आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दिव्य मराठी विश्लेषण : शेतकऱ्यांचा खरंच कळवळा की केवळ राजकारण?

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर - विधिमंडळाचे अधिवेशन हे जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी असते. नागपूर येथे दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च करून हिवाळी अधिवेशन घेतले जाते; परंतु अधिवेशनात राजकारण्यांचे वर्तन पाहिले की त्यांना खरोखरंच जनतेची काळजी असते, असे दिसून आले नाही. दुष्काळ, अवकाळी पाऊस यामुळे राज्यातील शेतकरी त्रस्त झालेला आहे. आत्महत्या वाढू लागलेल्या आहेत, त्याला सरकारकडून भरीव दिलासा मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु सलग तिसऱ्या दिवशी शेतकऱ्यांच्या प्रश्नावर विधिमंडळात काहीही चर्चा झाली नाही. सत्ताधारी चर्चेला तयार, तर विरोधक त्यांच्या कामामुळे चर्चेला तयार नसल्याचे चित्र गुरुवारीही दिसून आले.
शेतकऱ्यांच्या प्रश्नावर मंगळवारी काँग्रेसने मोर्चा काढला, मात्र सभागृहाचे कामकाज होऊ दिले नाही. बुधवारी सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त नेत्यांना दिल्लीला जायचे असल्याने कामकाज झाले नाही, तर गुरुवारी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा वाढदिवस असल्याने राष्ट्रवादीचे नेते अनुपस्थित होते. काँग्रेसचे आमदार गुरुवारी सकाळी सभागृहात आले, परंतु त्यांचाही काम करण्याचा इरादा दिसत नव्हता. ‘शेतकऱ्यांना कर्जमाफी द्या’ अशी मागणी करत त्यांनी दाेन दिवसांपासून सुरू असलेला गोंधळ आजही कायम ठेवला. राज्यात कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांपेक्षा कर्ज न घेतलेल्या शेतकऱ्यांची संख्या मोठी आहे. त्यांनाही मदत करणे आवश्यक आहे, परंतु विरोधक केवळ कर्जमाफीचाच मुद्दा घेऊन समोर येत असल्याचे चित्र दिसले.

सरकारची चर्चेची भूमिका मान्य नसल्याने काँग्रेस अामदारांनी विधानसभेत अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेऊन घोषणाबाजी सुरू केली. या वेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम यांनीही काँग्रेसच्या मागील कारभारामुळेच मराठवाड्यात शेतकऱ्यांच्या आत्महत्या वाढत असल्याचा अाराेप केला. केवळ १५ मिनिटांतच अध्यक्षांना कामकाज दहा मिनिटांसाठी तहकूब करावे लागले. त्यानंतर कामकाज सुरू झाले तेव्हा काँग्रेसचे फक्त १५ आमदारच उपस्थित होते. त्यांच्या घाेषणाबाजीला उत्तर देण्यासाठी सत्ताधारी आमदारही जागेवर उभे राहून उत्तर देऊ लागले. या गोंधळामुळे पुन्हा १० मिनिटांसाठी सभागृहाचे कामकाज तहकूब करण्यात आले. कामकाज सुरू झाल्यानंतरही काँग्रेस आमदारांनी गोंधळ सुरू ठेवला आणि विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी कामकाजावर बहिष्कार घालत असल्याची घोषणा केली आणि सभागृहाबाहेर निघून जाऊ लागले, तेव्हा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांना थांबवून चर्चा करून निर्णय घेऊ असे म्हटले. परंतु चर्चेच्या गुऱ्हाळाने काही होत नाही असा आरोप करत विरोधक सभागृहाबाहेर पडले.
चर्चा करा, मदतीची घोषणा करू : एकनाथ खडसे
महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी सरकारची चर्चेला तयारी आहे, परंतु विरोधकच तयार नसल्याचे म्हटले. ‘राष्ट्रवादीचे कोणीही सभागृहात उपस्थित नाही आणि काँग्रेसची संख्याही निम्मीच अाहे. शेतकऱ्यांप्रति आस्था असती तर सर्व सदस्य उपस्थित राहिले असते. अधिवेशनावर कोट्यवधींचा खर्च होतो त्यामुळे सभागृहाचा वेळ न घालवता चर्चा सुरू करू आणि मदतीची घोषणाही करू,’ असेही स्पष्ट केले, तर विरोधकांना शेतकऱ्यांच्या समस्यांमध्ये रस नसल्याची टीका करत मुख्यमंत्र्यांनी विराेधकांच्या बहिष्काराचा निषेध केला.