नागपूर - नागपुरातील केंद्रीय कापूस संशोधन संस्थेने (सीआयसीआर) लुधियाना येथील सेंटर ऑफ एक्सलन्स इनफार्म मशिनरीच्या सहकार्याने (सीओईएफएम) स्पिंडलटाइप कापूस वेचणी यंत्र विकसित केले असून त्याची यशस्वी प्रात्यक्षिकेही घेण्यात आली आहेत. संस्थेचे वरिष्ठ शास्त्रज्ञ गौतम मजुमदार यांनी ‘दिव्य मराठी’ला ही माहिती दिली.
हे नवे यंत्र ट्रॅक्टर माउंटेड करण्यात आल्यामुळे ट्रॅक्टरसोबत सहज जोडता येते. सध्या प्रात्यक्षिक घेण्यात येत आहे. त्यातून आलेले निष्कर्ष आणि लक्षात आलेले दोष दूर करून वर्षभरात महिंद्रासोबत करार करून व्यावसायिक उत्पादन करण्याचा प्रयत्न आहे. हे कापूस वेचणी यंत्र तीन तासांत एक हेक्टर म्हणजे अडीच एकरांतील कापूस वेचणी करीत असून त्यात काडीकचऱ्याचे प्रमाणही नगण्य राहते, असा दावा मजुमदार यांनी केला. दिवसभरात सहा ते सात एकरांतील कापूस वेचणी सहज करता येते.
स्पिंडलटाइप कापूस वेचणी यंत्रामुळे दिवसातून केव्हाही वेचणी करता येते. साधारणत: स्पिंडलटाइप यंत्रामध्ये पूर्ण फुटलेल्या कापूस बोंडांची वेचणी होते. न फुटलेल्या वा अर्धे फुटलेल्या बोंडांची वेचणी होत नाही. या यंत्रात हे दोष दूर करण्यात आले आहेत. पंजाबमधील सधन शेतकऱ्यांकडे सध्या ३० ते ४० लाखांत येणारी आणि तीन तासांत एक हेक्टरमधील कापूस वेचणी करणारी यंत्रे अाहेत. चार-पाच शेतकरी मिळून एक मशीन विकत घेतात. पंजाब, मध्य प्रदेश व महाराष्ट्रात येऊन कापूस वेचणीची कामे करतात. येथून मोठी कमाई करून परत जातात. मात्र त्यापेक्षा स्वस्त असलेले हे स्वदेशी कापूस वेचणी यंत्र बाजारात आल्यावर आपल्याकडेही सधन शेतकरी वा शेतकऱ्यांचे गट हे यंत्र विकत घेऊन व्यवसाय करू शकतात. भविष्यात शेतीकामाला होणारी मजुरांची कमतरता लक्षात घेता हा चांगला पर्याय ठरू शकतो, असे सीआयसीआरचे संचालक डाॅ. केशव क्रांती यांनी यांनी या वेळी बोलताना सांगितले.
यंत्राची वैशिष्ट्ये
स्वदेशी निर्मितीचे हे कापूस वेचणी यंत्र हाताळण्यास साेपे असून ते चालवायला कोणत्याही तांत्रिक कौशल्याची गरज नाही.
किंमत १५ ते २० लाख
यातून एक मीटर उंचीच्या कापसाच्या झाडाची बोंडे सहज काढता येतात. या यंत्राचे वजन १५०० किलोग्रॅम असून यासाठी ६० अश्वशक्तीचा ट्रॅक्टर लागतो. हे वेचणी यंत्र एका वेळी एका रांगेतील कापूस वेचणी करते.