आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिवाळीने झुगारली महागाई, लक्ष्मीपूजनाच्या पूर्वसंध्येला बाजार फुलला

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - दिवाळीच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक साहित्य आणि झेंडूच्या फुलांची मागणी वाढली आहे. दसऱ्याच्या तुलनेत दिवाळीत झेंडूच्या फुलांचे दर दुपटीने वाढले आहेत. तर लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक असलेल्या मुर्तींच्या किंमतीदेखील वाढल्या आहेत. मात्र, महागाई झुगारून खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होत आहे.
घरगुती वापराच्या वस्तू आणि पुजा साहित्य खरेदी करण्यासाठी बाजारपेठेत शनिवारी गर्दी उसळली होती. बाजारपेठेत दिवाळीतील तोरणांसाठी झेंडूच्या फुलांची मागणी प्रचंड वाढली आहे. दसऱ्याला झेंडूच्या फुलांचे दर १० ते १५ रुपये किलो होते. मात्र, सध्या झेंडूचे दर ३० ते ३५ रुपये किलोवर गेले आहेत. तसेच लक्ष्मीपूजनासाठी आवश्यक लक्ष्मीमातेच्या मूर्तींचे दर २५० ते ५०० रूपयापर्यंत होते. यासह मातीच्या पणत्या १० रूपये डझन तर चिनीमातीच्या पणत्या २० ते २५ रूपये डझनप्रमाणे विक्री होत आहेत. मातीच्या पणत्यांना जास्त प्रमाणात पसंती दिली जात असल्याचे चित्र आहे. विविध प्रकारचे आकाशकंदील, कापडी फुलांचे रंगीबेरंगी तोरण आणि हार बाजारात उपलब्ध झाले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी ग्राहकांची झुंबड उडाली होती.

अर्थ अर्थात संपन्नेची देवता असलेल्या लक्ष्मीचे पूजन करत दिवाळी सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. सर्वात मोठा सण असल्याने शहरासह संपूर्ण जिल्ह्यात दिवाळीला आनंदाचे तोरण लागले आहे. रविवार ३० ऑक्टोबरला लक्ष्मीपूजन असल्याने पूजासाहित्यासह मिठाई, फुले, फटाके खरेदी करण्यासाठी संपूर्ण बाजारपेठ नागरिकांच्या गर्दीने फुलून गेली आहे. प्रकाशाने लक्ष्मीचे स्वागत होत असल्याने प्रत्येक नागरिकांची घरे लख्ख दिव्यांनी उजळून निघाली आहे.
लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने ‘आर्थिक व्यवहारातील सचोटी नीती’ आणि ‘अर्थप्राप्तीच्या साधनांविषयी कृतज्ञता’ अशी दोन महत्वाची मूल्य मनात रुजतात; म्हणून या पूजेची विशेषत: आहे. दिवाळी अथवा दीपावली हा प्रामुख्याने हिंदू, तसेच अन्य धर्मीय समाजात काही प्रमाणात साजरा केला जाणारा उत्सव आहे. व्यापारी लोकांचे हिशोबाचे नवीन वर्ष लक्ष्मीपूजनानंतर सुरू होते. या दिवशी सर्व अभ्यंग स्नान करतात. पाटावर रांगोळी काढून तांदूळ ठेवतात. त्यावर वाटी किंवा तबक ठेवतात. त्यात सोन्याचे दागिने, चांदीचा रुपया, दागिने ठेवून त्यांची पूजा करतात. या दिवशी स्वच्छता करण्यासाठी लागणारी नवी केरसुणी विकत घेतात. तिलाच लक्ष्मी मानून तिच्यावर पाणी घालून हळद-कुंकू वाहून घरात वापरण्यास सुरुवात करतात.

फेस्टिवल कपड्यांना बाजारात मागणी
विदर्भातील सर्वात मोठे कपडा मार्केट असल्याने अमरावती शहरात कपडे खरेदी करण्यासाठी नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून येत आहे. कपड्यांची दुकाने असलेला प्रामुख्याने जयस्तंभ चौक, जवाहर गेट मार्ग, प्रभाग चौक, खत्री कंपाऊंड येथील रस्ते गर्दीने फुल्ल झाल्याचे चित्र दिसून येत होते. दररोज घातल्या जाणाऱ्या कपड्यांऐवजी उत्सवांदरम्यान म्हणजे फेस्टिवल कपड्यांना बाजारात अधिक मागणी होती.
बातम्या आणखी आहेत...