आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुख्यमंत्र्यांचेबोलः फक्त घ्यायचे, द्यायचे मात्र काहीच नाही, हे बदलायला हवे

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती- ज्यांच्यामुळे आपल्याला अधिकार प्राप्त झाला, मानसन्मान मिळाला, त्या समाजाचे आपण काही तरी देणे लागतो, अशी भावना अधिकारी-कर्मचारी वर्गांमध्ये असली पाहिजे. मात्र, आज समाजाकडून फक्त घ्यायचेच, त्या बदल्यात द्यायचे मात्र काहीच नाही, ही कार्यपद्धती योग्य नाही. त्यामुळे समाजाचे स्पंदन ओळखून प्रशासनातील प्रत्येकाने काम करावे, असा सल्ला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रबोधिनीच्या विस्तारित इमारतीचे लोकार्पण मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शुक्रवारी (दि. १) झाले. त्याप्रसंगी ते बोलत होते. अमरावती विभागातील महसूल ग्रामीण विकास विभागातील अधिकारी कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यासाठी १५ जानेवारी १९९० साली ‘आरती' (अमरावती रिजनल ट्रेनिंग इन्स्टिट्यूट) नावाने प्रशिक्षण केंद्र तत्कालीन विभागीय आयुक्तांनी स्थापन केले. १९९७ मध्ये या केंद्राचे नाव डॉ. पंजाबराव देशमुख विदर्भ प्रशासकीय विकास प्रबोधिनी असे करण्यात आले. याच प्रबोधिनीमधील विस्तारित इमारत ग्रंथालयाचे शुक्रवारी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण झाले.
याप्रसंगी पालकमंत्री प्रवीण पोटे, गृहराज्यमंत्री डाॅ. रणजित पाटील, आमदार डॉ. सुनील देशमुख, आमदार डॉ. अनिल बोंडे, आमदार रमेश बुंदिले, आमदार रवी राणा, महापौर चरणजितकौर नंदा, विभागीय आयुक्त ज्ञानेश्वर राजुरकर, जिल्हाधिकारी किरण गित्ते आदी मान्यवर उपस्थित होते. लोकार्पण सोहळ्याच्या प्रारंभी प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेरकर यांनी प्रबोधिनीबाबत सविस्तर माहिती मांडली. या वेळी त्यांनी मुख्यमंत्र्यांकडे विस्तारित इमारतीमधील फर्निचर, व्हर्च्युअल क्लासरूम अन्य कामांसाठी शासनाकडून निधी अपेक्षित असल्याचे सांगितले होते.
तयार झालेल्या या सुसज्ज इमारतीमध्ये फर्निचर किंवा अन्य आवश्यक बाबी पूर्ण करायच्या आहेत. त्यासाठी आवश्यक असेल तेवढा निधी शासनाकडून देण्यात येणार आहे. मार्च महिन्यात होणाऱ्या अर्थसंकल्पात तशी तरतूद करावी, असे आम्ही याच ठिकाणी सामान्य प्रशासनाचे गृहराज्यमंत्री रणजित पाटील यांना निर्देशित करतो, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

प्रशासनातील सर्वात महत्त्वाची बाब ही प्रशिक्षण आहे. . बळकट शासन व्यवस्थेसाठी अधिकारी, कर्मचारी यांचीच महत्त्वाची भूमिका आहे. प्रबोधिनीमध्ये कार्यपद्धती, कायदेपद्धती प्रशिक्षणादरम्यान शिकवले जाते. यासोबतच मूल्य आणि तत्त्वांचेही प्रशिक्षण आज गरजेचे झाले आहे. मूल्य तत्त्वांची जपवणूक करून काम केल्यास समाजाला काहीतरी देऊन काम केल्याचे समाधान मिळू शकते. अन्यथा आयुष्यभर सेवा करायची, भौतिकसुख कमावयाचे आणि आयुष्याच्या अखेरीस आपण आयुष्यात काय केलं, असा प्रश्न अंतर्मनाला विचारल्यास त्याचे उत्तर स्वत:ला मिळेल, अशा भावनिक शब्दात मुख्यमंत्र्यांनी समज दिली. कार्यक्रमाला कुलगुरू डॉ. मोहन खेडकर, महापालिकेचे आयुक्त चंद्रकांत गुडेवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुनील पाटील, सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुख्य अभियंता तुंगे, अधीक्षक अभियंता विजय बनगिनवार, कार्यकारी अभियंता जाधव, महावितरणचे अधीक्षक अभियंता दिलीप मोहोड यांच्यासह अन्य अधिकारी कार्यक्रमाला उपस्थित होते.

