आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

विदर्भातील शेतकरीही 1 जूनपासून संपावर; शेतकरी संघटनेची बैठक

5 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमदार निवासात  किसान क्रांती संघटना व शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत बोलताना किसान क्रांतीचे समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी. - Divya Marathi
आमदार निवासात किसान क्रांती संघटना व शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत बोलताना किसान क्रांतीचे समन्वयक जयाजीराव सूर्यवंशी.
नागपूर- येत्या १ जूनपासून होणाऱ्या शेतकऱ्यांच्या संपात विदर्भातील शेतकऱ्यांनीही सहभागी होण्याचा निर्णय किसान क्रांती संघटना व शेतकरी संघटनेच्या संयुक्त बैठकीत घेण्यात आला. आमदार निवासात झालेल्या बैठकीत किसान क्रांतीचे समन्वयक जियाजीराव सूर्यवंशी, शेतकरी संघटनेचे राज्याचे अध्यक्ष अनिल धनवट, विजय काकडे पाटील, शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष राम नेवले आदी उपस्थित होते. 

१ जूनपासून सुरू होणाऱ्या संपात किसान क्रांती संघटना, शेतकऱ्यांसाठी काम करणाऱ्या विविध संघटनांसह प्राेग्रेसिव्ह फार्मर्स आदी सहभागी होणार असल्याचे नेवले यांनी सांगितले. 
आतापर्यत संपाला ४२ संघटनांनी पाठींबा दिला आहे. शेतीतज्ज्ञ बुधाजी मुळीक यांची भू-माता संघटना, खासदार उदयसिंग राजे भोसले, हमाल मापाडी संघटनेचे बाबा आढाव आदींनी समर्थन दिल्याचे नेवले यांनी सांगितले.  यवतमाळ जिल्ह्यातील दाभडी येथे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उत्पादन खर्च अधिक पन्नास टक्के नफा देण्याचे जाहीर केले होते. नंतर सर्वोच्च न्यायालयात असा भाव देता येणार नाही, हे लिहून दिले. संपूर्ण कर्जमुक्ती करा, शेतकरी विरोधी कायदे रद्द करा, शेतीच्या बांधापर्यत डांबरी रस्ते बांधा, फळभाज्यांसाठीही हमीभाव जाहीर करण्यात यावे, आदी मागण्यांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. 
संपकाळात सभा, मेळावे, बैठका, कोपरा सभा घेऊन शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येईल. एकतर पिकवू नये आणि पिकवले तरी विकू नये. शहरांची रसद बंद झाली की, सरकारला जाग येईल, असे राम नेवले म्हणाले. बैठकीला माजी आमदार सरोज काशीकर, माजी कुलगुरू अरूण केदार, सुनंदा तुपकर, भाजी व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष प्रभाकर काळे, अण्णाजी राजेधर आदी उपस्थित होते.
बातम्या आणखी आहेत...