आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

साहित्यिकांचा कित्ता गिरवत शेतकरीही करणार पुरस्कार वापसी

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नागपूर- साहित्यिकांच्या पावलावर पाऊल टाकत चंद्रपूर जिल्ह्यातील दोन शेतकऱ्यांनी केंद्र व राज्य सरकारच्या शेतकरीविरोधी धोरणाचा निषेध करीत त्यांना मिळालेले शेतीनिष्ठ व कृषिभूषण पुरस्कार सरकारला परत करण्याचा निर्णय बुधवारी जाहीर केला.

चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील वाढोणा येथील मोरेश्वर झाडे आणि सावरगाव येथील हेमंत शेंदरे या दोन शेतकऱ्यांनी बुधवारी नागपुरात पत्रकार परिषदेत आपला हा निर्णय जाहीर केला. गुरुवारी दोघेही विभागीय आयुक्तांची भेट घेऊन त्यांना मिळालेले शेतीनिष्ठ व कृषिभूषण पुरस्कार परत करणार आहेत. मोरेश्वर झाडे यांना सन १९८८ मध्ये राज्यपालांच्या हस्ते शेतीनिष्ठ शेतकरी, सन २००२ मध्ये कृषिभूषण पुरस्काराने सन्मानित केले होते, तर हेमंत शेंदरे यांना सन २००४ मध्ये शेतीनिष्ठ शेतकरी व सन २०१० मध्ये कृषिभूषण पुरस्कार मिळाला आहे. मोरेश्वर झाडे यांनी सांगितले की, एकीकडे सरकार शेतकऱ्यांना पुरस्कार देऊन अधिक उत्पादनवाढीसाठी प्रवृत्त करते आहे, तर दुसरीकडे सरकारने शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढू दिले नाही. शेतीचा उत्पादन खर्च भरमसाट वाढत असताना शेतमालाचे भाव सरकार वाढू देत नाही. त्यामुळे शेतीव्यवसाय तोट्यात असून कर्जबाजारीपणा वाढत असल्याने त्याच्यावर आत्महत्येची वेळ येत आहे, तरीही सरकार या प्रश्नाकडे गांभीर्याने पाहत नाही. स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची अंमलबजावणी करायला सरकार तयार नाही, असा आरोपही त्यांनी केला. हेंमत शेंदरे यांचाही हाच प्रश्न आहे. भात पीक स्पर्धेत ते राज्यात दुसरे आले होते. तसेच त्यांना जमशेदजी टाटा नॅशनल फेलोशिपही मिळाली आहे. शेंदरे यांनी पाच युरोपीय देशांचा दौराही केला आहे. माझ्यावरही कर्जबाजारी होण्याची वेळ आली असल्याचे शेंदरे यांनी सांगितले. उत्पादन खर्चावर ५० टक्के नफा मिळणार असेल, तरच भविष्यात शेती परवडणार आहे, असेही त्यांनी सांगितले. केंद्र व राज्य सरकारची धोरणे शेतकरीविरोधी असल्याने पुरस्कार वापसीचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
माझीच ही अवस्था तर इतरांचे काय?
शेतीचा उत्पादन खर्च वाढत असताना सरकार शेतमालाचे भाव वाढू देत नाही. त्यामुळे शेतीचा तोटा, कर्जबाजारीपणा वाढत आहे. माझी स्वत:चीच शेती तोट्यात आहे. १० लाखांच्या वर कर्ज झाल्याने शेती व घरही विक्रीला काढले आहे. माझ्यासारख्या शेतकऱ्याची ही अवस्था तर इतरांचे काय?
- मोरेश्वर झाडे, शेतीनिष्ठ शेतकरी व कृषिभूषण पुरस्कार विजेते