आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ शहरातील रस्त्यांवर दुचाकी चालकांचा पोरखेळ, तरुणांची वाहने धावतात सुसाट

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - शहरातील रस्त्यांवर धावणाऱ्या अनेक वाहन धारकांकडून वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करण्यात येत आहे. या वाहनधारकांमध्ये अल्पवयीन मुलांचा सहभागही मोठा आहे. धावत्या गाडीवर मोबाइलवर बोलणाऱ्यांची संख्याही कमी नाही. शालेय प्रवासी वाहतूक करणाऱ्या रीक्षांमध्ये मुले, प्रवासी कोंबुन भरल्या जातात. हा सर्व प्रकार पोलिस दादा देखत होत असला तरी आवश्यक त्या प्रमाणात कारवाई करण्यात येत नसल्याने वाहतुकीचे नियम पायदळी तुडवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात घडत आहेत.
यवतमाळ शहरातील प्रत्येक प्रमुख उपरस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांची पायमल्ली करण्याचे चित्र दररोज दृष्टीस पडत आहे. अशा वाहनचालकांना कायद्याचा धाक राहिला आहे की, नाही असा प्रश्न त्यामुळे निर्माण होत आहे. त्यासोबतच वाहतुकीच्या नियमांची जाणीव करून देणारी वाहतूक नियंत्रण यंत्राणा देखील आपले काम योग्य पद्धतीने करीत आहे का? असाही प्रश्न निर्माण होतो. सोमवारी दिवसभर शहरातील विविध भागात केलेल्या पाहणीदरम्यान वाहनचालक आपल्या मर्जीने वाहने चालविताना आढळुन आलेत. शहरातील अरुंद गल्ल्यांमध्ये वाहतुकीचे नियम धाब्यावर बसवून स्वत:चे इतरांचे प्राण धोक्यात टाकून ते मार्गस्थ होत असताना दिसून येत होते.

वाहन चालविण्यासाठी १६ वर्षे पूर्ण करणाऱ्या मुलांना विनागिअरच्या वाहनाचा परवाना देण्यात येतो. त्याच प्रमाणे गिअरची वाहने चालवण्याचा परवाना केवळ १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर देण्यात येतो. असे असताना शाळेत जाणाऱ्या १२-१३ वर्षांच्या मुलांपासून अनेक अल्पवयीन मुलांच्या हातात भरधाव वाहने सोपविण्यात येतात. त्यामुळे त्या लहान मुलांचा जीव तर धोक्यात असतोच, सोबतच ही मुले त्यांची वाहने घेऊन रस्त्यावरील आणखी कुणाच्या वाहनांवर धडकतील याचाही नेम नसतो.

गेल्या काही वर्षांपूर्वी एका मुलाच्या भरधाव दुचाकीची धडक लागल्याने सुधीर काळे यांचा मृत्यू झाला होता. ही घटना आजही शहरवासीयांच्या स्मरणात आहे. या अपघातात वाहन चालवणारा तो मुलगाही गंभीर जखमी झाला होता. अशा घटना अनेकदा घडत असतानाही शाळकरी विद्यार्थ्यांच्या हातात वाहने देण्याचे प्रकार पालकांकडून होत आहेत.

वाटेलतेथे पार्किंगचा फॅड : यवतमाळ शहरातील सर्व भागात दुकानांच्या मार्केटची भरमार आहे. या दुकानात खरेदीसाठी येणारे ग्राहक आपली चारचाकी आणि दुचाकी वाहने वाटेल तेथे उभी करतात. त्यांच्या या वाहनांचा अडथळा मात्र रस्त्यावरुन जाणाऱ्या वाहनचालकांना होतो. मुख्य बाजारपेठेत असे प्रकार नित्याचेच झाले आहेत. पिवळ्या पट्ट्याच्या आत वाहने उभी करण्याचा नियम असतानाही त्यासंदर्भात गंभीरता बाळगण्यात येत नसल्याचे पाहावयास मिळते. त्या प्रकारांना दुकान व्यावसायिकही तितकेच जबाबदार असतात. त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढत आहे.

काय करावे
लहानमुलांच्या हाती वाहन चालवण्यासाठी देऊ नये.
दुचाकी किंवा चारचाकी चालवताना मोबाइलवर बोलू नये.
वाहतूक नियमांचे कुठल्याही परिस्थितीत पालन करावे.
कोठेही वाहन पार्क करू नये, एक हात सोडून वाहन चालवू नये.
वाहन एकदम वळवता अगोदर हाताने सूचना करावी.

आजची स्थिती
वाहनचालकआपल्या मनाप्रमाणे विना निर्बंध वाहने चालवत आहेत.
जेथे जागा दिसेल त्या ठिकाणी वाहनांची पार्किंग करण्यात येते.
अल्पवयीन मुले बेधडक भरधाव वाहने चालवतात.
धावत्या दुचाकी आणि चारचाकी वाहनांवर होतो मोबाइलचा वापर.
वाहनातून विचित्र आवाज काढून लक्ष वेधण्याचा प्रयत्न.

दरदिवशी होतात दीडशे कारवाया
-वाहतुकीचे नियमतोडणा ऱ्यांवर कारवाईचा सपाटा सुरूच आहे. एकट्या यवतमाळ शहरात दिवसाला सव्वाशे ते दोनशे वाहनांवर कारवाई करण्यात येते. मात्र कर्मचाऱ्यांची संख्या पाहता प्रत्येक ठिकाणी पोलिस कर्मचारी तैनात करणे शक्य होत नाही. त्यामुळे नागरिकांनीही कर्तव्ये पार पाडणे आवश्यक आहे. नागरिकांनी वाहतुकीचे नियम पाळल्यास वाहतूक सुरळीत होईल.'' दिलीप चव्हाण, जिल्हा वाहतूक नियंत्रक.

नागरिकांना पडला जबाबदारीचा विसर : आपल्याशहरातील वाहतुक व्यवस्था सुरळीत ठेवण्याची जबाबदारी पोलिस प्रशासनासोबतच प्रत्येक शहरवासीयांची आहे. मात्र आज अनेकांकडून या जबाबदारीकडे पाठ फिरवल्याचे दिसून येते. स्वत:चे वाहन दुसऱ्यांना अडचण ठरेल असे उभे करता ठरवून दिलेल्या व्यवस्थित जागी ठेवल्यास निम्म्या समस्यांचे निराकरण होऊ शकते. मात्र आपल्याच तोऱ्यात वावरणाऱ्यांना तशी तसदी घेण्यातही आज कमीपणा वाटताना पाहायला मिळते.
बातम्या आणखी आहेत...