आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

यवतमाळ: दुसऱ्या टप्प्यात 18 जागांसाठी जिल्ह्यात आज होणार मतदान

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - जिल्हापरिषद, पंचायत समिती निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठी मंगळवार, २१ फेब्रुवारीला मतदान प्रक्रिया पार पडत आहे. या दुसऱ्या टप्प्यात जिल्हा परिषदेचे सहा गट तर पंचायत समितीच्या १२ गणांसाठी मतदान करण्यात येणार आहे. या एकूण १८ जागांसाठी तब्बल ९९ उमेदवार रिंगणात अाहेत. 
 
जिल्हा परिषदेच्या ६१ गटांसाठी आणि १६ पंचायत समितीच्या १२२ गणांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीचा पहिला टप्पा १६ फेब्रुवारीला पार पडले. त्यात ५५ गटांसाठी आणि ११० गणांसाठी मतदान करण्यात आले. गटांच्या आरक्षणावरून काही जण उच्च न्यायालयात गेल्याने गट आणि १२ गणांची निवडणूक मंगळवारी पार पडत आहे. या एकुण १८ जागांसाठी होणाऱ्या निवडणुकीसाठी ९९ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात कुंभा-मार्डी, घोन्सा-कायर, देऊरवाडी-सुकळी, वटफळी-अडगाव, लाडखेड-वडगाव आणि विडुळ-चातारी या जिल्हा परिषदेच्या सहा गटांचा समावेश आहे. त्यात देऊरवाडी-सुकळी गटात ६, तर त्याअंतर्गत येणाऱ्या दोन गणांत १२ उमेदवार रिंगणात आहेत. याचप्रमाणे लाडखेड वडगाव गटात सहा त्याअंतर्गत येणाऱ्या दोन गणात १२, वटफळी-अडगाव गटात पाच तर त्याअंतर्गत येणाऱ्या दोन गणात १३, विडुळ-चातारी गटात तर त्याअंतर्गत येणाऱ्या दोन गणात ७, घोन्सा-कायर गटात तर त्याअंतर्गत येणाऱ्या दोन गणात १० आणि कुंभा-मार्डी गटात एका जागेसाठी तर त्याअंतर्गत येणाऱ्या पंचायत समितीच्या दोन गणासाठी ११ उमेदवार रिंगणात आहेत. 
 
निवडणुकीचा दुसरा टप्पा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा प्रशासनाच्या वतीने विशेष उपाययोजना करण्यात आल्या. मतदानासाठी १७९ मतदान केंद्रांची निर्मिती केली असून, त्या ठिकाणी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळात मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. ही प्रक्रिया योग्य पद्धतीने पार पाडण्यासाठी ८०० कर्मचाऱ्यांची नियुक्ती केली आहे. निवडणुकीच्या या दुसऱ्या टप्प्यात सुमारे एक लाख ४७ हजार मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे. त्यात ७७ हजार ३९६ पुरुष आणि ६९ हजार ६०९ महिला मतदारांचा समावेश राहणार आहे. निवडणूक विभागाने तयार केलेली विविध पथके सर्व मतदान केंद्रांना भेटी देऊन परिस्थितीचा आढावा घेणार आहेत. 
 
यंदा जिल्हा परिषदेची निवडणूक भाजप, शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी या चारही पक्षांनी प्रतिष्ठेची केली आहे. त्यात जिल्ह्यात असलेल्या सर्व नेत्यांनी आपापल्या पक्षाच्या उमेदवारांसाठी प्रचारसभांचा धडाका लावला होता. काहीही करून जिल्हा परिषद काबीज करायची, असा चंग या नेत्यांनी बांधला होता. जिल्हा परिषदेच्या निकालावर अनेक नेत्यांची पुढची खेळी अवलंबून आहे. त्यासाठी या सर्व प्रमुख पक्षांनी त्यांच्या स्थानिक नेत्यांसह स्टार प्रचारकांचे दौरे घडवून आणले. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यासाठीही जोरदार प्रचार केल्यामुळे आता या निवडणुकीत नेमका कुणाचा जोर चालणार, याकडे लक्ष लागले आहे. 
 
पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात 
निवडणुकांचा दुसरा टप्पा शांततेत पार पाडण्यासाठी जिल्हा पोलिस दलाच्या वतीने विशेष बंदोबस्त तैनात केला आहे. या बंदोबस्तासाठी राज्य राखीव पोलिस दलाची एक तुकडी बोलावली असून, संवेदनशील मतदान केंद्रावर त्या तुकडीचे शस्त्रधारी जवान तैनात केले आहेत. त्यासोबत शेकडो पोलिस कर्मचारी आणि अधिकारी यांचा बंदोबस्त दिवसभर तैनात राहणार आहे. 
 
निकालाकडे लागले सगळ्यांचे लक्ष 
निवडणुकीचा हा दुसरा टप्पा पार पडल्यानंतर मतमोजणी २३ फेब्रुवारी रोजी होऊन त्याच दिवशी निकाल जाहीर करण्यात येणार आहे. त्यामुळे आतापर्यंत निवडणुकीच्या प्रचारात गुंतलेले सर्व उमेदवार आणि त्यांचे कार्यकर्ते या सगळ्यांचे लक्ष २३ तारखेला होणाऱ्या मतमोजणीकडे लागले आहे. 
 
आता चर्चा केवळ आकड्यांची 
जिल्हा परिषदेच्या ६१ जागांसाठी निवडणूक होत आहे. या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला जिल्हा परिषदेत स्पष्ट बहुमतासाठी ३१ सदस्य विजयी करावे लागणार आहेत. त्यामुळे आता ३१ या आकड्याचे गणित कुठला पक्ष जुळवू शकतो याची चर्चा सध्या सर्वत्र सुरू आहे. 
बातम्या आणखी आहेत...