुत्राच्या झालेल्या या दुर्दैवी मृत्यूमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. सुधाकर गोविंद ठोकळे (४२) असे वडिलांचे, तर दर्शन सुधाकर ठाेकळे (८) असे तलावात बुडून मृत्यू झालेल्या दुर्दैवी पितापुत्राचे नाव आहे. रविवारी नेहमीप्रमाणे मृतक ठोकळे हे घरच्या बकऱ्या घेऊन शेतात चारायला घेऊन गेले. 
 
दरम्यान रविवारी सुटी असल्याने चिमुकला दर्शनही सायकल घेऊन वडिलांसोबत शेतात गेला होता. सायंकाळी गावाशेजारी असलेल्या साठवण तलावावर ठोकळे यांनी बकऱ्यांना पाणी पिण्यासाठी नेले. तलावात बकरी पडू नये म्हणून दर्शन हा बकऱ्या हाकत होता. दरम्यान त्याच वेळी त्याचा पाय घसरून तो तलावात पडला. त्याचा आवाज ऐकताच सुधाकर ठोकळे हे त्याला वाचविण्यासाठी गेले असता, त्यांचाही तलावात बुडून मृत्यू झाला. सायंकाळ होऊनही बापलेक घरी आल्याने नातेवाईकांनी त्यांचा शोध घेतला असता, तलावाजवळ दर्शनची सायकल, वडिलांचा विळा चप्पल आढळून आली. घटनेची माहिती पोलिसांना देण्यात आली. रात्री उशीरा तलावाच्या गाळात अडकलेले पितापुत्राचे मृतदेह बाहेर काढण्यात आले. सोमवारी (दि. २) त्यांचे येथील ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदन केल्यानंतर दाभाडा येथे त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. मंगरुळ दस्तगीर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली असून ठाणेदार शैलेश शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस उपनिरीक्षक राजेंद्र होटे, त्र्यंबक काळे घटनेचा पुढील तपास करीत आहेत. दर्शन हा येथील रावसाहेब रोंघे मेमोरियल इंग्लिश स्कूल येथे दुसऱ्या वर्गात शिकत होता. 

गावातपेटली नाही चूल: पितापुत्राचा तलावात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याच्या घटनेमुळे दाभाडा परिसरात शोककळा पसरली होती. बापलेकांच्या मृत्यूमुळे गावात एकाही घरी चूल पेटली नाही. शाळेला सुटी असल्याने वडिलांसोबत बकऱ्यांमागे गेलेल्या चिमुकल्याचाही वडिलासह करुण अंत झाल्याने समाजमन गहिवले आहे. मुलाला वाचवण्याच्या प्रयत्नात कुटुंब प्रमुखाचाही मृत्यू झाल्याने ठोकळे कुटुंबावर दु;खाचा डोंगर कोसळला आहे. 
बातम्या आणखी आहेत...