आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीचा धूमधडाका सुरू, सुग्रास फराळाचा घरोघरी बेत

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - आली दिवाळी हासत, लक्ष दीपांनी घरे उजळू असे म्हणत यंदा दिवाळीचा धुमधडाका सुरू झाला आहे. फटाक्यांचे आवाज फारसे ऐकू येत नसले तरी बाजारातील फुगलेली गर्दी, लख्खदीदपमाळांसह आकाशदिव्यांनी उजळलेली घरे, प्रतिष्ठाने, सडा-रांगोळ्यांनी सजलेले अंगण, गृहिणींद्वारे तयार केल्या जाणाऱ्या सुग्रास फराळाचा घमघमाट सर्वत्र दरवळत आहे.
दिवाळीच्या दर दिवसाची सुरुवात सडा, सारवणाने होत असून रांगोळ्यांनी अंगण सजवले जात आहे. काही ठिकाणी चिमुकले अंगणात आकर्षक किल्ले बनवण्यात व्यस्त आहेत. सर्वत्र लगबग सुरू असून कोणी रांगोळ्या, पणत्या, कंदील, आकाशदीप तर कोणी कपडे, घर सजावटीचे साहित्य, तोरण, पडदे खरेदी करण्यासाठी घाई करताना दिसताहेत.

वर्षातील सर्वात मोठा सण असल्यामुळे आपापल्या ऐपतीनुसार काही कमी पडू नये, यासाठी जो-तो प्रयत्न करताना दिसत होता. घरातील प्रत्येक साहित्य आणण्यासाठी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची धावपळ सुरू होती. त्यातच गुरूवार २७ रोजी शालेय विद्या
र्थ्यांची परीक्षा आटोपून त्यांना सुट्या लागल्यामुळे ते तर चांगलेच उत्साहात दिसत होते.
गृहिणी मात्र सकाळपासूनच खमंग फराळाचे जिन्नस तयार करण्यात व्यस्त होत्या. त्यांना काही हवे नको ते बघण्यासाठी बच्चेकंपनी सहकार्य करीत होती. दिवाळीला बहुतेकजन नवीन वस्तुंची खरेदी करीत असल्यामुळे बाजारातही चैतन्य पसरले होते. घरातील केर स्वच्छ करण्यासाठी लागणारा फडा केरसूणी खरेदी करण्यासोबतच घर स्वच्छ जंतुरहित करण्यासाठी आवश्यक वस्तूही खरेदी केल्या जात होत्या. फडा केरसुणीला लक्ष्मी मानतात त्यामुळे यांची खरेदी करून लक्ष्मीपूजनाला आम्ही पूजा करीत असताे, अशी माहिती एका ज्येष्ठ महिलेने दिली.

दिवाळीलाचढणार पारंपरिक आधुनिक साज :यंदा दिवाळीचा आनंद द्विगुणित करण्यासाठी विविध आकाराच्या पणत्या, कंदिल, दिवे, आकाशदिवे, रांगाेळ्या अशा पारंपरिक वस्तुंची खरेदी करण्यासोबतच ग्राहकांचा आधुनिक साहित्य खरेदी करण्यावर चांगलाच भर आहे. संगणक, लॅपटाॅप, नवीन तंत्रज्ञानानेयुक्त मोबाईल, वाॅशिंग मशीन, दोन चारचाकी वाहने, एलसीडी, एलईडी, युएसडी टीव्ही खरेदीसाठी गर्दी होत आहे.

भेटवस्तू देण्यासाठीही खरेदी
आप्त-स्वकीय,मित्रांना भेटवस्तू देण्यासाठीही बाजारात फराळाचे साहित्य, पेढे, मिठाई, सुका मेवा, चाॅकलेट्स, पोशाख आकर्षक पॅकमध्ये सजवून ठेवण्यात आले असून त्यांची खरेदी करण्यासाठी झुंबड उडत आहे. अगदी १०० रु. पासून ते हजारो रुपयांपर्यंतचे आकर्षक पॅक उपलब्ध आहेत.

अश्विन दर्श अमावस्या दिवाळीचा मुख्य दिवस
अश्विन दर्श अमावस्या हा दिवाळीचा मुख्य दिवस असून या दिवशी सायंकाळनंतर मुहूर्तानुसार लक्ष्मीपूजन केले जाते. कमळावर विराजमान श्री लक्ष्मी, उजवीकडे सरस्वती आणि डावीकडे विघ्नहर्त्याचे छायाचित्र भिंतीवर लावून तसेच श्री लक्ष्मीची सुबक मूर्ती खरेदी करून पूजन केले जाते. यासोबतच धान्याने भरलेले मापले तांदूळ आणि उडदाची रास मांडून त्यापासून लक्ष्मीची मूर्ती चौरंग किंवा पाटावर काढून त्याची गंध, अक्षदा, हळद, कुंकू सुवासिक फुलांद्वारे पूजा करून महालक्ष्मीची आरती केली जाते. देवीला पूरणपोळी, लाह्या, बत्तासे, लाडू, करंज्या, चकल्या, मिठाईचा नैवेद्य चढवला जातो.

शरातील मूर्ती प्रसिद्ध
संपूर्ण विदर्भात रेखीव लक्ष्मींच्या मूर्तीसाठी अमरावती प्रसिद्ध असून येथूनच नागपूर, चंद्रपूर, अकोला, वाशीम, गोंदिया, यवतमाळ, भंडारा,गडचिरोलपर्यंत या मूर्ती विक्रीसाठी जात असतात. यातून मूर्तीकार दरवर्षी कोट्यवधी रु.ची उलाढाल करतात. येथील मूर्तीचा चेहरा रेखीव असतो.
बातम्या आणखी आहेत...