आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

नक्षल्यांशी संबंधित प्राे. साईबाबाच्या जन्मठेपेसाठी इलेक्ट्रॉनिक पुरावे महत्त्वाचे

4 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गडचिरोली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यापूर्वी मंगळवारी प्रो. साईबाबा न्यायालयाच्या परिसरात व्हीलचेअरवर हजर झाला हाेता. - Divya Marathi
गडचिरोली येथील जिल्हा आणि सत्र न्यायालयात जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यापूर्वी मंगळवारी प्रो. साईबाबा न्यायालयाच्या परिसरात व्हीलचेअरवर हजर झाला हाेता.
नागपूर - माओवाद्यांचा थिंक टँक प्रो. साईबाबा आणि त्याच्या चार साथीदारांना जन्मठेपेच्या शिक्षेपर्यंत पोहोचवण्यात गडचिरोली पोलिसांनी गोळा केलेल्या भक्कम इलेक्ट्रॉनिक पुराव्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे.  
 
गडचिरोली जिल्हा आणि सत्र न्यायालयाने मंगळवारी प्रो. जी. एन. साईबाबा आणि त्याचे सहकारी प्रशांत राही, हेम मिश्रा, महेश तिर्की, पांडू नरोटे या पाच जणांना जन्मठेप, तर विजय तिर्की याला सहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावली. गडचिरोली पोलिसांनी साईबाबा आणि कंपनीच्या देशद्रोही कारवाया उघड करण्यासाठी इलेक्ट्रॉनिक पुराव्यांवर भर दिला, अशी माहिती या प्रकरणातील विशेष सरकारी वकील अॅड. प्रशांतकुमार सत्यनाथन यांनी  दिली. साईबाबा आणि प्रशांत राही, हेम मिश्रा यांच्यातील चळवळीचे संबंध उघड करण्यासाठी पोलिसांनी दिल्लीतील मोबाइल टॉवर लोकेशनचे पुरावेही गोळा केले. त्यातून राही आणि मिश्रा या दोघांनी दिल्ली विद्यापीठातील साईबाबाची नेमकी कोठे, केव्हा आणि किती वेळा भेट घेतली, याचे भक्कम पुरावे न्यायालयापुढे मांडले गेले, असे सत्यनाथन यांनी सांगितले. साईबाबाच्या दिल्लीतील निवासस्थानातून जप्त केलेल्या चार हार्डडिस्कमधील डेटाच्या माध्यमातून साईबाबाच्या आंतरराष्ट्रीय पातळीवर सुरू असलेल्या कारवायांचा पर्दाफाश करण्यात यश आले. हार्डडिस्कमध्ये रिव्होल्युशनरी डेमोक्रॅटिक फ्रंट कार्यक्रमांत साईबाबाच्या सहभागाचे व्हिडिओ, कागदपत्रे सापडली.
 
अांतरराष्ट्रीय स्तरावर कारवायांत सहभाग
साईबाबाने माओवादी संघटनांना एकत्र आणण्यासाठी आंतरराष्ट्रीय संघटनांची उभारणी केली हाेती. त्यापैकी फिलिपाइन्समधील डाव्या पक्षाच्या मदतीने त्याने इंटरनॅशनल लीग फॉर पीपल्स स्ट्रगल या संघटनेची स्थापन करून ताे संघटनेचा डेप्युटी सेक्रेटरी झाल्याचे तपास यंत्रणेला आढळून आले. माओवादी दलम कमांडर नर्मदाक्का हिला संदेश पोहोचवण्यासाठी साईबाबा याने हेम मिश्रा याला दिलेला पेन डाइव्ह व त्यातील माहिती मिश्राच्या अटकेनंतर तपास यंत्रणांच्या हाती लागली होती. 
बातम्या आणखी आहेत...