आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

वाहनांच्या टाकाऊ ‘स्पेअर पार्ट’पासून अश्व, अमरावतीच्‍या कलाकराची कलाकृती

6 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अमरावती - विविध धातू, ओली माती, प्लास्टर ऑफ पॅरिसपासून मूर्तिकाम करणे तसे कठीणच, पण विभिन्न आकाराच्या वस्तू, भंगारातील लोखंडी साहित्याचे तुकडे वापरून किंवा मूर्ती घडवणे तर त्याहून कौशल्याचे काम आहे. मात्र अशाच भंगारातील वस्तू, वाहनांचे टाकाऊ स्पेअर पार्ट वापरून अमरावतीत एका कलाकाराने अवाढव्य अश्व तयार केला आहे. १५ फूट लांब आणि १० फूट उंचीचा दिमाखदार महाअश्वच! या अश्वाला दोन भले मोठे पंखही लावण्यात आले आहेत. प्रसंगी हवेत उडणारा, उंचापुरा, देखणा आणि रुबाबदार दिसणारा हा लक्षवेधक अश्व तयार केला आहे प्रसिद्ध अॅनिमेशन कलाकार प्रा. विजय राऊत यांनी.

दुरून बघितला तर कोणत्या तरी धातूपासून हा अश्व केला असावा याचा अंदाज नक्कीच येतो. हुबेहूब दिसणारा हा ‘घोडा’ भंगार वस्तूंपासून बनल्याची पुसटशी कल्पनाही येत नाही. जुन्या स्पेअर पार्ट्सचे हजारो तुकडे एकत्र जोडून ही निर्मिती करण्यात आली आहे. असे ओबडधोबड साहित्य वापरून साकारलेल्या या अश्वाचे हावभाव जसेच्या तसे नजरेस पडतात.

पंखांमुळे परिकथेतील उडणाऱ्या घोड्याचे रूप
परिकथेतील हा उडणारा घोडा आहे. त्याला पंखही आहेत. पंखांसाठी लोखंडी पट्ट्यांचा वापर केलेला आहे. त्यांना छिद्रे पाडून पंखाचा आकार दिला, तर शेपटीसाठी लोखंडी साखळ्यांचा उपयोग केला आहे. दोन पायांवर उभे राहून आक्रमक पवित्रा घेणाऱ्या या अश्वाचे उघडे तोंड बघितले की अश्वनिर्मितीकरिता या कलाकाराने घेतलेल्या कष्टाची कल्पना पाहणाऱ्यास येते स्कूटरचे शॉकअप, बाइकची किक : स्कूटरचे निरुपयोगी शॉकअप, लोखंडी चेन, वाहनांच्या चाकामध्ये वापरण्यात आलेली लोखंडी डिस्क, चेनकव्हर, गिअर बॉक्समधील अॅल्युमिनियमच्या गोल गिअर रिंग, बॉलबेअरिंग, दुचाकीची किक, हॉर्न, लोखंडी रिंग, स्पोक, ब्रेक शू, चार चाकीचे स्टिअरिंग, कार्बोरेटर, पंखा, हँडल, मडगार्ड असे लहान-मोठे जुने निरुपयोगी साहित्य अश्वनिर्मितीमध्ये वापरण्यात आले आहे. लोखंडी साहित्याचे हे तुकडे वेल्डिंगने जोडले आहेत. काही ठिकाणी मायक्रो वेल्डिंगही करावे लागले आहे.
बातम्या आणखी आहेत...