आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

कुख्यात गुन्हेगार 13 वर्षानंतर अडकला पोलिसांच्या जाळ्यात, लोकेशन बदलविण्यात होता माहिर

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कुख्यात गुन्हेगार सुधीर काळे याच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी. - Divya Marathi
कुख्यात गुन्हेगार सुधीर काळे याच्यासह पोलिस अधिकारी, कर्मचारी.
यवतमाळ - तब्बल१३ वर्षांपासून फरार असलेल्या कुख्यात गुन्हेगाराला जिल्हा पोलिस अधीक्षकांच्या विशेष पथकाने अटक केली. ही कारवाई दि. १२ ऑगस्ट रोजी रात्रीच्या सुमारास नागपूर येथे करण्यात आली. सुधीर पंजाबराव काळे वय ४२ वर्ष रा. प्रविण नगर, अमरावती असे आरोपीचे नाव आहे. 
 
याबाबत पोलिस सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अमरावती जिल्ह्यातील मुळ रहिवासी असलेला आरोपी सुधीर काळे हा सन २००३ पासून अमरावती जिल्ह्यातून तडीपार असल्याने यवतमाळात वास्तव्यास होता. त्याच्यावर अमरावती येथील नागपूरी गेट पोलिस स्टेशनमध्ये ३६ गुन्हे तर गाडगेनगर पोलिस ठाण्यात ४८ गुन्हे दाखल आहे. ज्यामध्ये चोरी, घरफोडी, जाळपोळ, प्राणघातक हल्ले, दरोडा, दरोड्याचा प्रयत्न अशा विविध गंभीर गुन्ह्याची नोंद आहे. त्याचबरोबर नागपूरात देखील दरोड्याचा गुन्हा नोंद आहे. 
 
अमरावती येथून तडीपारीनंतर तो यवतमाळात वास्तव्यास होता. त्याच्या मागावर अमरावती, यवतमाळ, आणि नागपूरचे पोलिस होते. मात्र, तो अत्यंत शिताफीने वावरत असे, अशात २००९ मध्ये यवतमाळ शहरातही दरोडा टाकून फरार झाला होता. दरम्यान तो यवतमाळात वास्तव्यास असल्याची गोपनीय माहिती पोलिस अधिक्षकांच्या विशेष पथकाला मिळाली. अशात त्याने यवतमाळ सोडून नागपूर गाठले होते. परंतू त्याच्या सवंगड्याकडून त्याचा ठावठिकाणा पोलिसांना लागला होता. 
 
त्या अनुषंगाने शनिवार, दि. १२ ऑगस्ट रोजी सापळा रचून दरोडेखोर सुधीर काळे याला ताब्यात घेतले. त्याचवेळी त्याला पोलिसीहिसका दाखविला असता त्याने यवतमाळातील गुन्ह्याची कबूली दिली. तसेच अमरावतीतील पोलिस कर्मचाऱ्यावर रोखलेल्या पिस्तुल प्रकरणाचीही कबुली दिली. रविवारी मध्यरात्री दरम्यान कुख्यात गुन्हेगार सुधीर काळे याला यवतमाळात आणण्यात आले. 
 
ही कारवाई जिल्हा पोलिस अधिक्षक एम. राजकुमार, अपर पोलिस अधिक्षक अमरसिंह जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी पियुष जगताप, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरिक्षक संजय देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथकातील सैय्यद साजीद सैय्यद हाशीम, अजय डोळे, अजय ढोले, वासु साठोणे, रूपेश पाली, प्रदिप नाईकवाडे, योगेश डगवार, निलेश राठोड, पंकज गिरी, आदींनी केली. 
 
कुख्यात आरोपी सुधीर काळे याला अटक केल्यामुळे त्याने आजपर्यंत केलेल्या विविध गुन्ह्याची माहिती पोलिसांना चौकशीदरम्यान मिळणार आहे. तसेच चोरीच्या घटनाचा सुगावा लागू शकतो. 
 
लोकेशन बदलविण्यात होता माहिर 
अट्टल दरोडेखोर सुधीर काळे अमरावती जिल्ह्यातून तडीपार होताच यवतमाळ जिल्ह्यात त्याने बस्तान मांडले होते. अशात यवतमाळातही त्याने चांगलाच जम बसवून सवंगडी जमविले होते. तो स्वत: जवळ वापरत असलेला मोबाईलमधील सिमकार्ड वेळोवेळी बदलवित होता. विशेष म्हणजे घरातून बाहेर पडल्यानंतर मोबाइल सुरू करणे आणि घराच्या दिशेने निघतांना मोबाइल बंद करणे हा त्याचा नित्यक्रम होता. यासह इतरही माध्यमातून प्रत्येकवेळी तो स्वत:चे लोकेशन बदलवित होता. त्यामुळे त्याला पकडणे आजपर्यंत पोलिसांना शक्य झाले नव्हते मात्र आज त्याला अटक करण्यात आली आहे. 
बातम्या आणखी आहेत...