आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

धामणगाव रेल्वे तालुक्यात सर्वत्र सप्तरंगांची उधळण, पर्यावरणपुरक होळीला ठिकठिकाणी प्राधान्य

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धामणगाव - तालुक्यातील विविध ठिकाणी एकमेकांवर सप्तरंगांची उधळण करून धुळवड धूमधडाक्यात साजरी करण्यात आली. तरुणांसह आबालवृध्दही रंगोत्सवामध्ये चांगलेच न्हाऊन निघाले. सकाळपासूनच प्रमुख बाजारपेठा, बंद असल्याने चौकाचौकामध्ये ढोल-ताशांच्या गजरात रंगोत्सव साजरा करण्यात आला. 
होळीचा सण संपल्यानंतर दुसऱ्याच दिवशी धुळवड साजरी केली जाते. सकाळपासूनच रस्त्यांवर तरुणाईचा घोळका एकत्र येऊन रंगोत्सव साजरा करीत होते. काहींनी चौकाचौकांमध्ये डीजे लावला होता, तर काही ठिकाणी बँजो, ढोल- ताशाच्या गजरावर ठेका धरला होता. सप्तरंगांच्या रंगात तरुणाई मंत्रमुग्ध झाली होती. 
तोंड रंगविलेल्या बाइकस्वारांसह चारचाकी वाहनातून जथ्थेच्या जथ्थे रस्त्यांवरून फिरत होते. तरुणींसह महिलांनीही रंगोत्सव साजरा केला. मुलांच्या ग्रुपप्रमाणेच तरुणीचेही ग्रुप रस्त्यावर धुळवड साजरी करताना ठिकठिकाणी दिसत होते. दरम्यान, कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी ठिकठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. सर्वत्र शांततेत उत्सव साजरा करण्यात आला. 
तालुक्यात ३७९ होळ्या पेटविण्यात आल्या होत्या. धूलिवंदन शांततेत साजरे करण्यात आले. पाणी वाचविण्यासाठी काही ठिकाणी कोरडेच धूलिवंदन पाहायला मिळाले. गावागावातील लहान मुलांनी दहा दिवस आधीच होळीची तयारी करून होलिकोत्सव जवळ आल्याची चाहूल दिली होती. दोन- तीन दिवस आधी सुकलेल्या झाडांच्या फांद्या गोळा करण्यात आल्या. 
होळीच्या दिवशी सावरीचे झाड मधोमध उभे करून त्याभोवती लाकडे, झाडांच्या फांद्या, पेंढ्या टाकून होळी रचण्यात आली. त्यानंतर ग्रामस्थांनी होळीची पूजा करून रात्री होलिका दहन करण्यात आले. धुळवडीच्या दिवशी लहानग्यांनी रंगांची उधळण करीत धुळवड साजरी केली. वाहनाची रेलचेलही तुरळक होती. प्रत्येकाच्या हातात रंग, गुलाल, पिचकाऱ्या दिसत होत्या. 
इकोफ्रेण्डली होळी साजरी 
सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांना दिला जाणारा अनमोल संदेश म्हणजे यंदा होळी साजरी करा पण फक्त टिळा लावून, यामुळे रंग धुण्यासाठीदेखील पाण्याचा जास्त वापर केला जाणार नाही, अशा संदेशाचे पालन करत असा आगळ्यावेगळ्या पध्दतीने रंगोत्सव साजरा करण्यात आला. इकोफ्रेंण्डली पध्दतीने होळी साजरी करण्याकडे युवा पिढीचा मोठ्या प्रमाणात कल दिसून आला. काही गावात एक गाव एक होळीची परंपरा पाळली गेली. याउलट शहरी भागात गल्ली-गल्लीत नगरात छोटया मोठया होळया पेटविण्यात आल्या. 
बातम्या आणखी आहेत...