अनेकअधिकारी सेवेऐवजी देतात त्रास : सर्वसामान्यांचीअडचण दूर करण्यासाठी, त्याच्या अडीअडचणींवर मात करण्यासाठी अधिकारी कर्मचारी असतात. शासनाने राबवलेल्या योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचल्या पाहिजे, ती जबाबदारीसुद्धा अधिकाऱ्यांचीच असते. ज्यांच्यामुळे आपल्याला अधिकार प्राप्त झाला, त्यांनाच या सेवा द्यायच्या असतात. मात्र, अधिकार आल्यानंतर अधिकार देणाऱ्यांनाच अनेक अधिकारी सेवा देण्यासाठी त्रास देतात, अशा तक्रारी आमच्याकडे येतात. वास्तविकता हा अधिकारीसुद्धा त्याच समाजातून आलेला असतो, याकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष वेधले.
विदर्भाचा अनुशेष दूर होण्यास झाली सुरुवात
२५वर्षांपूर्वीही प्रबोधिनी तयार झाली. आता कुठे विकास सुरू झाला. विदर्भाचा अनुशेष दूर व्हायला सुरुवात झाली आहे. शासनाची प्रत्येक योजना लाभार्थ्यांपर्यंत १०० टक्के पोहोचवली जाईल, असे प्रशिक्षण प्रबोधिनीमधून दिले जावे. डाॅ. रणजित पाटील, गृहराज्यमंत्री.

शेतकऱ्यांना ओळखणारे शासकीय अधिकारी घडावेत
शेतकरी,सर्वसामान्यनागरिकांना अनेक अधिकारी सहकार्य करत नाही. मात्र, वर्षभरापासून त्यामध्ये सुधारणा झाली आहे. प्रशिक्षणातून शेतकऱ्यांचे सर्वसामान्यांचे दु:ख ओळखणारे अधिकारी घडावेत, जेणेकरून त्यांच्या समस्या मार्गी लागतील. प्रवीण पोटे, पालकमंत्री.
विस्तारित इमारतीमध्ये या बाबींचा समावेश

-६० प्रशिक्षणार्थींची आसन क्षमता असलेले प्रशिक्षण केंद्र
- १५० प्रशिक्षणार्थीची क्षमता असलेला एक प्रशिक्षणार्थी कक्ष
- सहाही प्रशिक्षणार्थीं केंद्रात एलसीडी प्रोजेक्टर, इंटरनेट, इत्यादी सुविधा
- व्हर्च्युअल प्रशिक्षण केंद्र
- १६० संगणक जोडणीचे नियोजित संगणक प्रशिक्षण कक्ष संगणक प्रयोगशाळा प्रस्तावित आहे.
- लाख ग्रंथ, पुस्तके संदर्भ साहित्य नियोजित क्षमतेचे ६९५ चौ.मी. क्षेत्रफळ असणारे ग्रंथालय ग्रंथालय.
- जानेवारी २०१४ मध्ये झाला होता कामाला प्रारंभ. तब्बल कोटी ८९ लाख १२ हजार रुपये खर्चून विस्तारित इमारत उभारण्यात आली आहे,अशी माहिती प्रबोधिनीचे संचालक संजय बाहेकर यांनी दिली.