आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दक्षता : कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करण्यासाठी आता ‘फिक्स डे’

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
यवतमाळ - कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेसाठी आता जिल्हा परिषद आरोग्य विभागाने ‘फिक्स डे’ कार्यक्रमाचे नियोजन केले. त्या अनुषंगाने महिन्याभरात दोनवेळा शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. यात संपूर्ण सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे सोपवण्यात आली आहे. कुठल्याही प्रकारची गैरसोय झाल्यास संबंधितावरच जबाबदारी निश्चित करण्यात येणार असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. 
जिल्ह्यातील ६३ ही प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया शिबिर घेतल्या जात होते. बहुतांश ठिकाणी अपुऱ्या सोयीसुविधांमध्ये शस्त्रक्रिया शिबिर होत होते. त्यात सर्जनच्या निगराणीखाली शस्त्रक्रिया सुद्धा केल्या जात नव्हत्या. परिणामी, बऱ्याच ठिकाणी अनुचित प्रकारसुद्धा घडलेला आहे. असाच काहीसा प्रकार काही महिन्यापूर्वी पुसद तालुक्यातील बेलोरा प्राथमिक आरोग्य केंद्रात घडला. ह्या प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेचे शिबिर आयोजित करण्यात आले होते. या शिबिरात चुकीच्या पद्धतीने शस्त्रक्रिया केल्यामुळे उमरखेड तालुक्यातील एका महिलेला जीव गमवावा लागला, तर एका महिलेची प्रकृती अत्यंत चिंताजनक आहे. विशेष म्हणजे चुकीचे कार्य करणाऱ्या डॉक्टरवर अद्यापही कुठल्याच प्रकारची कारवाई झाली नाही. अशा प्रकारच्या अप्रिय घटना घडू नये म्हणून उशिराने का होईना जिल्हा परिषद जिल्हा आरोग्य विभागाने बोध घेतला. अशा घटना टाळण्यासाठी आरोग्य विभागाने ‘फिक्स डे’ कार्यक्रमाचे नियोजन केले आहे. 

‘फिक्स डे’ कार्यक्रमामध्ये जिल्ह्यातील सोळाही तालुक्यातील एका प्राथमिक आरोग्य केंद्रावर महिन्याभरात दोन किंवा तीनवेळा शस्त्रक्रिया शिबिर आयोजित करण्यात येणार आहे. या शस्त्रक्रिया शिबिरापूर्वीची संपूर्ण तयारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अधिपत्याखाली करण्याबाबतच्या लेखी सुचना देण्यात आल्या आहेत. यात प्रामुख्याने शिबिराच्या ठिकाणी आवश्यक त्या उपाय योजना करणे आणि उपाय योजना केल्याचे संमतीपत्र तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना द्यावे लागणार आहे. त्यानंतर कुटुंबकल्याण शस्त्रक्रियेदरम्यान कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडल्यास संपूर्ण जबाबदारी तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांवर निश्चित करण्याचे निर्देश जारी करण्यात आले आहे. या कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेच्या अनुषंगाने आयोजित शिबिरासाठी आरोग्य विभागाचा फौजफाटा तयार राहणार आहे. त्याचप्रमाणे प्रयोगशाळा तंत्रज्ञानाकडून संपूर्ण तपासणी करण्यात येणार आहे. तालुक्यातील सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रावरील वैद्यकीय अधिकाऱ्यांसह सर्जनच्या अधिपत्याखाली शस्त्रक्रिया होणार आहे. विशेष म्हणजे ‘फिक्स डे’ कार्यक्रम घेण्याबाबत शासन स्तरावरही पत्रव्यवहार करण्यात आला आहे. अशा प्रकारचे शिबिर घेतल्यास कुठल्याही प्रकारची अनुचित घटना घडणार नाही, यात तिळमात्र शंका नाही. 
 
इतर शिबिर घेतल्या जाणार नाही 
प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया केल्या जात होत्या. यात आता बदल करण्यात आला असून, तालुक्यातील केवळ एका प्राथमिक आरोग्य केंद्रात कुटुंबकल्याण शस्त्रक्रिया शिबिराचे नियोजन करण्यात येणार आहे. रुग्णांना सोय होईल, अशा ठिकाणी शस्त्रक्रिया शिबिर आयोजित केली जाणार आहे. केवळ रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून ‘’फिक्स डे’’ कार्यक्रम तयार करण्यात आला आहे. परिणामी, इतर प्राथमिक आरोग्य केंद्रात शिबिर घेतल्या जाणार नाही. 
 
रुग्णांची गैरसोय होऊ नये हेच महत्वाचे 
- शस्त्रक्रिया शिबिर‘’फिक्स डे’’ कार्यक्रमानुसार करण्यात येणार आहे. तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांना संपूर्ण नियोजनाची पाहणी करून संमतीपत्र द्यावी लागणार आहे. 
संमती पत्रानंतरही कुठल्याही प्रकारची अप्रिय घटना घडल्यास संबंधितावरच जबाबदारी निश्चित केल्या जाईल. याशिवाय रुग्णांची गैरसोय होवू नये म्हणून विशेष लक्ष दिले जाणार आहे. यासंदर्भातील कार्यक्रम शासनाकडेसुद्धा सादर करण्यात आलेला आहे.
’’ डॉ.के. झेड. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी. 
 
(Pls Note- तुम्ही जर मोबाईलवर ही बातमी वाचत असाल तर फोटोच्या वरच्या बाजूला असलेल्या Whatsapp आणि Facebook च्या आयकॉनवर क्लिक करुन इतरांनाही सहज शेअर करा. तुम्ही जर लॅपटॉप, कॉम्प्युटरवर वाचत असाल तर URL म्हणजेच लिंक शेअर करा. धन्यवाद.)
बातम्या आणखी आहेत...