आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ज्येष्ठ नागरिकांविरुद्धच्या गुन्हेगारीचे प्रमाण वाढतेच, उपराजधानीतील धक्कादायक वास्तव

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - उपराजधानी नागपुरात ज्येष्ठ नागरिकांच्या विरोधातील गुन्ह्यांचे प्रमाण सातत्याने वाढत असल्याची माहिती पुढे आली आहे. मागील पाच वर्षात ज्येष्ठ नागरिकांच्या विरोधातील ९४३ गुन्ह्यांची नोंद शहरात झाली आहे. 

माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी माहितीच्या अधिकाराचा वापर करून मिळवलेल्या माहितीतून हे धक्कादायक वास्तव पुढे आले आहे. मागील पाच वर्षात तब्बल ३६ ज्येष्ठ नागरिकांच्या खुनाच्या घटना घडल्या असून २०१५ मध्ये सर्वाधिक ९ खुनाच्या घटना घडल्या आहेत. ज्येष्ठ नागरिकांच्या बाबतीत लुटमारीच्या २१२ घटना मागील पाच वर्षात घडल्या आहेत. त्यात सर्वाधिक ४९ घटना २०१४ या सालातील आहेत. २०१६ मध्येही अशा ४४ घटनांची नोंद शहर पोलिसांकडे आहे. खुनाचे प्रयत्न, मारहाण व अन्य हिंसक गुन्ह्यांच्या ४४९ घटना निदर्शनास आल्या असून २०१५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांची फसवणूक केल्याच्या ६५ घटनांची नोंद झाल्याची माहिती मिळाली आहे.

ज्येष्ठ नागरिकांसाठी सहायता कक्ष सुरू : ज्येष्ठ नागरिकांना दिलासा देण्यासाठी उपराजधानीत २०१५ पासून ज्येष्ठ नागरिक सहायता कक्ष सुरु करण्यात आला असल्याचे स्पष्टीकरण पोलिसांकडून देण्यात आले आहे. प्रत्येक पोलिस ठाण्यात हा कक्ष असून पोलिस पथके सातत्याने ज्येष्ठ नागरिकांची घरी जाऊन त्यांच्या समस्या जाणून घेत आहेत, असा दावा शहर पोलिसांनी केला आहे. तथापि, ज्येष्ठ नागरिकांमध्ये या सहायता कक्षाबद्धल आजही पुरेशी जागृती नसल्याने त्यांना मदत देण्यात अडचणी येत असल्याचे शहर पोलिस मान्य करीत आहेत.
 
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण वाढले
सायबर गुन्हेगारीचे प्रमाण संपूर्ण राज्यातच वाढत असताना त्यात ज्येष्ठ नागरिकांना प्रामुख्याने लक्ष्य केले जात असल्याचे नागपुरात दिसत आहे. २०१५ मध्ये ज्येष्ठ नागरिकांशी संबंधित सायबर गुन्हेगारीच्या ९८ घटनांची नोंद झाल्याची माहिती नागपूर पोलिसांनी दिली.